प्रस्तावना : वाहतुकीदरम्यानऔषध योग्‍य स्थितीत राहावे आणि वेळेवर नियोजित स्थळी पोहोचावे याची खात्री करण्यासाठी पुरवठा साखळी तयार करण्यात येते. या साखळीला लसीकरणातील शीतसाखळी असे म्हणतात. या साखळीत दैनंदिन नोंदणी करणे, मासिक अहवाल निरीक्षणांवरून लशीच्या / औषधाच्या मागणीचा अंदाज लावणे, त्यानुसार प्रमाण निश्चित करणे, लसनिर्मितीपासून अंतिम वापरकर्त्यापर्यंत अनेक स्तरांमधून लशीची वाहतूक करताना त्याची गुणवत्ता राखणे इत्यादी टप्पे अंतर्भूत होतात. लशीच्या उत्पादन स्थळापासून ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत, तिची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी योग्य तापमानात (२° ते ८° से.) साठवणूक आणि वाहतूक करण्याची ही एक अखंड प्रणाली आहे. लस प्रभावी आणि रोगप्रतिकारक शक्ती देण्यास सक्षम राहावी याकरिता बर्फ अस्तरित शीतपेटी (ice lined refrigerator), अतिथंड शीतपेटी (deep freezer) यांसारखी विविध प्रशीतन उपकरणे वापरली जातात. लशीची परिणामकारकता (effectiveness) टिकवून ठेवणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट असते.

आ. १. लसीकरणातील शीतसाखळी.

उत्पादक ते लाभार्थी प्रवास : लशी जलद पोहोचवण्यासाठी हवाई वाहतुकीचा वापर केला जातो काही वेळा आवश्यकतेनुसार रस्ते वाहतुक केली जाते. सर्व लशी उत्पादकाकडून थेट जिथे त्या वापरल्या जातील अशा देशात प्रशीतन जपणाऱ्या वाहतूक वाहनातून पाठवल्या जातात. लशींचे वितरण अधिक शाश्वत आणि किफायतशीर करण्यासाठी, युनिसेफ समुद्री वाहतुकीचादेखील शोध घेत आहे. ज्यामुळे हवाई वाहतुकीच्या तुलनेत हरितगृह वायू उत्सर्जन ९० टक्क्यांपर्यंत आणि मालवाहतुकीचा खर्च ५० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

एकदा लशी गंतव्य देशात पोहोचल्या की, त्या शीतगृहांमध्ये साठवल्या जातात आणि नंतर प्रशीतन वाहनांद्वारे प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक शीतगृह सुविधांमध्ये वितरित केल्या जातात. साठवणुकीच्या सुविधांपासून ते गाव पातळीपर्यंत आरोग्य कर्मचारी शीतपेट्यांमध्ये आणि  लस वाहकांमध्ये लस वाहून नेतात. मोटार, मोटारसायकल, सायकल, गाढव, उंट किंवा पायी प्रवास करून अगदी दुर्गम गावांमध्येही प्रत्येक मुलाला लसीकरण करतात.

आ. २. लसीकरण शीतसाखळीत वापरण्यात येणारी प्रमुख साधने : (१) व्यावसायिक शीतकक्ष, (२) अतिथंड शीतपेटी, (३) बर्फ अस्तरित शीतपेटी, (४) सुवाह्य शीतपेटी, (४अ) बर्फाची डबी.

वापरण्यात येणारी उपकरणे : लस तयार झाल्यावर ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना किंवा साठवताना, ती कधीही गरम होऊ नये किंवा गोठू नये (त्याच्यासाठी ठरवलेल्या तापमानातच राहावी) यासाठी खास शीतके (coolers) आणि अतिथंड शीतकपाटे वापरली जातात. यामध्ये व्यावसायिक शीतकक्ष (walk in cooler), अतिथंड शीत कपाट, बर्फ अस्तरित शीतपेटी, सुवाह्य शीतपेटी (cold box), बर्फाची डबी (ice pack) यांसारख्या साधनांचा समावेश असतो, जे लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर तापमान नियंत्रित ठेवतात.

बर्फ अस्तरित शीतपेटी आणि अतिथंड शीतपेटी ही शीत साखळीमध्ये वापरली जाणारी वैशिष्ट्यपूर्ण उपकरणे आहेत. या उपकरणांची रचना विशिष्ट तापमान श्रेणी (temperature range) राखण्याच्या हेतूने केलेली असते. बर्फ अस्तरित शीतपेटीचा वापर २° ते ८° से. तापमानाला लस साठविण्यासाठी केला जातो. अंतर्गत बर्फाचे अस्तर (२° ते ८° से. internal ice lining) हे या शीतपेटीचे वैशिष्ट्य आहे. बर्फ अस्तरित शीतपेटीचा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतरची अधिधारणक्षमता सु. २० तासांपर्यंत असू शकते. अतिथंड पेटी ही -१५° ते -२५° से. या ऋण तापमान श्रेणीला बर्फाची डबी किंवा इतर गोठवलेले पदार्थ साठवण्यासाठी वापरली जाते.

लस योग्य तापमानात राहिली नाही, तर ती खराब होते आणि शरीरामध्ये संबंधित रोगविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास अकार्यक्षम ठरते तसेच काहीवेळा दुष्परिणाम सुद्धा दिसून येतात, ज्यामुळे लसीकरण प्रक्रिया निष्फळ ठरते. म्हणूनच, शीत साखळी ही लसीकरणाच्या यशस्वितेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

आ. ३. लस कुपी नियंत्रक सूचना.

