दालचिनी वृक्षाची फांदी

दालचिनी हा सदापर्णी वृक्ष लॉरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिनॅमोमम झेलॅनिकम आहे. हा वृक्ष मूळचा श्रीलंका आणि दक्षिण पूर्व आशियातील आहे. भारत, श्रीलंका, म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया तसेच उष्ण प्रदेशात याची लागवड केली जाते. दक्षिण भारतात या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या वृक्षाच्या खोड आणि फांद्या यांपासून मिळणाऱ्या पदार्थाचा वापर मसाल्यात केला जातो. त्या पदार्थालाही सामान्यपणे दालचिनी म्हणतात.

दालचिनीचा वृक्ष ६–८ मी. उंच वाढतो. याच्या फांद्या काहीशा चपट्या असतात आणि त्यांवर बारीक व खोलगट रेषा असतात. साल जाड व पिंगट तपकिरी असून तिला विशिष्ट वास असतो. पाने साधी, चिवट, दीर्घवृत्ताकृती, भाल्यासारखी व टोकदार असतात. पानांच्या तळातून ३–५ प्रमुख शिरा निघून टोकाकडे जातात. फुलोरा टोकाकडे (अग्रस्थ) व स्तबकाने येत असून त्यावरची फुले लहान, असंख्य, द्विलिंगी, पिवळी व दुर्गंधीयुक्त असतात. दले सहा, लवदार, नलिकायुक्त असतात. मृदुफळ जांभळे, लांबट आणि किंचित मांसल असते. फळात एकच बी असते.

दालचिनी साल

दालचिनी वृक्षाच्या खोडाचा आतील भाग काढून त्याचे तुकडे (काड्या) करून वाळविले जातात. हे तुकडे वाळल्यानंतर दालचिनी म्हणून वापरतात. या काड्या दळून तिची पूड करतात, तिला दालचिनी पूड म्हणतात. ती सुवासिक, उत्तेजक व वायुनाशी असून मळमळ व ओकारीवर गुणकारी आहे. दालचिनीच्या सालीत ०.५–१.० % तेल असते. या तेलामुळे दालचिनीला स्वाद येतो. या तेलात प्रामुख्याने सिनॅमाल्डिहाइड ६०–७५ % असून एथिल सिनामेट, युजेनॉल, लिनॅलूल आणि इतर घटक असतात. तेलाचा उपयोग मिठाई, औषधे, साबण व दंतधावन इत्यादींत घालण्यासाठी करतात. ते कवकनाशक आणि जंतुनाशकही आहे. तसेच तेल बाह्य उपाय म्हणून श्वासनलिकेचा दाह, डोकेदुखी व दातदुखी यांवर वापरतात. पोटातील वायू बाहेर निघून जाण्यासाठी दालचिनी उपयुक्त ठरते. मेक्सिकोत चॉकलेटमध्ये दालचिनीचा वापर करतात. भारतात वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये दालचिनीचा वापर केला जातो.