जागतिक स्तरावरील संशोधनांत चीनमधील मानवी जीवाश्म आणि दगडी हत्यारे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मानवाची उत्क्रांती, प्रारंभिक स्थलांतर, तांत्रिक विकास आणि प्रादेशिक विविधता यांविषयी अनेक प्रकारचे पुरावे चीनमध्ये मिळाले आहेत. १९२० मध्ये झोकोडीयन येथे सर्वांत प्रथम अश्मयुगीन हत्यारे आणि मानवी जीवाश्मांचे पुरावे (पेकिंग मानव) मिळाले होते. या शोधामुळे चीनमध्ये प्रागैतिहासिक पुरातत्त्वशास्त्राची सुरुवात झाली. सध्या ज्ञात असलेल्या संशोधनानुसार अनेक पुरातत्वीय स्थळांवर अश्मयुगीन पुरावे मिळाले आहेत. या स्थळांची स्थळांची कालानुक्रमिक मांडणी पुढीलप्रमाणे :
उत्तर चीनमधील शांक्सि (शान्सी) प्रांतातील शांगचेन (Shangchen) येथे सर्वांत जुनी म्हणजे २१ ते १२ लाख वर्षांपूर्वीची दगडी हत्यारे सापडली आहेत. शिहोडो (Xihoudu) येथे २४ ते १८ लाख वर्षांपूर्वीची दगडी हत्यारे आणि अग्नीचे पुरावे सापडले आहेत; परंतु याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकवाक्यता दिसत नाही.
इ. स. १९६५ मध्ये युनान प्रांतातील (नैर्ऋत्य चीन) युआनमोऊ खोऱ्यातील (Yuanmou Basin) शांगनाबँग (Shangnabang) जवळ मानवी दाताचे दोन जीवाश्म आणि एक पोटरीचे हाड (tibia) मिळाले. याचे कालमापन १७.७ लाख वर्षपूर्व असे आहे. हे मानवी जीवाश्म चीनमधील सर्वांत जुने असून यास ‘युआनमोऊ मानव’ असे म्हटले आहे. हा ‘युआनमोऊ मानव’ इरेक्टस मानवाची एक उपप्रजाती आहे.
शांक्सि प्रांतातील लँटियान (Lantian) कौंटीमध्ये इरेक्टस मानवाचे जीवाश्म दोन स्थळांवर मिळाले आहेत. गाँगवाँगलिंग (Gongwangling) या स्थळावर मानवी कवटी मिळाली आणि चेनचियावो (Chenchiawo) येथे मानवी जबडा मिळाला. याचे कालमापन १६ लक्ष ते ७ लक्ष वर्षपूर्व असे आहे.
चीनच्या हुबेई प्रांतात युनशियान (Yunxian) येथे इरेक्टस मानवाच्या ११ लक्ष ते ८ लक्ष वर्षपूर्व काळातील दोन अश्मीभूत कवट्या मिळाल्या. याच हुबेई प्रांतातील नीहेवान खोऱ्यात लोएस आणि सरोवराच्या गाळातून १६ ते १० लक्षपूर्व काळातील दगडी हत्यारे मिळाली.
बीजिंग शहराजवळ असलेले झोकोडीयन (Zhoukoudian) हे चीनमधील पहिले वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासले गेलेले पुरातत्त्वीय स्थळ असून येथे १९२७ मध्ये चीनमधील सर्वांत प्रथम मानवी कवटीचे जीवाश्म आणि दगडी हत्यारे मिळाली. झोकोडीयन येथील एका गुहेत मिळालेल्या पहिल्या मानवी कवटीस सिनॅन्थ्रोपस पेकिनेन्सिस (Sinanthropus pekinensis)/ पेकिंग मानव) म्हणून ओळखले जाते. याचे कालमापन ७.७ ते २.३ लक्षपूर्व असे आहे.
शांक्सि प्रांतातील दाली (Dali) कौंटीमध्ये लक्ष वर्षांपूर्वीच्या मानवी कवटीचे जीवाश्म सापडले ज्यास ‘दाली मानव’ (Dali man) असे म्हणतात. या जीवाश्माचे महत्त्व असे की, इरेक्टस मानव आणि आधुनिक मानव यांच्यातील संक्रमणीय (transitional) अवस्थेचा हा सबळ पुरावा आहे. यास आद्य मानव (archaic human) असेही म्हणतात.
दाली मानवासरखाच आणि तितकाच जुना आणखी एक पुरावा चीनच्या ईशान्य भागातील लिओनिंग (Liaoning) प्रांतातील जीनीउशान (Jinniushan) येथे मिळाला आहे. या ठिकाणी आद्य मानवाचे जवळजवळ पूर्ण सांगाड्याचे अवशेष सापडले. यास ‘जीनीउशान मानव’ (Jinniushan Man) असे म्हटले जाते. हा आद्य मानव देखील २.६ लक्ष वर्षपूर्वीचा आहे.
माबा (Maba), गुआनडाँग प्रांत, दक्षिण चीन येथील चुनखडीच्या गुहेतून मिळालेल्या आद्य मानवाच्या कवटीचा वरचा भाग (skull cap) २.१५ लक्षवर्षपूर्व जुना आहे. यास ‘माबा मानव’ (Maba man) असे म्हणतात.
याशिवाय सुमारे १.६ लक्ष वर्षांपूर्वीच्या डेनिसोव्हा मानवांचे अस्तित्व बैशिया कार्स्ट गुहेत (Baishiya Karst Cave) येथे होते. चीनमध्ये अनेक ठिकाणी प्रारंभिक आधुनिक मानवाच्या (early Homo sapiens) अस्तित्वाचे १.२ लक्ष ते ८०,००० वर्षांपूर्वीचे पुरावे फुयान गुहेत (Fuyan Cave) आणि झीरेन गुहेत (Zhiren Cave) १ लक्ष वर्षांपूर्वीचे आहेत. तर तियानयुआन गुहेत (Tianyuan Cave) पूर्णतः आधुनिक मानव ४०,००० वर्षांपूर्वी रहात होता. लिऊजियांग (Liujiang) येथे ७०,००० ते २०,००० वर्षांपूर्वीचे (वादग्रस्त) मानवी जीवाश्म मिळाले आहेत.
वरील माहितीनुसार चीनमध्ये आद्य प्लाइस्टोसीन काळापासूनचे अश्मयुगीन हत्यारे आणि मानवी जीवाश्मांचे अनेक पुरावे मिळाले आहेत. हे पुरावे मानव उत्क्रांतीचा इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ते प्रारंभिक स्थलांतर, प्रादेशिक जुळवून घेणे, प्रजातींची विविधता आणि विविध होमिनिन गटांमधील परस्परसंवाद आणि आंतरप्रजनन (interbreeding) यांविषयी योगदान देतात.
संदर्भ :
- Pei Shuwen; Xing Gao; Xianzhu Wu; Xiaoli Li & Christopher J. Bae., ‘Middle to Late Pleistocene hominin occupation in the Three Gorges region, South China’, Quaternary International, Vol. 295, pp. 237-252, 2013.
- Yang, Shi-Xia; Jian-Ping Yue; Xinying Zhou; Michael Storozum; Fa-Xiang Huan; Cheng-Long Deng & Michael D. Petraglia, ‘Hominin site distributions and behaviours across the Mid-Pleistocene climate transition in China’, Quaternary Science Reviews, Vol. 248, 2020.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
