नायगावकर, अशोक वसंत : (२९ डिसेंबर १९४७). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी. अशोक नायगावकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे झाला. त्यांचे बालपण कष्टात व गरिबीत गेले ; परंतु या वयात झालेले संस्कार त्यांच्या काव्यशैलीला पूरक ठरले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून वाणिज्य विषयात पदवी घेतल्यावर त्यांनी ३१ वर्षे बँक ऑफ बडोदा येथे नोकरी केली. त्यानंतर स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून मराठी साहित्याची सेवा हेच कार्यक्षेत्र निवडले .काव्य लेखन गद्य लेखन देशात व परदेशात कवितेच्या मैफिली असा त्यांचा साहित्यिक प्रवास आजही सुरू आहे. काव्य लेखनात सुहास भालचंद्र बापट यांचे प्रोत्साहन व कवी शंकर वैद्य यांचा आदर्श अशोक नायगावकरांच्या जडणघडणीत मोलाचे आहे. आपल्या काव्यातून उपरोधाचे माध्यम वापरत त्यांनी गंभीर समाज चिंतन व्यक्त केले. त्यांच्या वाटेवरच्या कविता हा काव्यसंग्रह ग्रंथाली प्रकाशन ने प्रकाशित केला आहे. सर्वसामान्य माणूस त्याच्या व्यथा वेदना व सामाजिक प्रश्नांची दखल या संग्रहात कवीने घेतली आहे. मराठी भाषेतील विविध नियतकालिकांत त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत.
कवितेच्या वाटेवर हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. कवितेच्या गावा जावे या काव्यसंग्रहात नायगावकरांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत .त्यांची कविता समाज जीवनाविषयी जागरूकता व्यक्त करणारी, उद्बोधन करणारी, प्रसंगी उपरोधाचा सूर मांडत प्रेमाचा अनुभव व्यक्त करणारी तसेच वाचन संस्कृतीचा प्रसार व मराठी भाषेचा प्रचार करत समाजभान जागृत ठेवणारी आहे. त्यांच्या कवितेत हास्य, उपहास आणि व्यंग्य हे मुख्य माध्यम असले तरी त्यांतून सामाजिक व सांस्कृतिक वास्तवाचे गंभीर दर्शन घडते. वरवर विनोदी वाटणाऱ्या त्यांच्या ओळी खोलवर विचार करायला भाग पाडतात. त्यांच्या काव्यात सामाजिक टीका, सांस्कृतिक मूल्यांचे संकट, राजकीय उपहास आणि मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण हे प्रमुख घटक आहेत.
नायगावकरांच्या कवितेत समाजातील विषमता, ढोंग, भ्रष्टाचार, स्त्री-पुरुष संबंध, ग्रामीण-शहरी फरक, पर्यावरणीय जाणीव अशा अनेक मुद्द्यांवर मार्मिक भाष्य आहे. त्यांच्या कवितेत राजकीय नेते, प्रशासन, सामाजिक नेते यांच्यावर तिखट उपहास आहे. गांधीजींच्या नावाने होणारे राजकीय शोषण, निवडणुकीतील खोटे वचन, बहुमताच्या नावाखाली होणारी दादागिरी यांवर त्यांनी भाष्य केले आहे. ग्रामीण जीवन, शेतकरी, मजूर यांच्या व्यथा त्यांच्या कवितेत सहानुभूतीने येतात, पण ती कधीही भावुकतेत न बुडता व्यंग्यातून व्यक्त होते. पर्यावरणीय जाणीव, जलसंकट, वृक्षतोड यांसारखे मुद्देही त्यांच्या काव्यातून उमटतात.
नायगावकरांच्या कवितेत मराठी संस्कृती, परंपरा, आधुनिकतेचा प्रभाव, भाषेचे महत्त्व हे मुद्दे वारंवार येतात.त्यांच्या कवितेत पारंपरिक मूल्ये (जसे पांडुरंग भक्ती, ज्योतिबा फुले यांचे विचार) आणि आधुनिक उपभोगवाद यांच्यातील संघर्ष दिसतो. त्यांची कविता फक्त हसवत नाही तर अंतर्मुख करते. हास्य हे त्यांचे हत्यार आहे, ज्याद्वारे ते समाजातील कुरूपता उघड करतात. उपरोधिक शैलीतून ते सांस्कृतिक मूल्यांचे रक्षण करतात आणि नव्या पिढीला विचार करायला प्रवृत्त करतात.एकंदरीत, अशोक नायगावकरांच्या कवितेत हास्य हे साधन आहे, तर सामाजिक जागृती आणि सांस्कृतिक जतन हे उद्दिष्ट आहे.
त्यांची कविता महाराष्ट्रातील मर्यादित न राहता साता समुद्रापार जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्र मंडळ लंडन, न्यू कॅसल, कतार दुबई ,अबुधाबी, बँकॉक, शिकागो ,पीटसबर्ग, फिलाडेल्फिया, लॉस एंजलिस, सिंगापूर इत्यादी ठिकाणी त्यांच्या काव्य मैफिली झाल्या आहेत. वाटेवरच्या कविता या संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार मिळाला आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे कुसुमाग्रज गौरव पुरस्कार, सासवड पुणे येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा पुरस्कार, जगद्गुरु तुकाराम व आद्य कवी मुकुंदराज पुरस्कार, कै. भाई फुटाणे प्रतिष्ठानचा नामदेव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. सिंगापूर येथे झालेल्या विश्व मराठी काव्य संमेलनाचे अध्यक्ष पद नायगावकरांनी भूषविले आहे .चौदावे कोकण मराठी साहित्य संमेलन २०१२ मध्ये दापोली येथे झाले या संमेलनाचे ते अध्यक्ष सातारा येथे झालेल्या ९९ अखिल भारतीय साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवत त्यांनी सादर केलेल्या कवितांनी रसिकांची मने जिंकली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्यपद त्यांनी भूषविले आहे.
संदर्भ : https://wordstellstoriespoetry.wordpress.com/2016/12/18/ashok-naigaonkar-the-man-with-a-serious-laugh/
समीक्षण : जगतानंद भटकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.