अंतर्धान ही एक सिद्धी असून पातंजल योगसूत्राच्या विभूतिपादात हिचा उल्लेख आहे. पतंजली महर्षींनी ‘कायरूपसंयमात् तद्ग्राह्यशक्तिस्तम्भे चक्षुष्प्रकाशासम्प्रयोगे अंतर्धानम्’ (३.२१) सूत्रात या सिद्धीचे वर्णन केले आहे. ही एक भौतिक सिद्धी आहे. कोणत्याही पदार्थाच्या रूपाचे प्रत्यक्ष ज्ञान होण्याकरिता पुढील घटकांची आवश्यकता असते — (१) पदार्थाला रूप असणे, (२) नेत्रेन्द्रिय आणि पदार्थ यांचा संबंध असणे, (३) आवश्यक प्रकाश असणे. हे तीनही घटक असतील तरच वस्तूच्या रूपाचे प्रत्यक्ष ज्ञान होते, अन्यथा नाही. वाचस्पति मिश्र यांच्या मतानुसार शरीर पंचगुणात्मक असल्याने शरीराला रूप देखील आहे आणि रूपाचे ज्ञान चक्षु (डोळे) या इंद्रियाद्वारे होते.

पतंजली महर्षींनी अंतर्धान सिद्धीचे वर्णन करताना म्हटले आहे की, शरीराच्या रूपावर संयम (धारणा, ध्यान आणि समाधी) करणाऱ्या योग्याला ही प्राप्त होते. स्वत:च्या शरीराची दिसण्याची जी शक्ती आहे तिला योगी संयमाद्वारे स्तंभित करतो (नियंत्रित करतो). असे केल्याने योग्याच्या शरीराच्या रूपाचे ज्ञान इतरांना होऊ शकत नाही, कारण ग्राह्यशक्ती स्तंभित केल्यामुळे इतरांच्या नेत्रेन्द्रियाचा योग्याच्या शरीराशी संबंध होऊ शकत नाही. योग्याचे शरीर अन्य व्यक्तींना दिसू शकत नाही, हिलाच अंतर्धान नावाची सिद्धी असे म्हणतात.

महर्षी पतंजलींनी सूत्रामध्ये जरी फक्त रूप अंतर्धानाचे उदाहरण दिले असले तरी शब्द, स्पर्श, रस आणि गंध या इतर गुणांविषयीही अशा प्रकारे अंतर्धान होऊ शकते असे समजावे. उदा., योग्याने जर स्वतःच्या शरीराची स्पर्श ग्रहण करण्याची शक्ती स्तंभित केली, तर अन्य व्यक्तींना योग्याच्या शरीराचा स्पर्श जाणवणार नाही, यालाच स्पर्श-अंतर्धान असे म्हणतात. अशा प्रकारे त्या त्या गुणांच्या शक्ती स्तंभित केल्याने त्यांचे ज्ञान इतरांना होऊ शकणार नाही, असे योगभाष्यात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

संदर्भ :

  • आगाशे, काशिनाथशास्त्री (संपा.), पातञ्जलयोगसूत्राणि, पुणे, १९०४.
  • कर्णाटक, विमला (संपा.), पातञ्जलयोगदर्शनम्, वाराणसी, १९९२.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर