ध्यानबिंदू उपनिषद् हे कृष्णयजुर्वेद या ग्रंथशाखेशी संबंधित आहे. मुक्तिका उपनिषदामधील १०८ उपनिषदापैकी २० उपनिषदे ही योगविषयक असून ध्यानबिंदू उपनिषद हे त्यापैकी एक महत्त्वाचे उपनिषद आहे. हे उपनिषद् पद्यरूप असून यात अनुष्टुप छंदात रचलेले एकूण १०६ मंत्र आहेत. ‘ध्यान’ हा या उपनिषदाचा मुख्य विषय आहे.

ध्यानबिंदू उपनिषदाची सुरुवात ब्रह्मध्यान योगाने केली आहे. यामध्ये सुरुवातीला ब्रह्मतत्त्वाची सूक्ष्मता व सर्वव्यापकता वर्णिली आहे. त्यानंतर प्रणवाचे स्वरूप कसे आहे, प्रणव साधना व प्राणायामपूर्वक प्रणव ध्यान कसे करावे यांचे विवेचन केले आहे. तसेच यात ज्ञानप्राप्तीसाठी ओंकाराचे महत्त्व अनेक रूपकांद्वारे सांगितले आहे. ओंकाररूपी एकाक्षर ब्रह्म हे सर्व साधकांचे लक्ष्य मानले जाते. हा ओंकार आठ अंग, चार पाद, तीन स्थान आणि पंचदेवतांनी युक्त आहे. या ओंकारापासून देव, स्वर आणि त्रिलोकातील सर्व स्थावर-जंगम पदार्थांची उत्पत्ती झाली असे वर्णन या उपनिषदात आले आहे. ध्यानबिंदू उपनिषदातील प्रणव ध्यान आणि मुंडकोपनिषदातील मंत्र यामध्ये साम्य आढळते. या उपनिषदात ब्रह्मध्यान, त्रिमूर्ती ध्यान, हृदय ध्यान, षडंग योग, नाडीचक्र, दहा प्राण, बंध, मुद्रा, अजपाजप हंस विद्या, अष्टदल पद्म व नादानुसंधान या विषयांचे सविस्तर वर्णन केले असून त्याद्वारे कैवल्यप्राप्तीचे लाभ स्पष्ट केले आहेत.

ब्रह्मा, विष्णू व रुद्र या अनुक्रमे प्राणायामातील पूरक, कुंभक आणि रेचक यांच्या देवता सांगितल्या आहेत. परंतु, पुढे प्राणायामासह प्रणव ध्यान करत असताना पूरक करताना विष्णूचे, कुंभक करताना ब्रह्माचे आणि रेचक करताना शिवाचे ध्यान करावे असे निर्देश दिले आहेत. हृदय ध्यानाचे वर्णन करत असताना हृदयकमल हे खालच्या दिशेने उमललेल्या कदलीपुष्पासारखे म्हणजे केळीच्या फुलासारखे असून त्याला शंभर पाकळ्या आहेत असे वर्णन केले आहे. ब्रह्मध्यानात महाविष्णूच्या स्वरूपाचे सविस्तर वर्णन आढळते.

पातंजल योगसूत्रात अष्टांग योग सांगितला आहे; परंतु ध्यानबिंदू उपनिषदात यम-नियम यांना वगळून षडंग योग वर्णन केला आहे. शरीरातील हजारो नाड्यांमध्ये प्राण स्थित असतो. श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेत हा प्राण ‘ह’कार ध्वनीने बाहेर जातो आणि ‘स’कार ध्वनीने पुन्हा शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या प्रत्येक व्यक्तीकडून हंस∙∙ हंस∙∙  असा मंत्र जपला जातो. दिवस-रात्र मिळून हा जप २१,६०० वेळा होतो. श्वासाच्या माध्यमातून हा जप नित्य, सहज आणि निरंतर चालू असतो. विशेष प्रयत्न न करता होणाऱ्या या जपाला ‘अजपा गायत्री’ असे म्हणतात. या अविरत सुरू असणाऱ्या जपाशी एकाग्रतेने अनुसंधान करणाऱ्या योग्यांसाठी हा जप मोक्षदायक मानला जातो.

ध्यानबिंदू उपनिषदात आत्म्याचे वर्णन करताना अष्टदल संकल्पना मांडली आहे. हृदयाच्या ठिकाणी आठ पाकळ्यांचे कमळ पुष्प असून त्यात अणू इतक्या सूक्ष्म रूपात ज्योतिरूप आत्मा स्थित आहे. ध्यानबिंदू उपनिषदाच्या काही आवृत्त्यांमध्ये ९३ व्या मंत्रात १५ उपमंत्र दिलेले आहेत. यात जीवात्मा वेळोवेळी या आठ पाकळ्यांमध्ये प्रवेश करतो आणि प्रत्येक पाकळीत विश्रांती घेताना त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे सांगितले आहे – पूर्व दिशेच्या सफेद पाकळीत धर्म व भक्तीभावयुक्त, आग्नेय दिशेच्या रक्तवर्णी पाकळीत निद्रा व आलसयुक्त, दक्षिण दिशेच्या काळ्या पाकळीत द्वेषभाव व क्रोधयुक्त, नैऋत्य दिशेच्या निळ्या पाकळीत पापकर्म व हिंसकवृत्तीने युक्त, पश्चिम दिशेच्या स्फटिकाप्रमाणे शुद्ध वर्ण असणाऱ्या पाकळीत क्रीडा व विनोदाची अभिरुची असणारे, वायव्य दिशेच्या माणिकासारख्या लालसर पाकळीत वैराग्यसंपन्न, उत्तर दिशेच्या पिवळ्या पाकळीत सुखसाधन व शृंगारिकतेची अभिरुची असणारे आणि ईशान्य दिशेच्या वैदूर्य रत्नासारख्या रंगाच्या पाकळीत दानपुण्य व अनुग्रहाची प्रवृत्ती असणारे. जीवात्मा सर्वज्ञ, सर्वकर्म करणारा आणि हृदयातच प्रतिष्ठित असतो.

आत्मस्वरूप साक्षात्कारासाठी या उपनिषदात ‘नादानुसंधान’ सांगितले आहे – त्यासाठी प्रथम पंचप्राण आणि पंचमहाभूतांचे ध्यान करून अंत:करणाच्या सर्व वृत्तींना हृदयकमलात आकर्षित करावे. तेथे प्राणापानाचे बंधन करून प्रणवोच्चार करावा. मूलबंध, उड्डीयान बंध आणि जालंधर बंध या तीनही बंधांच्या साहाय्याने नादाची अभिव्यक्ती होते, त्यावेळी अमूर्त नादाचे श्रवण करावे. आत्मतत्त्वामध्ये मनाचा लय केल्यावर आत्मसाक्षात्कार होतो. जो हे जाणतो तो कैवल्यपद प्राप्त करतो असे या उपनिषदाच्या शेवटी सांगितले आहे.

ध्यानबिंदू उपनिषदामध्ये योग आणि वेदान्त दर्शनांचा समन्वय केलेला आढळतो. तसेच योगसाधनेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या संकल्पना या उपनिषदात स्पष्ट केल्या आहेत.

संदर्भ :

  • पणशीकर, वासुदेवशास्त्री, ‘ईशाद्यष्टोत्तरशतोपनिषद:’, व्यास प्रकाशन, १९८३.
  • Ayyangar, R. Srinivasa (Tr.), The Yoga Upanishads, The Adyar Library, 1938.

 समीक्षक : बाळासाहेब वाघ


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.