हठयोगातील एक पारंपरिक आसन. भूनमनासन या शब्दातील ‘भू’ म्हणजे जमीन किंवा भूमी, ‘नमन’ म्हणजे नमस्कार आणि ‘आसन’ म्हणजे स्थिर व सुखकर स्थिती. या आसनात शरीराच्या विशिष्ट स्थितीत भूमीला वंदन केले जाते. त्यामुळे या आसनास भूनमनासन म्हणतात.
कृती : सर्वप्रथम दंडासनामध्ये (पूर्वस्थिती) बसावे. शारीरिक क्षमतेनुसार दोन्ही पायांमधील अंतर वाढवत पाय रुंद पसरावेत. ही कृती करताना दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये सरळ ठेवावेत. त्यानंतर दोन्ही हातांच्या साहाय्याने पावलांची बोटे किंवा अंगठे पकडावेत. यानंतर श्वास घेऊन श्वास सोडत कमरेतून पुढे येत प्रथम पोटाचा भाग, छाती व त्यानंतर हनुवटी जमिनीला लावावी. सामान्य गतीने श्वासोच्छ्वास करत आसनाची ही अंतिम स्थिती आपल्या क्षमतेनुसार धारण करावी (पहा आ. १. भूनमनासन). अंतिम स्थितीतून पूर्वस्थितीत येताना श्वास घेत डोके, छाती व पोट या क्रमाने कमरेतून सरळ वर यावे. पूर्वस्थितीमध्ये आल्यानंतर बैठक स्थितीत येऊन विश्रांती स्थितीत बसावे. हे आसन दीर्घकाळ धारण केल्याने एकाग्रता साधता येते आणि ध्यानाची अवस्था प्राप्त करणे शक्य होते. हे आसन दीर्घकाळ धारण करणे कठीण असले, तरीही सराव आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर या आसनावर प्रभुत्व मिळवणे शक्य होते. या आसनाची पूर्वतयारी म्हणून भद्रासन, प्रसारित पादोत्तानासन, चक्कीचलनासन, मलासन, उत्कट कोणासन या आसनांचा अभ्यास फायदेशीर ठरतो.

लाभ : हे आसन विशेषकरून पाठीच्या कण्याच्या लवचिकतेकरिता उपयुक्त आहे. या आसनाच्या अभ्यासाने मांडीचे स्नायू व मांसपेशी मजबूत होतात. हे आसन कंबरदुखी, बद्धकोष्ठता, मूळव्याध, मूत्रविकार यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. तसेच पचन व उत्सर्जन संस्थेचे कार्य सुधारते. नर्तकांसाठी हे आसन एक वरदानच आहे. या आसनामुळे अवटु (Thyroid) ग्रंथीचे कार्य सुरळीत होते. या आसनाचा नित्य अभ्यास स्त्रियांच्या आरोग्यासाठी परिणामकारक आणि लाभदायक आहे.
विधिनिषेध : हे आसन तीव्र पाठदुखी, आपाचक व्रण (Peptic ulcer), अंतर्गळ (Hernia), उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी करू नये. तसेच गर्भवती महिलांनीसुद्धा हे आसन करू नये. सुरुवातीला हे आसन शक्यतो योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावे.
बिहार स्कूल ऑफ योग या संस्थेने भूनमनासन आसनाची एक सुलभ पद्धत सांगितली असून, ती पुढीलप्रमाणे आहे.

कृती : प्रथम पूर्वस्थितीमध्ये म्हणजे दोन्ही पाय सरळ ठेवून बसावे. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवावेत. सुरुवातीला दोन्ही हात शरीराच्या उजव्या बाजूस न्यावेत व दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर ठेवावेत. उजवीकडे ९० अंशात वळून दोन्ही हात कोपरात दुमडून सावकाश कपाळाचा स्पर्श जमिनीला करावा. या स्थितीत पाठीच्या कण्याला पीळ दिला जातो. आसनाची ही अंतिम स्थिती सामान्य गतीने श्वासोच्छ्वास करत शारीरिक क्षमतेनुसार धारण करावी (पहा आ. २ भूनमनासन). पूर्वस्थितीत परतताना श्वास घेत वर यावे. अशा प्रकारे ही कृती विरुद्ध बाजूने म्हणजे डावीकडूनही करावी. श्वास घेत वर येणे व श्वास सोडत मागे जाणे हे लक्षात ठेवावे. अशा प्रकारे हे आसन सुलभतेने करता येते.
लाभ : या आसनामुळे पाठीचा कणा आणि कमरेच्या भागाला ताण निर्माण होऊन तिथले स्नायू लवचिक होतात व मज्जातंतू उत्तेजित होतात.
संदर्भ :
- धीरेंद्र ब्रह्मचारी, ‘योगासन विज्ञान’, एशिया पब्लिशिंग हाऊस, मुंबई , १९७०.
- स्वामी सत्यानंद सरस्वती, ‘आसन प्राणायाम मुद्रा बन्ध’, योग पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंगेर, बिहार, २०१५.
समीक्षक : प्रदीप पाटील
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.