योगतारावली हा राजयोग आणि हठयोग यांवरचा ग्रंथ असून तो कोणी व कधी लिहिला ह्याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. तथापि तो शंकराचार्यांनी लिहिला असावा असे मानले जाते. या ग्रंथात २९ श्लोक असून पहिल्या श्लोकात गुरुवंदन, पुढील २७ श्लोकात वर्ण्य विषय आणि अंतिम श्लोकात योगतारावलीमुळे होणाऱ्या सिद्ध पुरुषाचा जगातील व्यवहार कसा असावा या विषयी विवेचन आले आहे.

ग्रंथाचा विषय अद्वैताचा अनुभव हा आहे. तथापि या ग्रंथात विषयाची मांडणी ही साधनेच्या दृष्टीने केलेली आहे. प्रपंचातील दु:खातून निवृत्ती हे या ग्रंथाचे प्रयोजन आहे.

प्रारंभी लयाच्या विवेचनात ज्यायोगे साधक समाधीमध्ये स्थिर होतो तो लय श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे. लयामुळे मन आणि प्राण यावर नियंत्रण प्राप्त होते. चित्ताची कोणत्याही एकाविषयाशी एकतानता साधकाला समाधीकडे नेते. रेचक, पूरक, कुंभक याद्वारे प्राणावर नियंत्रण मिळविल्यावर आणि नाडीशुद्धी झाल्यावर शरीरामध्ये अनाहतनाद प्रकटतो. तारावली योगाची सिद्धी ही कुंभकाच्या अभ्यासावर अवलंबून आहे. नादानुसंधानाने साधकाचे चित्त विष्णुपदात विलीन होते. आत्मसाक्षात्कारासाठी आवश्यक असा दैवी अनुभव हा अनाहत चक्राच्या ठायी उद्भवतो. मात्र त्यासाठी प्राणायामाद्वारे प्रथम नाडीशुद्धी करणे आवश्यक आहे. जालंधर, उड्डियान आणि मूल या बंधांच्या साधनेने कुंडलिनी शक्ती जागृत होते व त्या तेजामुळे सहस्रार चक्रातील चंद्रबिंदूतून अमृत पाझरते. त्या अमृतप्राशनाने साधक काळावर विजय मिळवू शकतो म्हणजेच दीर्घायू होतो.

या ग्रंथात ‘केवलकुंभक’ हा कुंभकाचा सर्वोत्तम प्रकार आहे असे सांगितले आहे. केवलकुंभकात प्राणाचा स्वैर संचार आणि मनाचा विषयांमधील संचार संपूर्णपणे थांबतो. या कुंभकात प्राणवायू देहात किंवा देहाबाहेर किंवा काहीसा आत किंवा काहीसा बाहेर असाही राहू शकतो. कारण योग्याचे अवधान प्राणायामाकडे नसून चित्त निरोधाकडे असते. त्यानंतर जाणीवपूर्वक मन एकाग्र करण्याची वा प्राणाचा प्रवाह रोखून धरण्याची आवश्यकता उरत नाही. द्रष्टा आणि दृश्य ह्यातील अंतर नष्ट होते आणि उरते केवळ शुद्धसंवित्. जेव्हा मन संकल्प-विकल्प विरहित होते आणि श्वास-प्रश्वासाची गती थांबते, तेव्हा त्या अवस्थेला ‘मनोन्मनी’ अवस्था म्हणतात (योगतारावली १८).

निर्विकल्प समाधी आणि जीवाची जाग्रत्, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थेच्या पलीकडची जी तुरीय अवस्था तिचा योग्याने अनुभव घ्यावा असे विवेचन ग्रंथाच्या शेवटी आले आहे. हीच द्वैतविरहित शुद्ध चैतन्यावस्था होय.

श्रवणेन्द्रियाच्या पलीकडला असा दिव्य अनाहत नाद ऐकण्याने मोक्ष प्राप्त होतो असे शेवटच्या श्लोकात पुन्हा म्हटलेले आहे.

योगतारावलीत सांगितलेल्या योगसाधनेला श्रीशंकराचार्यांनी राजयोग मानले आहे (योगतारावली १४-१६). याचे एक कारण चं. वा. दांडेकरांच्या मते असे आहे की, आत्मा हा देहसंघाताचा राजा असल्यामुळे त्याच्याशी संयोग साधणारा योग हाच खराखुरा राजयोग होय.

हा ग्रंथ शंकराचार्यांनी लिहिला असे मानले असले तरी आणि यात अद्वैताचे प्रतिपादन असले तरी यावर हठयोगाचा प्रभाव आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

संदर्भ :

  • दांडेकर चं. वा., योगतारावली, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९.

समीक्षक : कला आचार्य