ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस (Australopithecus afarensis) ही मानवी उत्क्रांतीशी थेट संबंध असलेली व दीर्घकाळ अस्तित्वात असलेली प्रजात होती. हे मानवसदृश प्राणी सुमारे ३८.५ लक्षपूर्व ते २९.८ लक्षपूर्व असे सुमारे ९ लाख वर्षे अस्तित्वात होते. आपल्या मानव प्रजातीच्या तुलनेत हा कालखंड चार पटीने जास्त आहे. या प्रजातीचे जीवाश्म इथिओपिया, केनिया आणि टांझानिया एवढ्या विस्तृत प्रदेशात आढळले आहेत. इथिओपियात हडार (Hadar) येथे मिळालेल्या सुप्रसिद्ध ल्युसीचा (ए.एल. २८८-१) समावेश या प्रजातीत होतो. मेरी लिकी यांना १९७८ मध्ये मिळालेला जबड्याचा जीवाश्म (एल.एच. ४) हा या प्रजातीचा अधिकृत नमुना मानला जातो. या खेरीज २००५ मध्ये ३६ लाख वर्षांपूर्वीच्या उंच नराची (१६० सेंमी.) अर्धी हाडे मिळाली. हा नर ल्सुसीचा मोठा भाऊ म्हणून प्रसिद्ध असून त्याचे ‘कडानूम्मूʼ (Kadanuumuu) म्हणजे ‘अफारचा मोठा माणूसʼ असे नामकरण करण्यात आले आहे.

ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस प्रजातीच्या ३०० पेक्षा जास्त प्राण्यांचे जीवाश्म मिळाल्याने प्रजातीच्या जीवनक्रमाबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे. हडार येथे १९७५ मध्ये एकाच ठिकाणी ९ प्रौढ व ४ बालवयीन प्राण्यांचे जीवाश्म (एएल ३३३) मिळाले. हे जीवाश्म ‘पहिले कुटुंबʼ या नावाने प्रसिद्ध आहेत. बहुधा ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस कुटुंबसदृश बंध असलेले छोटे गट या प्रकारे राहत असावेत. प्रत्यक्ष जीवाश्मांखेरीज टांझानियात लेटोली (Laetoli) येथे ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस प्राण्यांच्या पावलांचे ठसे मिळाले आहेत. दोन पायांवर एकापाठोपाठ प्रौढ प्राणी चालत होते, हे दर्शवणारे पावलांचे ठसे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस हे नामकरण १९७८ मध्ये झाल्यानंतर त्या अगोदर म्हणजे १९३० ते १९४० दरम्यान मिळालेल्या अनेक जीवाश्मांचा समावेश या प्रजातीत करण्यात आला.

या प्रजातीच्या शरीरचनेत कपी व मानव यांच्याशी साम्य असलेली लक्षणे दिसतात. त्यांचा खालचा जबडा कपिंप्रमाणे पुढे येणारा असून नाक चपटे होते. तसेच कवटीचे आकारमान ५०० घन सेंमी.पेक्षा कमी होते. त्यांचे सुळे (Canine teeth) मानवांप्रमाणे आकाराने छोटे होते. हाताच्या बोटांची रचना झाडांमध्ये वावरण्यासाठी योग्य असली, तरी ते नियमितपणे दोन पायांवर चालत असावेत. त्यांच्या कमरेच्या हाडांची आणि मांडीच्या हाडांची रचना दोन पायांवर चालायला अनुकूल होती. विशेषतः ३६ लाख वर्षांपूर्वीच्या लेटोली पाऊलखुणांवरुन हे प्राणी मानवाप्रमाणेच द्विपाद होते, हे स्पष्ट झाले आहे. ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस नरांची सरासरी उंची १५१ से सेंमी. व सरासरी वजन ४२ किग्रॅ. होते. तर माद्यांची सरासरी उंची १०५ सेंमी. व सरासरी वजन २९ किग्रॅ. होते. चिंपँझींच्या प्रमाणे ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस बालकांची वाढ झपाट्याने होत असल्याने ते मानवांच्या तुलनेत लवकर प्रौढ होत असत.

दातांची रचना आणि त्यांच्या झीजेच्या सूक्ष्म अभ्यासातून असे दिसते की, हे प्राणी सर्वसाधारणपणे मऊ वनस्पतीजन्य अन्न खात होते. इथिओपियात डिकिका (Dikika) येथे ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिसचे अवशेष मिळाले आहेत. त्याच ठिकाणी २०१० मध्ये इतर प्राण्यांचे जीवाश्म मिळाले. या जीवाश्मांतील हाडांवर कापल्याच्या खुणा होत्या. ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस प्राण्यांनी मांस मिळविण्यासाठी ही हाडे कापली अथवा फोडली असावीत, असे अनुमान काढण्यात आले आहे. साधारणपणे ३० लाख वर्षांपूर्वी अफारेन्सीस हा ऑस्ट्रलोपिथेकस आणि होमोच्या आद्यगटात उत्क्रांत झाला असावा.

 

संदर्भ :

  • Alemseged, Z.; Spoor, F.; Kimbel, W. ; Bobe, R.; Geraads, D.; Reed D. & Wynn, J. G. ‘A Juvenile Early Hominin Skeleton from Dikika, Ethiopiaʼ, Nature 443 : 296-300, 2006.
  • Johanson, D. & Edey, M. E. Lucy: The Beginnings of Humankind, Granada, St Albans, 1981.
  • Kimbel, W. H. & Delezene, L. K. ‘Lucy redux : A review of research on Australopithecus afarensisʼ, Yearbook of Physical Anthropology, 52 : 2-48, 2009.
  • Larsen, C. S. Our Origins, New York, W. W. Norton and Co., 2011.

समीक्षक – शौनक कुलकर्णी