योगाचे अंतिम लक्ष्य संसारचक्रातून मुक्ती हे आहे. त्यासाठी चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे आवश्यक आहे. परंतु, चित्तात एकापाठोपाठ एक उद्भवणाऱ्या अनेक वृत्तींचा निरोध करणे सहजासहजी शक्य नसल्यामुळे चित्ताची एक वृत्ती म्हणजेच एकाग्रता साध्य करणे व नंतर त्या एका वृत्तीचाही निरोध करणे ही प्रक्रिया योगामध्ये सांगितलेली आहे. चित्ताची एकाग्रता साध्य करण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य ही दोन साधने योगसूत्रात आढळतात. अभ्यास आणि वैराग्य यामुळे साधनेतील अंतराय नाहीसे होऊ शकतात.

पतंजलि असे म्हणतात की, अभ्यास आणि वैराग्य यांनी चित्तवृत्तींचा निरोध होतो (अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोध: |योगसूत्र  १.१२). प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या पाच वृत्तींचा निरोध अभ्यास आणि वैराग्य यांमुळे शक्य आहे.

साधकाने चित्तवृत्तीच्या निरोधासाठी अभ्यास आणि वैराग्य या दोघांचाही अवलंब करणे आवश्यक आहे. अभ्यास आणि वैराग्य या दोघांसाठी करावी लागणारी साधना ही निरनिराळी आहे. चित्तरूपी नदीचा विषयांकडे जाणारा प्रवाह वैराग्याने थांबविता येतो. अभ्यासाद्वारे चित्ताची एकाग्रता साध्य होते. साधकाने दोघांपैकी केवळ एकाचा अवलंब करून भागणार नाही असे व्यास, वाचस्पति मिश्र आणि विज्ञानभिक्षूंचे  मत आहे.

अभ्यास म्हणजे चित्ताच्या स्थितीसाठी केलेला यत्न होय असे पतंजलि म्हणतात (तत्र स्थितौ यत्नोऽभ्यास: | योगसूत्र १.१३). या सूत्रात पतंजलींनी कोणत्याही एका स्थितीचा स्पष्ट निर्देश केलेला नाही. त्यामुळे योगाच्या आठही अंगातील प्रत्येक अंगाच्या साधनेतील स्थिरता हा स्थिती शब्दाचा अर्थ होय असा एक मतप्रवाह अस्तित्वात आहे. ती साधण्यासाठी वारंवार प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास होय. चित्तामध्ये सदैव कोणती न कोणती वृत्ती अस्तित्त्वात असते. एका वृत्तीचा अस्त आणि दुसऱ्या वृत्तीचा उदय यामधला काळ अभ्यासाने वाढविणे शक्य आहे. असे केल्यामुळे चित्त काही क्षण का होईना वृत्तीरहित होऊ शकते. स्थिती शब्दाचा चित्तामध्ये राजस व तामस वृत्ती नसणे असाही अर्थ घेता येईल. राजस व तामस वृत्ती व्यतिरिक्त केवळ शुद्ध व सात्त्विक अशा एकाग्रतारूप वृत्तीचे अस्तित्त्व या अवस्थेला स्थिती असे म्हणतात. तमोगुणाच्या आधिक्यामुळे चित्तामध्ये निद्रा, आळस, निरुत्साह इत्यादी मूढावस्थेचे दोष निर्माण होतात. रजोगुणाच्या आधिक्यामुळे चित्तामध्ये चंचलतारूप विक्षेप उत्पन्न होतो.

यम, नियम, आसन, प्राणायाम इत्यादी अंगांचा अभ्यास म्हणजे पुनरावृत्ती शक्य आहे. ती पुनरावृत्ती साधकाला त्या त्या अंगात स्थैर्य प्राप्त करून देईल. पण समाधीत सर्व क्रियांचा अभाव असतो. त्यामुळे समाधीच्या संदर्भात अभ्यास करायचा म्हणजे नेमके काय करायचे हा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाचे उत्तर असे देता येईल की, येथे चित्त वृत्तीरहित झाल्यावर शुद्ध चैतन्यरूप असा साक्षि-पुरुष स्व-रूपात अवस्थित राहतो व बाहेर धावणाऱ्या चित्ताला निश्चलता प्राप्त होते. चित्ताचे वृत्तीरहित होणे आणि त्याला शांत, निश्चल अवस्था प्राप्त होणे यासाठी  केला जाणारा मानसिक प्रयत्न म्हणजे समाधिविषयक अभ्यास होय.

