(बोटॅनिकल गार्डन). वैज्ञानिक संशोधन आणि सर्वसामान्यांसाठी बहुविध वनस्पतींची लागवड, त्यांचा संग्रह तसेच नाव वर्णनासहित प्रदर्शन ज्या उद्यानांमध्ये केलेले असते, त्याला ‘वनस्पती उद्यान’ म्हणतात. काही वनस्पती उद्यानात विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींचा संग्रह असतो; विषुववृत्तीय वनस्पती, पर्वतीय क्षेत्रातील वनस्पती, अगदीच अनोख्या किंवा विदेशी वनस्पती त्यांत असू शकतात. या उद्यानांतून हरितगृहे म्हणजेच सावलीत वाढणाऱ्या वनस्पतींसाठी छायागृहे असतात. याशिवाय वनस्पतींचे प्रत्यक्ष दर्शन, शुष्क वनस्पतिसंग्रह, चित्रलेखन, वनस्पतींसंबंधी ग्रंथसंग्रह येथे उपलब्ध असतात. शिक्षण आणि प्रशिक्षण हे वनस्पती उद्यानांचे उद्दिष्ट असून सामान्य लोक, वनस्पती उद्यान या विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि इतर यांच्यापर्यंत वनस्पतींचे महत्त्व पोहोचवण्याचे कार्य वनस्पती उद्याने करतात.

वनस्पती उद्याने ही बहुधा विद्यापीठे, विज्ञानसंस्था किंवा वैज्ञानिक संशोधन संस्था (वन विभाग, राज्य शासन, महानगरपालिका इ.) यांच्याद्वारे चालवली जातात. वनस्पतिविज्ञानाच्या अभ्यासासाठी तेथे विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित केल्या जातात. त्यामुळे प्रत्यक्ष वनस्पती, तसेच विलुप्त आणि विशेष वनस्पतींचा संग्रह विद्यार्थ्यांना पाहता येतात. विद्यार्थ्यांना वनस्पतीसंबंधी चित्रफिती दाखवणे, वनस्पतींच्या वर्गीकरणासंबंधी माहिती देणे, वनस्पतींच्या संशोधनासंबंधी माहिती देणे, वनस्पतींचे संवर्धन तसेच संग्रह करणे आणि प्रदर्शने भरवणे असे काही उपक्रम वनस्पती उद्याने राबवतात.

सोळाव्या शतकात इटलीतील विद्यापीठांनी वैद्यक विभागाला वनस्पतींची ओळख व उपयोग सांगण्यासाठी वनस्पतितज्ज्ञांची नेमणूक केली गेली, तेव्हा वनस्पती उद्यानाची संकल्पना उदयास आली. त्या काळात औषधी वनस्पतींची ओळख करणे गरजेचे होते. आधुनिक वनस्पती उद्याने भव्य आणि आकर्षक असून ती अथेन्समधील थीओफ्रॅस्टस काळातील विद्वत परिषदेतील शैक्षणिक उपक्रमांची आठवण करून देतात.

जगातील सु. १५० देशांत सु. ३,००० वनस्पती उद्याने, लताकुंज आणि वृक्षालये आहेत. ती सर्व उद्याने समशीतोष्ण प्रदेशांत आहेत. त्यांच्यात सु. १,१५,००० जातींच्या सु. ५० लाख वनस्पती संरक्षित व लागवडीखाली आहेत. येथील वनस्पतिसंग्रहालयात सु. १ अब्ज ४२ कोटी शुष्क वनस्पती नमुने (हर्बेरियम) आहेत आणि सु. ६१ लाख ३ हजार वनस्पतींच्या जातींच्या नोंदी आहेत. सु. ३,००० वनस्पती उद्यानांपैकी सु. ५५० उद्याने पश्चिम यूरोपात, सु. ३५० उत्तर अमेरिकेत, सु. २०० पूर्व व दक्षिण-पूर्व आशियात असून चीनमध्ये सर्वाधिक उद्याने आहेत. दक्षिण-पूर्व आशियातील बहुतांशी वनस्पती उद्याने भारतात असून त्यांची संख्या सु. १२२ आहे. मागील ३० वर्षांत वनस्पती उद्यानांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययुसीएन) या संस्थेने विलुप्तप्राय वनस्पतींना पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे वनस्पतींच्या संवर्धन चळवळीला वेग आला आहे. वनस्पती उद्याने वैज्ञानिक संस्था म्हणून कार्य करीत असून अशा उद्यानांतून वनस्पती आणि त्यांसंबंधीच्या वैज्ञानिक माहितीचा प्रसार केला जात आहे. वनस्पतींच्या जातींची वृद्धी आणि समृद्धी, संरक्षण, संवर्धन आणि जतन हे वनस्पती उद्यानांचे वैशिष्ट्य आहे.

