थेरवादी बौद्ध साहित्यानुसार खन्धक हे विनयपिटकाचा भाग आहे. ‘खन्ध’ हा पाली शब्द असून त्याचा अर्थ स्कंध, तुकडा किंवा विभाग असा आहे. विनयपिटकामध्ये बौद्ध भिक्खू व भिक्खूनींसाठीच्या आचारसंहिता आणि अनुशासन यांची माहिती आहे.त्यांच्या दैनंदिन जीवनातील लहान-मोठ्या गोष्टींपासून ते गंभीर अपराधांपर्यंतचे नियम यामध्ये दिले आहेत. त्यामुळेच विनयपिटक हे बौद्ध भिक्खू -भिक्खूनी संघाचे संविधान मानले जाते. बौद्ध संघ टिकून राहण्यामागे विनय पिटकातील शिस्त खूप महत्त्वाची आहे.
विनयपिटक प्रामुख्याने तीन मोठ्या भागांत विभागलेले आहे –

१) सुत्तविभंग –पातीमोक्खातील(भिक्खू -विनययाचे दोनशे सत्तावीस आणि भिक्खुनींसाठी तीनशे अकरा नियमांचा संग्रह.) बौद्ध भिक्खू व भिक्खुनींसाठीच्या आचारसंहिता आणि अनुशासन यांचे स्पष्टीकरण.
२) खन्धक–संघजीवनाविषयीचे विविध नियम, परंपरा व घटना यांचे वर्णन.
३) परिवार –प्रश्नोत्तरे, सारांश व नियमांचा आढावा.
खन्धकाचे स्वरूप आणि विषय
खन्धकाचे स्वरूप विधानात्मक असून नव्या भिक्खू-भिक्खूनींसाठी संघात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या दैनंदिन आचारसंहितेचे सविस्तर निर्देश आहेत. ज्यामध्ये भिक्खू व भिक्खूनींच्या संघाशी संबंधित धार्मिक विधी, त्यांची अंमलबजावणी,अन्न, वस्त्र,निवास याविषयीचे नियम,संघातील शिस्त, परस्पर आदर तसेच सौहार्द टिकवण्यासाठीच्या सूचना,वाद व मतभेद सोडवण्याची ठरावीक पद्धत, आणि अपराध निवारणाची मांडणी या बाबींचा समावेश आहे.
खन्धकाचे विभाग
खन्धकाचे दोन मुख्य भाग आहेत.१. ‘महावग्ग’ व २.‘चुल्लवग्ग’
महावग्गात दहा खन्धक असून भगवान बुद्धांना संबोधी प्राप्ती झाल्यापासून ते प्रथम भिक्खू संघाच्या स्थापनेपर्यंतचा संपूर्ण इतिहास आला आहे. या वग्गात बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीची कथा, भिक्खुंची संघ प्रवेश दीक्षा (संघात प्रवेश करण्याची प्रक्रिया), उपोसथ दिवसांचे नियम आणि त्यांनी पाळावयाच्या दैनंदिन आचारसंहितेचे निर्देश आहेत.
चुल्लवग्गात बारा ‘खन्धक’ आहेत. यामध्ये विशेषतः पहिल्या व दुसऱ्या बौद्ध संगीतीचे वर्णन, भिक्खुणी संघाची स्थापना, संघातील वाद सोडवण्याची पद्धत आणि अपराध करणाऱ्या भिक्खू- भिक्खुणी यांच्यावरील कारवाईचे नियम यांचा समावेश आहे. असे एकूण २२ खन्धक (विभाग) आहेत.
महावग्गात खालील दहा खन्धकांचा (विभागांचा) समावेश होतो.
