ॲनॅक्झिमँडर : (इ.स.पू.सु. ६१०—५४६). ग्रीक तत्त्ववेत्ता. ग्रीक खगोलशास्त्राचा जनक म्हणूनही त्याला मानले जाते. विश्वस्थितीविषयी सुस्पष्ट कल्पना मांडणारा हा पहिला विचारवंत. त्याचा जन्म आयोनियन शहरी मायलीटस (सध्याचे तुर्कस्तान) येथे झाला. ग्रीक तत्त्वज्ञ थेलीझ याचा हा शिष्य समजला जातो. त्याने ऑन नेचर (इं. शी. ‘निसर्गाविषयी’) हा ग्रंथ लिहिला. असा ग्रंथ लिहिणारा हा पहिलाच ग्रीक तत्त्ववेत्ता असावा. तो भूमिती व भूगोल यांचाही अभ्यासक होता. स्पार्टात त्या काळी झालेल्या भूकंपाचे भविष्य त्याने वर्तविले होते. ज्ञात असलेल्या पृथ्वीचा नकाशा बनविणारा तोच जगातील पहिला भूगोलज्ञ होय.
थेलीझने पाणी हे विश्वोत्पत्तीचे कारणतत्त्व आहे, असे सांगितले खरे; पण मुळात पाणी कोठून येते आणि जमीन, हवा, सूर्य, तारे इत्यादी पाणी नसलेल्या वस्तू कुठून निर्माण होतात. म्हणजेच जर सगळे काही पाणी असेल, तर पाणी नसलेल्या कोरड्या वस्तूंचा म्हणजे अग्नी आणि इतर तत्त्वांचा उद्भव कसा होतो? या समस्यांची उत्तरे थेलीझच्या लेखनात आढळत नाहीत. त्याचा ऊहापोह ॲनॅक्झिमँडरने आपल्या लेखनात केला आहे.
ऑन नेचर या ग्रंथात ॲनॅक्झिमँडरने विश्वनिर्मितीचा सिद्धांत मांडला आहे. त्याचा सारांश असा : “एक अनंत अशी प्रकृती आहे की, जिच्यात ज्या ज्या वस्तू अस्तित्वात आहेत, त्या सर्वांचे ‘आदितत्त्व’ (First Principle) आहे. तिच्यापासून ‘अंतराळे’ (Heavens) आणि त्यांच्यातील जगे निष्पन्न होतात. ही प्रकृती नित्य आणि अजर आहे आणि तिच्यात सर्व जगे सामावलेली असतात.”
“काळ हे असे एक तत्त्व आहे की, ज्याच्यात उत्पत्ती, अस्तित्व आणि विलय ह्या घटना निर्धारित होत असतात.”
विश्वाच्या निर्मितीमागील कारण असू शकणाऱ्या मूलद्रव्याला ‘तत्त्व’ म्हणणारा ॲनॅक्झिमँडर हा ग्रीक परंपरेतील पहिला तत्त्ववेत्ता होय. त्याला त्याने अनंत किंवा अमर्याद शक्ती (Boundless) असे म्हटले आहे. हे अनंत व्यापक, अमर्त्य आणि गुणातीत आहे. जे एका गतीमध्ये सतत फिरत असते. या फिरतीदरम्यान या कारणतत्त्वापासून काही भाग अलग होतो; जो विलग भाग उष्ण असतो, त्यापासून तेज या तत्त्वाची निर्मिती होते आणि जो भाग तुलनेने थंड किंवा कोरडा असतो त्यापासून पृथ्वी, आप, वायू या महाभूतांची निर्मिती होते आणि त्यांच्यापासून पुढे विश्वातील इतर तत्त्वांची निर्मिती होते. प्रलयाच्या वेळीही ही सर्व कार्यरूप तत्त्वे पुन्हा ‘अनंत’मध्ये विलीन होतात. विश्वाच्या जननाचे हे ‘अनंत’ तत्त्वस्वरूपाने सामान्य कारण आहे. त्याच्यापासून अंतराळे व जगे वेगळी झाली आणि ह्या जगांची संख्या ‘अनंत’ आहे. म्हणजे त्यांची उत्पत्ती आणि विनाश सतत होतच असतो, ही अखंड प्रक्रिया आहे; त्याच त्या वस्तू नव्याने परत परत अस्तित्वात येत राहतात.
येथे ‘अनंत’चे अधिक स्पष्टीकरण केले पाहिजे. ‘अनंत’ हा शब्द एक नाम आहे, ते विशेषण नाही. अनंत म्हणजे जे अनंत आहे ते (The Infinite). ह्या तत्त्वाचे अनंतत्व कशात सामावलेले आहे? उदा., आकारमानाने अनंत आहे, असे नाही. अवकाश अनंत आहे, याचा अर्थ अवकाशाला सीमा नाही; जर समजा मानली, तर त्या पलीकडे काय आहे? असेल तर पुन्हा अवकाशच. म्हणजे अवकाशाला कुठेही सीमा घातली तर तिच्या पलीकडेही अवकाश असतोच. ॲनॅक्झिमँडरच्या अनंततत्त्वाचे अनंतत्व या प्रकारचे आहे. ते स्वरूपात अनंत आहे.
