प्रस्तावना : राष्ट्रीय बाल जीवित्व आणि सुरक्षित मातृत्व (CSSM) हा कार्यक्रम २० ऑगस्ट १९९२ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते भारतात सुरू करण्यात आला. ह्या कार्यक्रमांतर्गत माता आणि मुले यांच्यासाठी विशिष्ट सेवांचे नियोजन करून माता व मुलांमधील आजार व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी मानके ठरविण्यात आलेली आहेत. यामध्ये ग्रामीण भारतातील माता व मुले यांच्या रुग्ण सेवा व शुश्रूषा यात परिचारिकांचा तसेच आरोग्य कार्यकर्त्यांचा ( Nurse Midwife, ANM, MPHW-Fe) महत्त्वाचा आणि मोठा सहभाग असतो.
सुरक्षित मातृत्व सेवा :
- मासिक पाळी चुकल्यानंतर १२ ते १६ आठवड्यात गरोदर मातेची नोंदणी करून आणि संपूर्ण गरोदरपणात मातेची किमान तीन वेळा आरोग्य तपासणी करावी.
- गरोदर मातांना रोज १ गोळी याप्रमाणे १०० दिवसासाठी लोह व फॉलिक ॲसिड गोळ्या द्याव्यात आणि मातेस रक्तक्षय (Anemia) असल्यास रोज २ गोळ्या याप्रमाणे १०० दिवसासाठी द्याव्यात. टीटॅनस टॉक्साइड (Tetanus Toxide) हे इंजेक्शन आणि गरोदरपणाच्या दुसऱ्या / तिसऱ्या तिमाहीतील मातेस पोटातील कृमिनाशक औषध जरुरीप्रमाणे द्यावे.
- सुरक्षित, स्वच्छ व आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात प्रसूतीसाठी समुपदेशन करावे व त्याप्रमाणे सेवा पुरवावी. प्रसूती प्रशिक्षित सुईण अथवा परिचारिकेकडूनच करावी.
- गरोदर स्त्रीला होणाऱ्या बाळास जन्मल्यानंतर अर्धा तासात व पुढे बाळ ६ महिन्याचे होईपर्यंत निरंतर स्तनपानासाठी प्रेरित करावे. प्रसूतीपश्चात घ्यावयाची माता व बाळाची काळजी समजावून सांगावे व माता व पित्याला कुटुंब नियोजनाविषयी माहिती पुरवावी.
- रक्तक्षय, प्रसूतिपूर्व किंवा प्रसूतिपश्चात होणारा अति रक्तस्राव, गरोदर मातेच्या वजनात एका महिन्यात ३ किलोपेक्षा अधिक वाढ, रक्तदाबात वाढ (१४०/ ९० mmHg), प्रसूतिपश्चात किंवा गर्भपात झाल्यावर अधिक ताप (३९० से. किंवा त्यापेक्षा जास्त), अवघड किंवा अवघडलेली प्रसूती यांसारख्या क्लिष्ट समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करावे.
- गुंतागंतीची किंवा जोखमीची प्रसूती असणाऱ्या गरोदर मातांसाठी प्राथमिक सेवा पुरवून विनाविलंब संदर्भीत आरोग्य केंद्रात रवाना करण्याची सोय करावी.
- प्रजनन वयोगटातील स्त्रियांचे समुपदेशन करावे. लहान कुटुंबाचे फायदे, दोन मुलांमधील अंतर, कुटुंबनियोजनाची साधने यांविषयीची मार्गदर्शन करावे, तसेच कायदेशीर गर्भपात सेवा देण्यासाठी नियोजन करावे.
बाल जीवित्व सेवा :
- नवजात शिशु : जन्मत: गुदमरलेल्या शिशुचे कृत्रिम रीत्या पुनरुत्थान करावे, बाळाचे वजन कमी असल्यास त्याची विशेष काळजी घ्यावी आणि शरीराचे तापमान स्वाभाविक ठेवण्यासाठी त्याला कपड्यात व्यवस्थित गुंडाळावे. स्वाभाविक वजनाच्या बाळास अर्धा ते एक तासात स्तनपानासाठी मातेजवळ द्यावे. स्वाभाविक शारीरिक आरोग्य असलेल्या नवजात शिशुंना बी. सी. जी., पोलिओ, हिपॅटायटिस बी यांसारखे डोस योग्य वेळेत द्यावेत आणि अस्वाभाविक बालकांना गरजेनुसार संदर्भसेवा देण्याचे नियोजन करावे.
नवजात शिशुची आवश्यक ती काळजी घेण्याकरिता मातेला पुढील गोष्टींचे मार्गदर्शन करावे : बाळाच्या शरीराचे स्वाभाविक तापमान राखणे; जंतुसंसर्गापासून बचाव; बाळाला स्तनपान कसे करावे व सहा महिन्यानंतर वरचा आहार कसा आणि काय द्यावा; एक वर्षापर्यंतचे डी. टी. पी., पोलिओ, हिपॅटायटीस बी, जीवनसत्त्व अ, गोवर इ. लसीकरण व डोस यांची माहिती देणे.
- एक ते पाच वर्षे वयोगट : या वयोगटातील बालकांच्या लसीकरणाची संपूर्ण माहिती तक्ता स्वरुपात पालकांना द्यावी. पोटात होणाऱ्या कृमींसाठी तपासणी करून वैद्यकीय सल्ल्याने औषध द्यावे. मुलांमध्ये रक्तक्षय आढळल्यास लोह व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या द्याव्यात.
जुलाब व अतिसार यांमुळे होणारे मृत्यू टाळण्याकरिता पालकांना पुढीलप्रमाणे आरोग्यविषयक मार्गदर्शन करावे : पाणी उकळून गार करून प्यावे, लिंबू सरबत पिण्यास द्यावे, घरगुती जलसंजीवनी (ओ.आर.एस.) बनविण्यास सांगावे, सर्वसाधारण स्वाभाविक आहार द्यावा, जास्त प्रमाणात जुलाब झाल्यास आरोग्य केंद्रात जाण्यासाठी संदर्भ सेवा द्यावी.
या वयोगटातील बालकांना श्वसनसंस्थेचे आजार झाले असल्यास त्यांची योग्य ती काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे तसेच वेळेवर संदर्भसेवा द्यावी जेणेकरून फुप्फुसांतील संसर्गामुळे होणारे मृत्यू टाळता येतील.
सारांश : बाल जीवित्व व सुरक्षित मातृत्व या कार्यक्रमाद्वारे माता आणि मुले यांच्यातील आजार आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी विशेषतः ग्रामीण आरोग्य सेवेत परिचारिकांचा महत्त्वाचा सहभाग असतो.
संदर्भ :