पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच महाभूतांवर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे भूतजय नावाची सिद्धी होय. ‘भूत’ या शब्दाचा अर्थ येथे महाभूत असा आहे. पाच महाभूते अचेतन आहेत; परंतु जीव हा चेतन आहे त्यामुळे जीव या पाच महाभूतांचे ज्ञान प्राप्त करून त्यांवर नियंत्रण मिळवू शकतो. महाभूतांवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांचे स्वरूप काय आहे, त्यांमध्ये क्रिया कशी होते याविषयीचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. इंद्रियांद्वारे महाभूतांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, कारण इंद्रिये कोणत्याही विषयाचे अंशत:च ज्ञान करून देऊ शकतात. एखाद्या विषयाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर ते केवळ चित्ताच्या एकाग्रतेद्वारेच शक्य आहे. त्यामुळे महाभूतांच्या विविध आयामांवर संयम (धारणा, ध्यान आणि समाधी) केल्याने त्यांचे पूर्ण ज्ञान प्राप्त होऊन त्यांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते.

महाभूतांच्या स्थूल, स्वरूप, सूक्ष्म, अन्वय आणि अर्थवत्त्व या पाच आयामांवर ध्यान (संयम) केल्याने योग्याला भूतजय मिळविता येतो, असे प्रतिपादन योगसूत्रात (३.४४) केलेले आहे. या पाचही रूपांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे –

(१) स्थूल : महाभूतांमध्ये दिसून येणारे विशेष धर्म म्हणजे ‘स्थूल’ होय. विशिष्ट आकार असणे, गुरुत्व, कोरडेपणा, अन्य वस्तूला आच्छादन करणे (पारदर्शक नसणे), स्थैर्य, कठिणता, अन्य तत्त्वांचे भेदन करणे इत्यादी पृथ्वीतत्त्वाचे विशेष गुण आहेत. स्निग्धता, सूक्ष्मता (पाझरणे), मऊपणा, वजन असणे, थंडपणा, पवित्रता इत्यादी जलतत्त्वाचे विशेष गुण आहेत. ऊर्ध्वगमन, शिजविणे, दाहकता, हलकेपणा, प्रकाश करणे, पृथ्वी आणि जल या तत्त्वांचा नाश करणे इत्यादी अग्नितत्त्वाचे (तेज) विशेष गुण आहेत. कोणत्याही दिशेला जाऊ शकणे, कंपन सामर्थ्य, चंचलता (अस्थिरता), पारदर्शकता, कोरडेपणा इत्यादी वायुतत्त्वाचे विशेष गुण आहेत. सर्वव्यापित्व, विशिष्ट रचना किंवा आकार नसणे आणि अन्य तत्त्वांच्या अस्तित्वासाठी अवकाश प्रदान करणे हे आकाशतत्त्वाचे विशेष गुण आहेत. महाभूतांमधील या विशेष गुणांना स्थूल असे म्हणतात.

(२) स्वरूप : पाच महाभूतांमध्ये द्रव्याचे जे मूलभूत तत्त्व आहे, त्याला स्वरूप असे म्हणतात. मूर्तत्व हे पृथ्वीचे, स्निग्धता हे जलाचे, उष्णता हे अग्नीचे, गमनशीलत्व (वाहणे) हे वायूचे आणि सर्वव्यापी असणे हे आकाशाचे स्वरूप आहे.

(३) सूक्ष्म : इंद्रियांनी ज्यांचे ज्ञान होते अशी स्थूल पंचमहाभूते ज्या सूक्ष्म तन्मात्रांपासून उत्पन्न झाली ती तन्मात्रे महाभूतांचे सूक्ष्म रूप होय. वर उल्लेखिलेले विशेष गुण व स्वरूप हे स्थूल महाभूतांमध्ये व्यक्त होतात. परंतु, सृष्टिक्रमानुसार महाभूते उत्पन्न होण्यापूर्वी त्यांमधील विशेष गुण व स्वरूप वेगवेगळे नसतात, तर ते एकरूपच असतात. म्हणून त्या सूक्ष्म रूपाला ‘तन्मात्र’ असे म्हणतात. तन्मात्र या शब्दाचा अर्थ आहे – ‘केवळ तेच, अन्य नाही’.