वनस्पती उद्यानात विविध वनस्पती पुढील प्रकारे संग्रहीत करतात : (१) भौगोलिक स्थितीनुसार स्थानिक वनस्पती वाढवल्या जातात. (२) वर्गीकरण पद्धतीनुसार वनस्पती वाढवल्या जातात. जसे, काही उद्यानांमध्ये विशिष्ट वनस्पतींचे संवर्धन केले जाते. उदा., नेचे वर्गातील वनस्पती किंवा पामेसी कुलातील वनस्पती. यामागील उद्देश असा की, वनस्पतिविज्ञानाच्या विद्यार्थ्यांना शिकवता येते, संशोधन करता येते किंवा अशा वनस्पतींच्या संवर्धनासंबंधी प्रशिक्षण देता येते. तसेच सर्वसामान्यांना माहिती देण्यासाठी वनस्पतींचे प्रदर्शन करता येते. (३) विशिष्ट विषयाशी संबंधित वनस्पती वाढवल्या जातात. उदा., एक विषय किंवा मध्यवर्ती कल्पना मानून ठरावीक वनस्पतींची लागवड करतात. उदा., ऑर्किड, गुलाब, ऱ्होडोडेंड्रॉन, बांबू, मसाल्याची पिके, उंच पर्वतीय भागात वाढणाऱ्या वनस्पती, जलीय वनस्पती इत्यादी. अशा उद्यानांमध्ये वनस्पतींच्या प्रजाती, त्यांचे औषधी व आर्थिक महत्त्व, वनस्पतींचा अधिवास इ. बाबींचा अभ्यास केला जातो.

अनेक प्रगत देशांत तसेच प्रगतीशील देशांत वनस्पती उद्यानांचे स्वरूप पालटलेले दिसून येते. वनस्पती उद्यानांची सुरुवात औषधी वनस्पतींची लागवड करण्याच्या उद्देशाने झाली, तरी त्यांमध्ये काळानुसार नवनवीन संकल्पना राबवून बदल केले गेले आहेत. भविष्यातील वनस्पती उद्याने ही वनस्पतींचे संवर्धन, संरक्षण, शिक्षण आणि संशोधन यांकरिता प्रमुख केंद्रे असतील, हे पाहिले जात आहे. अशा उद्यानांतून वातावरण बदलाचे दुष्परिणाम आणि बदलणाऱ्या वातावरणात वनस्पती संवर्धन कसे करावे, याचेही मार्गदर्शन केले जात आहे.

वनस्पती उद्याने ही शासकीय अनुदानांवर अवलंबून न राहता स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. वनोपज फळे, फुले इ. पदार्थ विकणे, रोपवाटिका करून रोपे विकणे, कंपोस्ट खत विकणे, कंपोस्ट तयार करण्याचे प्रशिक्षण देणे, पक्ष्यांची घरटी तयार करून विकणे अशा विविध प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवून वनस्पती उद्याने स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही वनस्पती उद्यानांमध्ये काही सशुल्क अभ्यासक्रम व कार्यक्रम राबवले जातात.

वनस्पती उद्याने ही निसर्गातील विलुप्तप्राय वनस्पतींचे संवर्धन करणे, नैसर्गिक अधिवासाची अवनती कशी थांबवता येईल किंवा पुन:स्थापित करता येईल याचा अभ्यास करणे, यासाठी प्रयत्नशील असतात. अशा उद्यानांतून वेगवेगळ्या वनस्पतींच्या जातींचा संग्रह असल्याने एका प्रकारे जाती विविधता शिकवली जाते. काही उद्यानांतून वनस्पतींच्या बिया (सीड बँक) जतन केल्या जात असल्याने जैवविविधता सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच वनस्पतींची संरचना, वर्गीकरण, आनुवंशिकता, उपयुक्तता, विपरीत परिस्थितीत टिकून राहणाऱ्या जाती, पर्यावरण बदलाला अनुकूल प्रतिसाद देणाऱ्या जाती इत्यादीसंबंधी संशोधन आणि विकास यांसाठी कार्यक्रम आखले जातात.

अनेक देशांमध्ये वनस्पती उद्याने असून त्यांचे स्वरूप व आकार यांत भिन्नता असली, तरी माहिती व तंत्रज्ञान यांची ती देवाणघेवाण करतात. १९५४ साली इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ बोटॅनिक गार्डन (आयएबीजी) ही संस्था अस्तित्वात आली असून ती इंटरनॅशनल युनियन ऑफ बायलॉजिकल सायन्सेस (आयबीएस) आणि बोटॅनिक गार्डन्स कॉन्झर्व्हेशन इंटरनॅशनल (बीजीसीआय) या दोन संस्थांशी संलग्न आहे. बीजीसीआय या संस्थेचे सु. ७०० सदस्य असून ही संस्था वनस्पती संवर्धनासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करते.

