योगशिखा-उपनिषद् (योगशिखोपनिषद्) हे कृष्ण यजुर्वेदाचे उपनिषद् पद्य शैलीत असून योगविषयक उपनिषदांमध्ये त्याची गणना केली जाते. प्रस्तुत उपनिषदामध्ये गुरू (महेश्वर) आणि शिष्य (ब्रह्मदेव) यांच्या प्रश्नोत्तररूपी संवादातून जीवाच्या ऐहिक आणि पारमार्थिक परम कल्याणासाठी आत्मज्ञानाचे विवेचन आले आहे. योगशिखा उपनिषदाच्या अथर्ववेदाशी संबधित लघू आवृत्ती आणि कृष्ण यजुर्वेदाशी संबधित दीर्घ आवृत्ती अशा दोन आवृत्ती अस्तित्वात आहेत. दीर्घ आवृत्तीत एकूण सहा अध्याय आढळतात. प्रस्तुत नोंदीत दीर्घ आवृत्तीचा विचार केला आहे.

प्रथम अध्यायाचे नाव ‘मुक्तिमार्ग जिज्ञासा’ असे आहे. यात एकूण १७८ श्लोक असून षट्चक्र निरूपणाने या अध्यायाचा शेवट होतो. हिरण्यगर्भ प्रजापती अर्थात ब्रह्मदेव संसारात बद्ध असलेल्या जीवाला मुक्ती कशी मिळेल, सर्व सुखांची व सिद्धींची प्राप्ती कशी होईल आणि दु:खांचा नाश कसा होईल, असे शंकराला विचारतात. यावर शंकर असे विधान करतात की, कैवल्य केवळ शास्त्राचा अभ्यास करून प्राप्त होऊ शकत नाही. मोक्षाची इच्छा असणाऱ्या साधकाने ज्ञान आणि योग या दोनही मार्गांचा अवलंब  करावा. ज्ञानमार्गाचा अवलंब केल्यामुळे साधकाच्या अज्ञानाची निवृत्ती होऊन तो स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करतो आणि काम, क्रोध, भय इत्यादी दोषांपासून मुक्त होऊन परमपद अर्थात कैवल्य साध्य करतो. मात्र ज्ञानी मनुष्याला योगाशिवाय मोक्षप्राप्ती नाही. साधकाचे अपरिपक्व आणि परिपक्व असे दोन प्रकार सांगितले  आहेत. योगरहित साधक अपरिपक्व, तर योगसहित साधक परिपक्व होय. ज्याने मन, बुद्धी, काम, क्रोध आणि इंद्रिय यांवर विजय मिळविला आहे तो योगी श्रेष्ठ होय. जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यास योग असे म्हटले आहे.

प्रस्तुत अध्यायात योगशिखेचे निरूपण केले आहे. ईश्वराचे ध्यान करून शरीराच्या मध्यभागी आदित्य मंडलाप्रमाणे आकृती असलेल्या किरण-रूप ज्वालांनी युक्त अशा अग्नीला, दीपाच्या मध्यभागी जळणाऱ्या वातीप्रमाणे प्रज्वलित करावे. हा अग्नी प्राणतत्त्वाने प्रज्वलित होतो. या अध्यायात  मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग या चारही योगांचे संक्षिप्त वर्णन आढळते. या चार प्रकारांच्या योगास एकत्रितपणे ‘महायोग’ अशी संज्ञा आहे. अभ्यासानेच महायोगात सफलता प्राप्त होते.

योगाभ्यासासाठी प्राणावर विजय मिळविण्याची सिद्धी प्राप्त केलेल्या गुरूची निवड करावी. अशा गुरूंच्या उपदेशानुसार साधकाने प्राणावर विजय मिळवावा. सरस्वतीचालन, कुंडलिनीचालन आणि कुंडलिनीजागृतीची सविस्तर प्रक्रिया येथे विशद केली आहे. तसेच मानवी शरीरांतर्गत कामरूप पीठ, पूर्णगिरीपीठ, जालंधर पीठ आणि उड्याण पीठ ह्या चार पीठांचे आणि त्या अनुषंगाने षट्चक्रांचे निरूपण आढळते. जीवन्मुक्ताचे आणि सिद्ध पुरुषाचे वर्णनही या अध्यायात आले आहे.