(४) अन्वय : सर्व महाभूतांत राहणाऱ्या सत्त्व, रज आणि तम या गुणांना अन्वय असे म्हणतात. पाचही महाभूतांमध्ये त्रिगुणांचे अस्तित्व आहे. परंतु, त्यांचे प्रमाण समान नाही. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पाच तत्त्वांमध्ये क्रमशः तमोगुणाचे प्रमाण अधिक होत जाते व सत्त्वगुणाचे प्रमाण कमी होत जाते. ज्यावेळी महाभूतांमध्ये क्रिया घडते, त्यावेळी त्यांमध्ये रजोगुणाचे प्राबल्य दिसून येते. ‘अनु’ म्हणजे मागेमागे आणि ‘अय’ (इण् धातूचे रूप) म्हणजे जाणारे. जेथे जेथे महाभूते आहेत, तेथे त्रिगुणही स्वाभाविकपणे त्यांच्या मागे मागे जातात; म्हणजे महाभूताच्या प्रत्येक रूपामध्ये ते अस्तित्वात असतात म्हणून त्रिगुणांना अन्वय असे म्हटले आहे.

(५) अर्थवत्त्व : अर्थ म्हणजे प्रयोजन आणि अर्थवत्त्व म्हणजे प्रयोजन असणे. पाच महाभूतांच्या अस्तित्वाचे प्रयोजन हे चैतन्यस्वरूप पुरुषाला विविध भोग (अनुभव) आणि अपवर्ग प्रदान करणे हे आहे. पाच महाभूतांनी बनलेल्या वस्तूंचे अस्तित्व हे स्वत:साठी नसते, तर ते जीवांना भोग प्रदान करण्यासाठी असते आणि जेव्हा वस्तूचा भोग (अनुभव) पूर्ण होतो तेव्हा त्याला अपवर्ग म्हणतात. जगातील सर्व अचेतन पदार्थ हे चेतन पुरुषांना भोग आणि अपवर्ग प्रदान करतात, हेच त्यांच्या अस्तित्वाचे प्रयोजन आहे.

महाभूतांच्या स्थूल, स्वरूप, सूक्ष्म, अन्वय आणि अर्थवत्त्व या पाच रूपांवर क्रमश: संयम (धारणा, ध्यान, समाधी) केल्याने त्यांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते व योग्याला त्या त्या महाभूतावर विजय अर्थात संपूर्ण नियंत्रण मिळवता येते. भूतजय ही सिद्धी मिळाल्यानंतर योग्याला कोणत्याही विशेष प्रयत्नाशिवाय अणि मा, महिमा इत्यादी अष्टसिद्धी  प्राप्त होतात, त्याचे शरीर सुंदर, आकर्षक आणि बलवान होते आणि महाभूतांच्या मूळ धर्मांमध्ये तो हवे तेव्हा हवे तसे बदल करू शकतो.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली असा उल्लेख इतिहासात सापडतो. भिंत ही विटा, मातीची बनलेली असल्यामुळे ती पृथ्वीतत्त्वाची आहे व तिच्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे सामर्थ्य नाही. परंतु, असे अनुमान करणे शक्य आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी योगसिद्धीच्या साहाय्याने पृथ्वीतत्त्वाच्या भिंतीच्या जडत्व धर्मामध्ये बदल करवून आणले. संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या पाण्यात बुडवूनही ती पुन्हा वर आली आणि थोडीसुद्धा ओली झाली नाही. अर्थातच पाण्याच्या ओले करणे या मूळ धर्मात व पृथ्वीतत्त्वाच्या ग्रंथामध्ये असणाऱ्या गुरुत्व (जडत्व) या मूळ धर्मातच योगसिद्धीच्या साहाय्याने बदल झाला. योगशास्त्रानुसार पाच महाभूतांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर अशा पद्धतीने त्यांच्या स्वरूपात परिवर्तन करता येऊ शकते. या सामर्थ्यालाच भूतजय असे म्हणतात.

पहा : महाभूत, तन्मात्र.

                                                                                                समीक्षक : कला आचार्य