या विश्वाची चालना म्हणजे कोणत्याही दोन विरुद्ध गोष्टी. या दोन विरुद्ध तत्त्वांचा संघर्ष अटळ आहे. या संघर्षादरम्यान एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी ही तत्त्वे झगडत असतात. त्या एका क्षणी ‘अनंत’ हे तत्त्व त्यांच्यामधील संघर्ष मिटवते, यालाच ॲनॅक्झिमँडरने ‘एकत्व’ असे नाव दिले आहे. या एकत्व क्षणी दोन्ही तत्त्वे एकरूप होतात. जसे, पाणी व अग्नी या दोन परस्परविरुद्ध तत्त्वांच्या संघर्षात एका बिंदूला पाण्याची वाफ होते किंवा अग्नी जलरूप होतो.
‘ईश्वर’ या संकल्पनेबाबत थेट विवेचन ॲनॅक्झिमँडर करत नाही, पण नंतर जे काही ईश्वरविषयक चिंतन ग्रीक विचारांमध्ये आढळते, त्याची बीजे मात्र त्याने रुजवली, असे म्हणता येते. त्याने ‘अनंत’लाच मूलतः ‘दिव्य’ (Divine) मानले आहे. ‘ईश्वर’ हा शब्द नंतरच्या विवरणात आला असावा. तो मान्य केला तर असे म्हणता येईल की, ॲनॅक्झिमँडरच्या मते, ईश्वर हे कारणरूप तर आहेच; परंतु कार्यरूपही आहे. कारण कारणरूपाला जेव्हा विशिष्ट आकार प्राप्त होतो, तेव्हा तो कार्यरूप होतो आणि तो आकार नष्ट झाला की, ते तत्त्व कारणरूपच होते. जसे की, माती हे कारणरूप. त्याला घटाचा आकार प्राप्त झाल्यावर ते कार्यरूप आणि घट फुटल्यावर तो पुन्हा माती या कारणरूपातच विलीन होतो. या न्यायानुसार ईश्वर हा सर्वसमावेशक आहे.
निसर्गातील कायदा आणि व्यवस्था यांबाबतचीही ॲनॅक्झिमँडरची मते त्याच्या विश्वोत्पत्तीच्या विवरणातच आढळतात. त्याच्या मते संघर्ष ही न टाळता येणारी बाब आहे. कारण आपल्याविरुद्ध तत्त्वाला आपल्यामध्ये सामावून घेण्याची नैसर्गिक प्रवृत्ती प्रत्येक तत्त्वाची असते; पण या संघर्षाच्या अंती एकत्वभाव ही तत्त्वे धारण करतात; परंतु या तत्त्वांनी जर आपली मर्यादा सोडली, तर अन्याय होतो आणि या अन्यायाची शिक्षा म्हणून विश्व विनाश पावते.
थेलीझ आणि ॲनॅक्झिमँडर यांपासूनच प्राचीन ग्रीक परंपरेचे बीज रोवले गेल्याने ॲनॅक्झिमँडरने मांडलेले विचार अतिशय मौलिक व मूलभूत आहेत. विश्वोत्पत्तीचे कारण व विश्वातील तत्त्वांचे चलनवलन यांचा ऊहापोह हेच त्याच्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप आहे. त्याचे मानवजातीला लाभलेले महत्त्वाचे योगदान म्हणजे त्याचा ‘एकतत्त्ववाद’. परंतु या प्रकारची स्पष्टोक्ती त्याच्या लेखनात कुठेही आढळत नाही. त्याचे सारे चिंतन त्याच्या ऑन नेचर या ग्रंथात आणि त्याच्याविषयी नंतर इतर तत्त्ववेत्त्यांनी केलेल्या, विशेषतः ॲरिस्टॉटलच्या, लेखनातून प्राप्त होते. त्याच्या प्रतिभाशाली तर्कामुळे ॲनॅक्झिमँडरने त्याच्या समकालातील आणि नंतरच्याही तत्त्वचिंतनाला एक दिशा दिली, व्याख्या दिली, असे म्हणता येईल.
संदर्भ :
- Audi, Robert, Ed. The Cambridge Dictionary of Philosophy, Cambridge, 1999.
- Fieser, James; Lillegard, Norman, A Historical Introduction to Philosophy : Text and Interactive Guides, Oxford, 2002.
- Honderich, Ted, Ed. The Oxford Companion to Philosophy, Oxford, 2005.
- Melchert, Norman, The Great Conversation: A Historical Introduction to Philosophy, New York, 2007.
- Rickman, Hans Peter, Preface to Philosophy, London, 1964.
- रेगे, मे. पु. ‘प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान’, नवभारत, प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई, एप्रिल-मे-जून, १९९४.
समीक्षक : श्रीनिवास हेमाडे