गिलमन, ॲल्फ्रेड गुडमन : (१ जुलै १९४१ — २३ डिसेंबर २०१५). अमेरिकन औषधशास्त्रज्ञ. त्यांना ‘जी –प्रथिन'(जी-प्रोटीन; G protein) रेणूंच्या शोधासाठी १९९४ चा शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्त्राचा नोबेल पारितोषिक अमेरिकन जैव-रसायनशास्त्रज्ञ मार्टिन रॉडबेल यांच्यासोबत विभागून देण्यात आला. जी-प्रथिने पेशींमधील संकेत वहनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
गिलमन यांचा जन्म अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील न्यू हेव्हन येथे झाला. त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण न्यूयॉर्कच्या व्हाईट प्लेन्स भागात झाले. नंतर त्यांचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण कनेक्टिकट राज्यातील टॅफ्ट स्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते येल विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी डीएनए रेणूच्या द्विसर्पिल रचना शोधण्यास प्रसिद्ध असलेल्या जीवरसायनशास्त्रज्ञ फ्रान्सिस क्रीक यांच्या मार्गदर्शनाखाली शोध प्रकल्प तयार केला. त्यांनी येल विद्यापीठातून जीवरसायनशास्त्रात बी.ए. पदवी संपादन केली (१९६२). पुढे अॅलन कॉनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रख्यात बरोज वेलकमया न्यूयॉर्कमधील औषध उत्पादन समूहासाठी काम करून त्यांनी दोन संशोधन निबंधही प्रकाशित केले. त्यांनी केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन क्लीवलँड, ओहायो येथून अर्ल विल्बर (ज्युनिअर) सदरलँड यांच्या मार्गदर्शनाखाली एम.डी.-पीएच.डी. अशा संयुक्त पदव्या संपादन केल्यात (१९६९).
गिलमन यांना पेशींतर्गत संदेशवहन या क्षेत्रात काम करण्याची तीव्र इच्छा होती. पुढे पीएच.डी. पश्चात त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते मार्शल निरेनबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले (१९६९—७१). निरेनबर्ग जनुकांची सांकेतिक भाषा उलगडून दाखविण्याबाबत प्रसिद्ध होते, तसेच त्यांनी पेशीय संदेशवाहक द्रव्य चक्रिय ॲडिनोसीन मोनोफॉस्फेट (सायक्लिक एएमपी; cAMP) शोधून काढले होते. गिलमन यांनी अल्प मात्रेत असलेले चक्रिय ॲडिनोसीन मोनोफॉस्फेटाची शोध-चाचणी विकसित केली. पेशीच्या बाहेर पृष्ठभागावर चिकटलेला संप्रेरक (प्रथम संदेशवाहक) रेणू पेशीच्या आत बदल घडवण्यासाठी चक्रिय ॲडिनोसीन मोनोफॉस्फेट हा दुय्यम संदेशवाहक वापरतो, असे गिलमन यांना माहीत होते. त्यामुळे निरेनबर्ग यांना या शोधाचे महत्त्व लगेच लक्षात आले.
गिलमन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये औषधशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली (१९७१). काही काळानंतर पदोन्नती मिळून ते पूर्ण प्राध्यापक पदावर काम पाहू लागले (१९७७). त्यापुढे त्यांनी ईशान्य टेक्सासमधील डॅलस येथे युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साऊथ वेस्टर्न मेडिकल सेंटरच्या औषधशास्त्र विभाग प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली (१९८१). पुढे तेथेच त्यांनी अधिष्ठाता आणि अभ्यासकीय प्रशासक अशी पदेही भूषविली. नंतर तेथूनच ते २००८ मध्ये सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते कॅन्सर प्रिव्हेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ टेक्सास येथे मुख्य वैज्ञानिक अधिकारी या पदावर कार्यरत होते (२००९). जीवरसायनशास्त्रज्ञ मार्टिन रॉडबेल यांना जी-प्रथिनांच्या पेशी अंतर्गत संदेशवहनासाठी उपयोगी असतात, असा अंदाज होता. जी-प्रथिने नैसर्गिक ऊर्जा रूपांतरक (natural transducers) असून एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करतात. रॉडबेल यांनी जी-प्रथिनाच्या कामाची रूपरेखा असावी, असे मत मांडले होते. नंतर गिलमन यांनी जी-प्रथिने शुद्ध रूपात अलग केली. ही प्रथिने ग्वानोसीन ट्रायफॉस्फेट (GTP) किंवा ग्वानोसीन डायफॉस्फेट (GDP) या रेणूंबरोबर संयोग पावतात म्हणून त्यांना जी-प्रथिने असे नाव पडले.