- महाखन्धक– भगवान बुद्धांना झालेली बुद्धत्व प्राप्ती, बोधिवृक्षाजवळ त्यांनी एक आठवडा केलेला निवास, धम्मचक्र प्रवर्तन, उरुवेलामधील चमत्कारांचे प्रदर्शन, राजा बिम्बिसाराची दीक्षा, शिष्य व गुरु यांची कर्तव्ये, प्रवज्जा व उपसंपदा यांचे विधान, कपिलवस्तूची यात्रा, उपसंपदा (बौद्ध संघात पूर्ण भिक्खू किंवा भिक्खुनी होण्यासाठी दिली जाणारी अंतिम दीक्षा.) विधी इत्यादी बाबींची माहिती दिली आहे.
- उपोसथखन्धक –उपोसथाचे (पवित्र उपवासाचा किंवा आध्यात्मिक साधनेचा दिवस.महिन्यातील दोन अष्ठमी, अमावस्या आणि पौर्णिमा असे चार व्रत पालनाचे दिवस. व्रत म्हणजे या दिवशी भिक्खू -भिक्खुनी आणि गृहस्थ अधिकशिस्त, साधना आणि धम्माचे पालन करतात.) विधान (व्यवस्था,पध्दती.), पातीमोक्ख पाठ, उपोसथ केंद्रांची सीमा (ठराविक भौगोलिक क्षेत्र, ज्याच्या आत राहून भिक्खू संघ आपले अधिकृत विधी (विनय कम्म) पार पाडतो.) आणि संख्या, पातिमोक्ख-उद्देसा-पुब्बकरण- (पातीमोक्खाच्या पूर्वी करावयाची कार्ये), उपोसथाचे नियम, उपोसथाचा काळ, तसेच उपोसथासाठी स्थान व व्यक्ती यांचे नियम इत्यादी बाबतचे वर्णन आहे.
- वस्सपनायिका खन्धक – वर्षावासाचे विधान,स्थान, स्थान परिवर्तनामधील दोष व निर्दोषता यांसंबंधीचे नियमांचे वर्णन आलेले आहे.
- पवारणाखन्धक– वर्षावासानंतर भिक्खू संघ एकत्रित येऊन आपल्या अपराधांचे संदर्शन (प्रदर्शन)करतो, त्याला प्रवारणा (पवारणा : संघातील सदस्यांनी एकमेकांना आपल्या चुका सांगण्याचे आमंत्रण देण्याची प्रक्रिया.) असे म्हणतात. या खन्धकामध्ये पवारणेसंबंधी स्थान, काळ, व्यक्ती यांसंबंधीचे नियम, नियमविरुद्ध प्रवारणा, असाधारण प्रवारणा, प्रवारणेची स्थगिती (तिथी पुढे ढकलणे) इत्यादींबाबत नियमांचे वर्णन आहे.
- चम्म खन्धक –यामध्ये जोड्यांशी (चपला) संबंधित, वाहन विषयक , आसनसंबंधी, तसेच मध्यदेशाबाहेर जाण्यासंबंधीचे नियम आलेले आहेत.
- भेषज्ज खन्धक – बुद्धकालीन चिकित्सापद्धती तसेच औषधांची निर्मिती व त्यांचे सेवन करण्यासंबंधीचे नियम यामध्ये आलेले आहेत.
- कठीण खन्धक –कठीण चिवर (वर्षावास संपल्यानंतर भिक्खुंना दिले जाणारे कषाय वस्त्रकठीण चिवर म्हणून ओळखले जाते.)विषयक नियम, कठीण चिवराची उत्पत्ती आणि त्याचे विघ्न व अ-विघ्न याचे वर्णन आहे.
- चीवर खन्धक – विहित चिवर व त्यांचे प्रकारवर्णन तसेच जीवक कौमारभृत्य चरित्र आणि विशाखेचे वरदान (आठ वर) याचे वर्णन यामध्ये समाविष्ट आहे.
