हठयोगातील ध्यानसाधनेचा एक महत्त्वाचा प्रकार. नादानुसंधान म्हणजे अनाहत नादाचा शोध घेऊन त्याचे अनुसरण करणे किंवा त्याच्याशी एकरूप होणे. ‘नादानुसंधान’ हा शब्द नाद व अनुसंधान या दोन शब्दांनी बनलेला आहे. नाद या शब्दाचा अर्थ ध्वनी, स्वर, आवाज, कंपन असा आहे. अनुसंधान याचा अर्थ शोध, अन्वेषण, गहन अभ्यास, अनुसरण करणे, एकरूप होणे असा होतो. ‘हठप्रदीपिके’त स्वामी स्वात्माराम यांनी ‘समाधि लक्षण’ या चतुर्थ उपदेशात ‘नादानुसंधान’ हा सर्वश्रेष्ठ प्रमुख लय मानला आहे. ‘लय’ हा समाधीसाठी पर्यायवाची शब्द आहे. आदियोगी भगवान शंकरांनी सव्वा कोटी लयाचे प्रकार सांगितलेले आहेत. परंतु, त्यापैकी नादानुसंधान ही नादब्रह्माची अशी उपासना आहे की ज्यांना तत्त्वज्ञानाचा बोध नाही अशांनाही ती संमत होईल, असे गोरक्षनाथांचे म्हणणे आहे.

नाद हा आहत व अनाहत असा दोन प्रकारचा असतो. आहत नाद म्हणजे आघातामुळे उत्पन्न होणारा जो बाह्य आवाज कानाद्वारे श्रवण केला जातो; जसे बोलणे, संगीत, निसर्गातील आवाज इत्यादी. अनाहत नाद म्हणजे शरीराच्या आत कोणत्याही बाह्य आघाताशिवाय सतत घुमणारा दिव्य ब्रम्हांडीय आवाज होय. अनाहत नादासंबंधी ‘योगतारावली, ‘नादबिंदूपनिषद्, ‘हठप्रदीपिका’, ‘घेरंडसंहिता, ‘सिद्धसिद्धांतपद्धती’  या ग्रंथांमध्ये तपशीलवार माहिती दिली आहे.

नादानुसंधानाचा अभ्यास करताना सिद्धासनात स्थिरपणे बसून शांभवी मुद्रा करावी. ‘अंतर्लक्ष्यं बहिर्दृष्टिः’ या न्यायाने आपले डोळे जरी बाह्य विषयांचे ग्रहण करीत असले तरीही मनाची संपूर्ण एकाग्रता आतमध्ये ठेवावी. या स्थितीत एकाग्रतेने शरीराच्या आतील आवाज उजव्या कानाने ऐकावा. दोन डोळे, दोन कान, नाक व तोंड ही षण्मुखे बंद करून शुद्ध झालेल्या सुषुम्ना नाडीमध्ये काही काळाने शुद्ध असा नाद ऐकू येतो.

या नादब्रह्म योगामध्ये आरंभ, घट, परिचय व निष्पत्ती अशा साधनेतील क्रमश: उन्नत होणाऱ्या चार अवस्था सांगितल्या आहेत. आरंभावस्थेत अनाहत चक्रातील ब्रह्मग्रंथीचा भेद झाला की घंटानादासारखा रुणझुण असा नाद हृदयाकाशात ऐकू येतो. योग्याला दिव्य देह, दिव्य गंध, अरोगावस्था प्राप्त होते. घटावस्थेत विशुद्ध चक्रातील विष्णूग्रंथीचा भेद होतो. प्राणवायू सुषुम्नेमधून वाहू लागतो. नाकाच्या आत वरच्या बाजूला भेरीसारखा (लहान ढोल) नाद ऐकू येतो. या अवस्थेत योगी निश्चल व ज्ञानी होतो. परिचय अवस्थेमध्ये भ्रूमध्यावर असलेल्या अवकाशात मर्दलसारखा (ढोलकीसारखे वाद्य) ध्वनी ऐकू येतो. महाशून्य स्थानी प्राणवायूच्या प्रवेशामुळे सर्व सिद्धींची प्राप्ती होते. स्वाभाविक अशा सहजानंदाची म्हणजेच आत्मिक आनंदाची प्राप्ती होते. योगी वात, पित्त, कफ या दोषांपासून तसेच दु:ख, वार्धक्य, रोग, भूक, निद्रा यांपासून दूर राहतो. निष्पत्ती अवस्थेत प्राण आज्ञाचक्रातील रुद्रग्रंथीचा भेद करतो, त्यावेळी वीणेचा मधुर ध्वनी ऐकू येतो. यात मन एकाग्र राहून राजयोगाची प्राप्ती होते.