द्वितीय अध्यायाचे नाव ‘योगज्ञानाधिकारी’ असे आहे. यात एकूण २२ श्लोक असून योगज्ञानाचा अधिकारी कसा असावा ह्याचा उपदेश प्रस्तुत अध्यायात केला आहे. तो इंद्रियनिग्रह करणारा, ब्रह्मचारी, बारा वर्षे प्रमादरहित सेवा करणारा आणि यथार्थ बोलणारा असा असावा. गुरूने धनलोभाने अयोग्य साधकास योगविद्येचा उपदेश करू नये.

येथे प्रणव ह्या मूलमंत्राचे माहात्म्य विशद केले आहे. हा मंत्र सर्व मंत्रांचे मूळ आहे. तो सर्व सिद्धींचे कारण आहे. ह्या मंत्राद्वारे परमेश्वराच्या ठिकाणी मनाचा लय होतो. या व अन्य लक्षणांमुळे प्रणवास मूलमंत्र आणि परमेश्वराचे लिंग (प्रतीक) असेही म्हणतात. ह्या मंत्राचे सर्व प्राण्यांमध्ये निरंतर अस्तित्व असल्यामुळे आणि तो परमेश्वराच्या स्वरूपाचा सूचक असल्यामुळे ह्या मूलमंत्रास सूत्र असेही म्हटले आहे. सूत्र म्हणजे सर्वांना एकत्र आणण्याचे साधन. प्रणवाचे बिंदूपीठ अर्थात जिच्यापासून विश्वाचा प्रारंभ होतो त्या अव्यक्त आधाररूप शक्तीला महामाया, महालक्ष्मी आणि सरस्वती असेही संबोधिले जाते. प्रणवाच्या अभ्यासाने शुद्ध आत्मस्वरूप जाणले जाते. नादानुसंधानाचे महत्त्व थोडक्यात सांगितले आहे. गुरुभक्ती आणि ईश्वरभक्तीचे महत्त्व विशद करण्यासाठी श्वेताश्वतर उपनिषदामध्ये ‘ज्याची ईश्वर आणि गुरूंवर अढळ श्रद्धा असते, त्या महात्म्याला उपनिषदात वर्णिलेली तत्त्वे ज्ञात होतात’, असे सांगितले आहे (श्वेताश्वतर उपनिषद्  ६.२२).

तृतीय अध्यायाचे नाव ‘नादब्रह्मण: परापश्यन्त्यादिरूपचतुष्टयम्’ असे आहे. यात एकूण २५ श्लोक आहेत. अध्यायाच्या नावावरूनच हे स्पष्ट होते की या अध्यायात परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे अर्थात नादब्रह्माचे चार प्रकार विशद केले आहेत. तसेच शब्दब्रह्माची उपासना सांगितली आहे. शब्दब्रह्माच्या उपासनेने परब्रह्माची प्राप्ती होते, असे म्हटले आहे.

चौथ्या अध्यायाचे नाव ‘जीवत्वस्य असत्यत्वम्’ असे आहे. यात एकूण २४ श्लोक आहेत.  ‘जीवत्वस्य असत्यत्वम्’ याचा अर्थ जीवाचे मिथ्या स्वरूप असा होतो. अर्थात जीवात्मा, व्यावहारिक जग हे मिथ्या असून केवळ ब्रह्मतत्त्व हेच सत्य आहे. ज्याप्रमाणे  दोरीवर सर्पाचा आभास होतो, त्याप्रमाणे चैतन्यावर जीवाचा आभास होतो. चैतन्यरूप ब्रह्म विश्वरूपाने भासते. ज्याप्रमाणे सोने दागिन्यांच्या रूपात भासते, त्याप्रमाणे ब्रह्म हे विश्वाच्या रूपाने भासते. जीवात्म्याच्या जाग्रत् (जागृत), स्वप्न व सुषुप्त ह्या तीन अवस्था देखील मिथ्या आहेत. या अवस्थांना पाहणारा अर्थात या अवस्थांचा द्रष्टा किंवा साक्षी चैतन्यरूप आत्मा हा शाश्वत आणि निरंतर सत्य आहे. ज्याप्रकारे घटाच्या स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर घट म्हणजे  वस्तुत: मातीच आहे हे कळते, त्याप्रमाणे प्रपंचाचे ज्ञान झाल्यावर प्रपंच म्हणजे तेजस्वी ब्रह्मच आहे असे ज्ञान प्राप्त होते.