गिलमन यांनी जी-प्रथिनांच्या कामाचे रूप ठरवण्यासाठी विविध प्रयोग केले. जी-प्रथिन रेणू पेशीपटलांच्या बाह्य पृष्ठावर असणारे काही ग्राही रेणू असून चावी कुलुपाप्रमाणे पकड घेतात. जी-प्रथिने रेणू आणि त्यांचे पेशीपटलांच्या बाह्य पृष्ठावर असणारे ग्राही रेणू एकत्र आल्याने पेशींना काही रासायनिक क्रिया करण्याची चेतना मिळते. परिणामी ते दृष्यकेंद्रकी पेशीच्या पेशीद्रव्यात कार्यान्वित होतात, असे गिलमन यांनी शोधून काढले. ग्वानोसीन ट्रायफॉस्फेट वा ॲडिनोसीन ट्रायफॉस्फेटातील फॉस्फेट रेणू अलग होतांना ऊर्जा मुक्त होते. स्नायूंच्या आकुंचनासाठी अन्य लहान मोठे रेणू जोडणे किंवा फोडणे इ. कामांसाठी मुक्त झालेली ऊर्जा वापरली जाते. गिलमन यांच्या जी-प्रथिनांच्या संशोधनामुळे संप्रेरके आणि औषधे यांच्या पेशींतर्गत संदेश-संवाद क्रिया समजण्यास मदत झाली. सध्या वीसपेक्षाही जास्त लहान मोठ्या जी-प्रथिनांचे प्रकार आणि उपप्रकारही माहीत झाले आहेत. तसेच जी-प्रथिनांच्या कामात बिघाड झाल्यास पटकी (कॉलरा), अतिसार, कर्करोग, मद्यासक्ती, मधुमेह अशा अनारोग्यकारक स्थिती निर्माण होतात,याचीही जाणीव आता तज्ज्ञांना आहे.
गिलमन यांनी पुढे उद्योग आणि व्यापार कार्यक्षेत्रातदेखील उडी घेतली. त्यांनी रीजेनेरॉन फार्मॅस्यूटिकल औषध कंपनीची स्थापना केली. तसेच ते इलाय लिली या कंपनीचे संचालक होते. ही कंपनी दीडशे वर्षांपेक्षा जुनी आणि प्रथमच मोठ्या प्रमाणात पोलिओ लस तसेच ह्युम्युलीन हे जैवतंत्रज्ञानाने निर्मिलेले इन्शुलिन संप्रेरक तयार करणारी म्हणून जगप्रसिद्ध आहे.
गिलमन यांना पुढील अनेक सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे : लौन्सबेरी अॅवॉर्ड, गेर्डनर फौंडेशन इंटरनॅशनल अॅवार्ड, अल्बर्ट लास्कर अॅवार्ड फॉर बेसिक मेडिकल रिसर्च (१९८९), लुईसा ग्रॉस हॉर्विट्झ प्राईझ (१९८९), नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (१९८५) आणि अमेरिकन असोसिएशन ऑफ आर्टस् अँड सायन्सेसचे सदस्य, अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्च अकॅडेमीचे फेलो आणि नॅशनल सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनचे सल्लागार समिती सदस्य इत्यादी. त्यांचे सायन्स, नेचर, द जर्नल ऑफ बायोकेमिकल केमिस्ट्री, प्रोसीडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) अशा प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकांत अनेक शोधनिबंध प्रकाशित आहेत. औषधशास्त्र क्षेत्रातील प्रतिष्ठित ग्रंथांपैकी एक असलेल्या गुडमन आणि गिलमन यांच्या ‘द फार्मॅकॉलॉजिकल बेसिस ऑफ थेरप्युटिक्स’च्या अनेक आवृत्त्या गिलमन यांनी संपादित केल्या. त्यांच्या पहिल्या आवृत्तीचे सहलेखन गिलमन यांच्या वडिलांनी १९४१ मध्ये केले होते.
गिलमन यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे डॅलस, टेक्सस येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #जी-प्रथिने #१९९४ नोबेल पारितोषिक
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1994/gilman/biographical/
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1994/gilman/25063-interview-transcript-1994/
- https://en.wikipedia.org/wiki/Goodman_%26_Gilman%27s_The_Pharmacological_Basis_of_Therapeutics
- https://en.wikipedia.org/wiki/Alfred_G._Gilman
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1994/gilman/biographical/
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