अभ्यास दीर्घकाळ, व्यत्ययरहित, त्याचप्रमाणे श्रद्धापूर्वक आचरणात आणला तर दृढभूम होतो (स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमि: | योगसूत्र १.१४). दृढभूमि शब्दाचा अर्थ साधनेत जी जी भूमिका साधली असेल त्या त्या भूमिकेत स्थिर झालेले साधकाचे मन विषय-सुखांच्या वासनेने विचलित होत नाही. दीर्घकाळ अभ्यास म्हणजे अमुक इतके दिवस, महिने किंवा वर्षे असे अभिप्रेत नाही. तर दीर्घकाळ म्हणजे नेहमीच असा अर्थ आहे. निरंतर म्हणजे सतत. योगाच्या एका अंगात नैपुण्य मिळाले म्हणजे त्याचा अभ्यास नाही केला तर चालेल असे नाही. अभ्यास हे एक प्रकारे तपाचे आचरण आहे. सत्कार म्हणजे योग्य रीतीने केलेली कृती. श्रद्धा, भक्ती, उत्साह, ब्रह्मचर्य यांची जोड असेल तरच अभ्यास अव्याहत सुरू राहतो. अन्यथा साधनेत सातत्य टिकत नाही. साधना खंडीत होऊ  शकते.

साधक अभ्यासाबाबतीत उदासीन झाला तर दीर्घकाळ केलेला अभ्यासही साधनेचे फळ देण्यास असमर्थ ठरतो (तत्त्ववैशारदी १.१४). साधनेतील अंतराय दूर करण्यासाठी साधकाने  त्याला आवडेल अशा विषयामध्ये चित्त पुन्हा पुन्हा ठेवावे (तत्प्रतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यास: |योगसूत्र १.३२). असे केल्यामुळे त्या विषयावर मनाची एकाग्रता साधते व मन अन्यत्र धावत नाही.

श्रद्धेने केलेला अभ्यास दृढभूमि होतो याचा अर्थ असा की तो बळकट, दृढ झाल्यामुळे एकाग्रतेला विरोधी असणारे संस्कार म्हणजेच व्युत्थान संस्कारही त्याला सहजासहजी अभ्यासापासून विचलित होऊ देत नाहीत (व्यासभाष्य १.१४).

भगवद्गीतेत (६.३५) असे म्हटले आहे की, मन स्वभावत: चंचल असते. त्यामुळे चित्त चांचल्यरहित होणे संभवत नाही. ते शरीर आणि इंद्रियांना क्षुब्ध करू शकते. परिणामी शरीर तसेच इंद्रिये यावर नियंत्रण करता येत नाही. तसेच मन बलवान आहे म्हणजे इष्ट विषयापासून कोणत्याही उपायाने त्याला दूर करणे कठीण आहे. आकाशातील वायू निश्चल करणे, त्याची गती थांबविणे जितके अशक्य तितकेच मनाचा निग्रह करणे अशक्य होय. मन क्षोभ पावणारे, बलवान आणि दृढ असल्यामुळे त्याचा निग्रह करणे कठीण आहे. तरीदेखील योगी अभ्यास वैराग्याद्वारे त्याचा निरोध (निग्रह) करू शकतो म्हणजे त्याला वृत्तीरहित बनवू शकतो.

दैनंदिन जीवनात देखील अध्ययन, कोणत्याही कलेतील कौशल्य, क्रीडानैपुण्य यासाठी अभ्यासाची नितांत आवश्यकता असते.

                                                                                                                                                                                                          समीक्षक : श्रीराम आगाशे