पाचव्या अध्यायाचे नाव ‘देहस्य विष्ण्वालयत्वम्’ अर्थात ‘देह विष्णूचे मंदिर आहे’ असे आहे. यात एकूण ६२ श्लोक आहेत. या अध्यायात शरीरातील षट्चक्रांचे त्याचप्रमाणे नाडी चक्राचे वर्णन आले आहे. सहा चक्रांचा आधार असलेल्या पीठांचा निर्देश येथे केला आहे. सुषुम्ना (ब्रह्मनाडी), इडा, पिंगला, विलंबिनी, गांधारी, हस्तिजिह्वा, पूषा, अलंबुसा, शूरा, विश्वोदरी, सरस्वती, राका, शंखिनी, कुहू, वारुणी आणि सीविनी ह्या नाड्यांचे स्थान आणि कार्य विशद केले आहे. खेचरीमुद्रा आणि विविध प्रकारची धारणा या अध्यायात सांगितली आहे. पृथ्वीतत्त्व, जलतत्त्व, अग्नितत्त्व, वायुतत्त्व आणि आकाशतत्त्व या तत्त्वांवर चित्ताच्या धारणेचा उपदेश केला आहे. कुंडलिनी शक्तीच्या चालन आणि जागरण प्रक्रियेच्या वर्णनाची येथे पुनरुक्ती आढळते. कुंडलिनीसाधनेमुळे साधकाला सर्व सिद्धी प्राप्त होतात. कुंडलिनीचे ज्ञान गुरूंच्या उपदेशानेच शक्य आहे म्हणून गुरूपूजनाचे विधान आणि महत्त्व विशद केले आहे. गुरूंची भक्तिभावाने सेवा करावी. साधकाने गुरूंशी तात्त्विक वाद करू नये. ज्या साधकाला योगशिखेचे ज्ञान होते, तो सर्वज्ञ होतो आणि त्याला मोक्षही मिळतो.

सहाव्या अध्यायाचे नाव ‘कुण्डलिनीशक्ते: उपासनाविधि:’ अर्थात् ‘कुंडलिनी शक्तीची उपासना’ असे आहे. यात एकूण ७९ श्लोक आहेत. जीव प्राणवायूसह सुषुम्ना नाडीत प्रवेश करतो आणि ऊर्ध्वगामी होतो. जीवात्मा प्राण आणि अपान वायूच्या साहाय्याने शरीरात वर-खाली संचारण करतो. तो डाव्या आणि उजव्या म्हणजेच अनुक्रमे इडा आणि पिंगला नाडींच्या मार्गामध्ये सदैव गतिमान असल्याने दृष्टीस पडत नाही. अपान वायू प्राणवायूला आकर्षित करतो, त्याचप्रमाणे प्राणवायू अपान वायूला खेचतो. प्राणवायू ‘ह’ काराच्या रूपात  बाहेर जातो आणि ‘स’ काराच्या रूपात पुन्हा आत येतो. याप्रमाणे जीव ‘हंस, हंस’ या मंत्राचा सतत जप करतो. प्राण आणि चित्त हे परस्परावलंबी आहेत.

घड्यामध्ये असणाऱ्या दिव्याचा प्रकाश बाहेर दिसू शकत नाही. परंतु, घडा फुटल्यावर दिव्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो. जीवाचे शरीर हासुद्धा घडा आहे आणि त्यात राहणारा जीव ‘तत्’ म्हणजे आत्मा आहे. देहाचा त्याग केल्यावर जीव आत्म्यात विलीन होतो.

पहा : यजुर्वेद.

संदर्भ : दलाई, बी.के.,योगोपनिषद्, संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, पुणे, २०१५.

                                                                                                समीक्षक : कला आचार्य