- चम्पेय्य खन्धक – भगवान बुध्द चंपा या गावात विहार करीत असताना भिक्खूसंघासंदर्भातील दंडकर्मे तसेच या दंडकर्मांपासून मुक्त होण्याचे उपाय,परिवास, तर्जनीय कर्म (चुकीच्या वर्तनाबद्दल संघाने दिलेली औपचारिक तंबी.), नियस्स कर्म (शिस्त सुधारण्यासाठी संघाने दिलेली वरिष्ठाच्या देखरेखीखाली राहण्याची शिक्षा.), प्रव्रज्जनीय कर्म (चुकीच्या वर्तनामुळे संघाने एखाद्याला त्या ठिकाणाहून दूर पाठवण्याची कारवाई.), प्रतिसारणीय कर्म (एखादा भिक्खू किंवा भिक्खुनीकडून गृहस्थ, दानशूर किंवा इतर व्यक्तीचा अपमान झाला असेल, तर अपमान झालेल्या व्यक्तीकडे जाऊन माफी मागण्यास सांगणारी संघाची शिस्तविषयक कारवाई.), उत्पेक्षणीय कर्म (चूक न मानणाऱ्या भिक्खू /भिक्खुनीवर संघाने केलेली तात्पुरती बहिष्कारात्मक कारवाई.) इत्यादी दंडकर्मांची वर्णने आली आहेत, तसेच या दंडकर्मांपासून मुक्त होण्याचे उपायही दर्शविले आहेत.
- कोसम्बक खन्धक – कोसंबी येथे झालेल्या भिक्खूसंघातील मतभेदांचे वर्णन आले आहे. तसेच दीर्घायू जातक आणि तथागतांनी पारिलेय्यक नावाच्या वनात केलेल्या निवासाचे आणि संघ सामुग्री (संघातील सदस्यांमधील ऐक्य आणि सौहार्द.) याचे वर्णन आहे.
चुल्ल वग्गात खालील १२ खन्धकांचा समावेश होतो.
- कर्म खन्धक –तर्जनीय, (चुकीच्या वर्तनाबद्दल संघाने दिलेली औपचारिक तंबी) नियस्स, (शिस्त सुधारण्यासाठी संघाने दिलेली वरिष्ठाच्या देखरेखीखाली राहण्याची शिक्षा.) आदि दंड कर्मांचे वर्णन.
- पारिवासिक खन्धक –पारिवास (दोषासाठी दिला जाणारा प्रायश्चित्ताचा कालावधी.संघाच्या देखरेखीखाली ठराविक दिवस शिस्तीत राहून प्रायश्चित्त करणे.), मूलसे प्रतिकर्षण (गंभीर अपराधामुळे संघातील स्थान व अधिकार मुळापासून काढून घेणे.), मानत्व (नियमभंगानंतर नम्रतेने व शिस्तीने राहण्याचा प्रायश्चित्ताचा कालावधी.), मानत्वाचार (मानत्व कालावधीत पाळावयाचे विनयपूर्ण आचरण.) आणि ‘आव्हान’ (एखाद्याला बोलावणे किंवा निमंत्रण देणे.) या दंडकर्मांची विधाने यांचे वर्णन.
- समुच्चय खन्धक -यामध्ये अनेक दंडकर्मांबाबत लहान-मोठी (सूक्ष्म व सविस्तर) विधाने वर्णन यांचे वर्णन.
- समथ खन्धक – संघातील फूट शांत करण्यासाठी सामुखी विनय (समोरासमोर उपस्थित राहून केलेला निर्णय / न्याय.), स्मृती विनय (स्मरणाच्या आधारे केलेला न्यायनिवाडा.), अमूढ विनय (भ्रमित अवस्था संपल्यानंतर केलेला संघाचा न्यायनिवाडा.), प्रतिज्ञातकरण (स्वतःची चूक कबूल करून प्रकरणाचा निर्णय करणे.), यद्भूयसिक (बहुमताच्या आधारावर घेतलेला निर्णय.) आणि तत्पापियसिक(चूक न मानणाऱ्या व्यक्तीवर संघाने केलेली दोषनिर्धारणाची कारवाई.स्वतःची चूक मान्य करत नसेल, खोटे बोलत असेल किंवा चौकशीमध्ये सहकार्य करत नसेल, तर संघ त्या व्यक्तीवरतत्पापियसिक कर्म करतो.) अशा सहा विनयांची विधानांचे वर्णन तसेच चार अधिकरणांचे (विवादांचे) शमन करण्याचे उपायही सांगितले आहेत.