नादानुसंधानामुळे चंचल व अस्थिर मन नियंत्रणात येते; अवर्णनीय आनंद व सुख यांची प्राप्ती होते; सर्व पापे नष्ट होऊन मन आणि प्राण शुद्ध चैतन्यात विलीन होतात. नादानुसंधानाचा अभ्यास करताना प्रथम समुद्र, भेरी, झर्झर वाद्य यांचे आवाज ऐकू येतात. त्यानंतर मर्दल, शंख, घंटा, शिंग यांचे आवाज ऐकायला येतात व शेवटी लहान घंटा, बासरी, वीणा, भुंगा यांचे नाद ऐकू येतात. ही प्रक्रिया स्थूल आवाजाकडून सूक्ष्म नादाकडे प्रवाहित होते. अनाहत नादाचे उल्लेख अनेक संतांनी केले आहेत; जसे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत तुकाराम इत्यादी. तसेच नादानुसंधानाचा उल्लेख अनेक योगोपनिषदातही आढळतो; जसे ध्यानबिंदू उपनिषद, नादबिंदूपनिषद, अमृतनादोपनिषद इत्यादी. ज्याप्रमाणे मधु सेवन करणारा भ्रमर सुगंधाची अपेक्षा करत नाही, त्याप्रमाणे नादासक्त मन विषयांची आकांक्षा धरत नाही, असे वर्णन ‘नादबिंदूपनिषदा’त आले आहे.

 हठप्रदीपिके’त स्वामी स्वात्माराम म्हणतात की, हठयोग हा एक प्रकारचा सोपान आहे, जो राजयोगाकडे नेतो. राजयोगाशी फारकत घेऊन हठयोग केला तर ते केवळ हठकर्म होते, त्याने फळ मिळत नाही. अनेकदा योगातली आध्यात्मिकता विसरून आसने व प्राणायाम यांचा केवळ शारीरिकदृष्ट्या, रोगनिवारणदृष्ट्या विचार केला जातो. परंतु, शारीरिक लाभांच्या दृष्टीने काही वेळा तो योग्य असला तरी ब्रह्मपद प्राप्ती करून देणारे नादानुसंधान म्हणजेच समाधी हेच योगाचे अंतिम साध्य आहे.

नादानुसंधानामध्ये अनाहत नाद परब्रह्म स्वरूप असल्याने मनही सहजच ब्रह्मरूपी एकरूप होऊन जाते. त्यामुळे समाधी अवस्था अगदी सहज रीतीने प्राप्त होते. पतंजलींचे ‘समाधी’ हे साध्य व नादानुसंधान यात फक्त साधना मार्गाचा फरक आहे. अशा रीतीने नादानुसंधानाने घडून येणारा मनाचा लय हा सहजपूर्ण आनंदाचा साक्षात्कार करून देणारा असल्यामुळे तो इतर सर्व लयांपेक्षा अत्यंत श्रेष्ठ असा लय आहे.

संदर्भ : 

  • दलाई, बी. के., ‘योगोपनिषद्’, संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, २०१५.
  • स्वामी दिगंबर, झा, पितांबर, ‘हठप्रदीपिका’, श्रीमन्माधवयोगमंदिर समिती, कैवल्यधाम, लोणावळा, पुणे, १९८०.
  • स्वामी दिगंबरजी, कोकजे, आर्. जी. संपा. इंग्रजी अनु.‘घेरण्डसंहिता’, लोणावळा, १९७८.

समीक्षक : निधी पटवर्धन


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.