लस कुपी नियंत्रक (Vaccine Vial Monitor; VVM) : लस कुपी नियंत्रक हे लशीच्या कुपीवर लावलेली लहान चिकटचिठ्ठी (sticker) आहे, ज्यामुळे लस साठवणूक, वाहतूक किंवा हातळणी दरम्यान जास्त उष्णतेच्या संपर्कात आली की नाही हे तपासता येते. लस नियोजित तापमानापेक्षा अधिक तापमानच्या संपर्कात आली तर चिकटचिठ्ठीचा रंग बदलतो, अशी व्हीव्हीएम ची रचना केलेली असते. अनेक लशी उष्णता-संवेदनशील असतात. जर त्या जास्त वेळ उष्णतेच्या संपर्कात आल्या, तर त्या खराब झाल्यासारख्या दिसत नसल्या तरी, त्यांची कार्यक्षमता कमी होते.  लस वापरण्यासाठी अजूनही योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी व्हीव्हीएम चे आरोग्य कर्मचाऱ्यांना साहाय्य होते. व्हीव्हीएमवर वर्तुळाच्या आत चौरस अशी एक आकृती असते. लस जेव्हा उष्णतेच्या संपार्कात येते तेव्हा चौरसाचा रंग गडद होत जातो. जोपर्यंत चौरसाचा रंग वर्तुळाच्या रंगापेक्षा फिकट असतो तोपर्यंत लस वापरण्यास योग्य असते. परंतु जर चौरसाचा रंग वर्तुळाच्या रंगासमान किंवा गडद झाला तर ती लस वापरू नये.

महत्त्वाची नोंद : व्हीव्हीएम उष्णतेच्या संपर्कावर लक्ष ठेवतात, गोठण्यावर नाही. काही लशी गोठल्यामुळे खराब होऊ शकतात आणि व्हीव्हीएम ते दर्शवत नाहीत. म्हणून परिचारिका  नेहमी VVM तपासून मगच लस वापरतात.

आ. ४. नियोजित स्थळी लस घेऊन जाताना परिचारिका.

शीतसाखळीमध्ये परिचारिकेची भूमिका :

१. साठवणूक (सुविधा/आरोग्य केंद्रात) :

  • तापमानाचे निरीक्षण : योग्य तापमापक (किमान-कमाल/अंकिय) वापरून शीतकपाटाचे तापमान नियमितपणे तपासून नोंद ठेवावी (दिवसातून किमान दोन वेळा) जेणेकरून ते २° ते ८° से.च्या दरम्यान राहील .
  • उपकरणांची मांडणी : नियुक्त केलेले शीत कपाट / सुवाह्य शीतपेटी वापरावी, उपकरणांची जास्त गर्दी करू नये जेणेकरून हवा खेळती राहील, लशी साठवलेल्‍या पेट्या भिंत/दारापासून दूर ठेवावी आणि लशी कधीही गोठवण यंत्र किंवा कक्ष यामध्ये (freezer) साठवू नये.
  • लशीची गुणवत्तापूर्वक हाताळणी :  लस शीत कपटामध्ये योग्य पद्धतीने त्यांच्या प्रकारानुसार ठेवणे म्हणजेच गोठणाऱ्या लशी जास्त थंड भागात, न गोठणाऱ्या लशी कमी थंड भागात ठेवणे. लशी गोठण्यापासून वाचवाव्यात आणि वापरण्यापूर्वी लस कुपी नियंत्रक तपासावा.

२. बांधणी आणि वाहतूक (packaging and transport) :

  • निवड : वाहतुकीच्या वेळेनुसार आणि प्रमाणानुसार योग्य सुवाह्य शीतपेटी निवडावी.
  • तयारी : योग्य पद्धतीने तयार केलेली (गोठवलेले, ओले नाही) बर्फाची पिशवी वापरावी आणि तापमान राखण्यासाठी लस वाहक योग्य रीत्या बंद  केले आहे याची खात्री करावी.
  • उष्णतेचा संपर्क कमी करणे : लसवाहक सावलीत ठेवावा, आवश्यकतेनुसारच ते उघडावा आणि थेट सूर्यप्रकाशापासून त्याचे संरक्षण करावे.

३. लसीकरण सत्राच्या ठिकाणी घ्यावयाची काळजी :

  • सत्र व्यवस्था : कामाचे क्षेत्र तयार करून, रुग्णांच्या नोंदी आणि लशीचे प्रकार पडताळून पहावेत.
  • स्थळ व्यवस्थापन : आवश्यक तेवढ्याच लशी लस वाहकात ठेवाव्यात; वाहकाच्या आत फोम तक्क्यावर उघडलेल्या कुपी ठेवाव्यात.
  • रुग्ण शिक्षण : लसीकरणाबाबत  सर्व माहिती पालकांना देवून, त्यांना लस कार्यपद्धती समजावून सांगावी आणि त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करावे.

परिचारिकेच्या सामान्य जबाबदाऱ्या :

  • प्रशिक्षण : इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे आणि रुग्णांना लसीकरणातील शीतसाखळीचे महत्त्व सांगावे.
  • अहवाल लेखन : सुधारात्मक कारवाईसाठी कोणत्याही प्रकारे तापमान प्रवास उल्लंघन झाल्यास त्वरित नोंदवून ठेवावा.
  • पद : बहुतेकदा संपूर्ण जबाबदारीसाठी लस आणि शीतसाखळी व्यवस्थापक (VCCH) म्हणून नियुक्त केले जाते.

संदर्भ :

समीक्षक : सिद्धी गणेश बांदेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.