- खुद्दकवत्थू खन्धक – यामध्ये स्नान, आभूषणे, केस, कंगवा, आरसा, लेप, मालिश, नृत्य-तमाशा इत्यादी लहान गोष्टींबाबत शिक्षांचे निर्देश दिले आहेत. याच खंडामधे विहारनिर्मिती विषयक नियम, बोधि राजकुमाराला तथागतांनी दिलेला उपदेश, याचे वर्णन आहे. तसेच बुद्धवचन आपल्या मातृभाषेत शिकण्याचा आदेशही दिलेला आहे.
- सेनासन (शायनासन) खन्धक – विहार व त्यातील साहित्य, विहाराचे रंगकाम, चित्रकला, सजावट, विहारातील वस्तूंच्या उपयोगाचा अधिकार इत्यादींचेही वर्णन आहे. तसेच या खन्धकामध्ये अनाथपिंडकाची दीक्षा आणि जेतवनाच्या निर्मितीचे सविस्तर विवरणही दिलेले आहे.
- संघभेदक खन्धक –देवदत्तची दीक्षा आणि त्याने केलेल्या विद्रोहाचे वर्णन.
- व्रत खन्धक –आगंतुक (दुसऱ्या ठिकाणाहून आलेला.), आवासिक (विहारात कायम राहणारा निवासी भिक्खू किंवा भिक्खूनी.) आणि गमिक (दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेला किंवा प्रवासात असलेला.) भिक्खुंची कर्तव्ये सांगितलेली आहेत.
- पातिमोक्खट्ठपन खन्धक – बुध्दधर्माच्या आठ अद्भुत(महागुण) गुणांचे वर्णन असून, कोणत्या अवस्थांमधे पातिमोक्ख देशना (उपदेश) स्थगित करणे आवश्यक आहे, हेही स्पष्ट केले आहे.
- भिक्खूनी खन्धक – भिक्खूनीची प्रवज्जा (गृहस्थ जीवनाचा त्याग करून भिक्खू किंवा भिक्खूनी होण्यासाठी घेतलेली प्राथमिक दीक्षा.),उपसंपदा (बौद्ध संघात पूर्ण भिक्खू किंवा भिक्खूनी होण्यासाठी दिली जाणारी अंतिम दीक्षा),व भिक्खुंना अभिवादन (आठ गुरु धर्म) आणि भिक्खूनी विनय याचे वर्णन आहे.
- पंचसतिका खन्धक –प्रथम संगीती चे विस्तृत वर्णन आहे.
- सप्तसतिका खन्धक –दुसऱ्या(द्वितीय) संगीतीच्या कार्यवाहीचे वर्णन आहे.
संदर्भ :
- उपाध्याय, डॉ. भरत सिंह, ‘पाली साहित्य का इतिहास’, हिन्दी साहित्य सम्मेलन, प्रयाग.
- भिक्षू धर्मरक्षित , ‘पाली साहित्य का इतिहास’, सिद्धार्थ बुक्स, नई दिल्ली.
- कोसंबी, आचार्य धर्मानंद, ‘बौद्ध संघाचा परिचय’, कौशल्य प्रकाशन, औरंगाबाद.
- भदन्त तीस्सवंस, ‘विनय पिटक’, सुगत प्रकाशन, नागपूर.
- कौसल्यायन, डॉ.भदन्त आनंद, ‘पाली हिन्दी कोश’, सुगत प्रकाशन, नागपूर.
- Bhagwat, Durga N., ‘Early BuddhistJ urisprudence’, Cosmo Publications,New Delhi.
- Oskar von Hinüber , ‘A Handbook of Pāli Literature’ -, Berlin, New York. 1996
समीक्षक : दीपक गायकवाड
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.