भारतातील वनस्पती उद्यानांद्वारे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम केले जातात. तमिळनाडू राज्यातील उदकमंडलम (उटी) येथे मोठे वनस्पती उद्यान असून ते गुलाबांसाठी प्रसिद्ध आहे. तेथे अनेक वनस्पतींचा संग्रह आहे. बंगळुरू येथील लालबाग वनस्पती उद्यानात वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन शिबिरे व अधिवेशने भरवली जातात. कोलकातानजिक अलीपोर येथे कृषिसंबंधी ॲग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटीचे उद्यान असून तेथे दुर्मीळ औषधी वनस्पती, अलंकारिक वनस्पती, दुर्मीळ व विलुप्तप्राय वनस्पती, असाधारण वृक्ष, वामनतनू वृक्ष (बॉनसाई), निवडुंगांचे प्रकार, सेंद्रिय शेती, फुलझाडांची निगा व निपज इत्यादींसंबंधीचे तंत्र पाहायला मिळते. कोलकाता येथील हावरा येथे आचार्य जगदीशचंद्र बोस वनस्पती उद्यानात विविध वनस्पती आहेत. येथे जगातील सर्वांत मोठा दुसऱ्या क्रमांकाचा वड असून भारतातील जुने उद्यान अशी त्याची ख्याती आहे. दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) शहरात समुद्रसपाटीपासून सु. २,१०० मी. उंच लॉईड बोटॅनिकल गार्डन नावाचे वनस्पती उद्यान आहे. तेथे पर्वतीय अधिवासातील वनस्पतिसंग्रह असून सु. ११८ वर्षे जुने-काष्ठ प्ररोह-विस्टारिया चायनन्सिस ही महावेल पाहायला मिळते. १९३४ मध्ये देहराडून फॉरेस्ट रिसर्च इन्स्ट‍िट्यूट येथे वनस्पती उद्यान कार्यान्वित झाले. तेथे निरनिराळ्या देशांतून सु. ७०० वनस्पती आणून त्यांची लागवड करण्यात आली आहे. तेथील शुष्क वनस्पतिसंग्रह मोठा आहे.

वनस्पती उद्यान : (१) लॉईड बोटॅनिकल गार्डन (दार्जिलिंग), (२) क्यू रॉयल बोटॅनिकल गार्डन (लंडन), (३) अल्पाइन हाउस (लंडन), (४) एम्प्रेस गार्डन (पुणे).

जगातील पहिले वनस्पती उद्यान इटली येथील पिसा येथे असून त्याची स्थापना ल्यूका घिनी यांनी १५४३ साली केली. लंडन येथील क्यू रॉयल बोटॅनिकल गार्डन हे जगातील मोठे वनस्पती उद्यान (क्षेत्रफळ सु. ३२० एकर) असून तेथील वनस्पतिसंग्रहात सु. २७,००० जाती व ३ लाख वनस्पती आहेत. येथील हरितगृह सु. १८ मी. उंच आणि सु. २०० मी. लांब असून तेथे उष्ण प्रदेशातील वनस्पती वाढवल्या जातात. तेथील ‘अल्पाइन हाउस’ ही इमारत पर्यटकांचे आकर्षण असून ती पर्यावरणस्नेही आहे. तिच्यात थंड प्रदेशांतील वनस्पती वाढवल्या जातात. इमारत थंड ठेवण्यासाठी कोणतीही थंडावा यंत्रणा न वापरता इमारतीच्या तळघरात पाण्याच्या नळांवाटे पाणी खेळते ठेवतात. त्यामुळे इमारतीचे तापमान कायम राहते. सद्या ओमानमधील मस्कत येथे विकसित होत असलेले वनस्पती उद्यान जगातील सर्वांत मोठे वनस्पती उद्यान असेल, असे मानतात. तेथे काचगृहात मेघ वन (क्लाऊड फॉरेस्ट) निर्माण केले जाणार आहे. सु. १,००० एकरावर हे उद्यान वसलेले असून तेथील स्थानिक वनस्पतींचे संवर्धन आणि जतन करण्याची त्यांची योजना आहे. महाराष्ट्रात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (मुंबई), एम्प्रेस गार्डन (पुणे), सातपुडा वनस्पती उद्यान (नागपूर) ही वनस्पती उद्याने आहेत.