ड्युबोशे, झाक : (८ जून १९४२). स्विस जीवभौतिकशास्त्रज्ञ. द्रावणातील जैवरेणूंच्या उच्च-वियोजन संरचना निश्चितीसाठी अतिशीत इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी (क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप) विकसित केल्यामुळे त्यांना २०१७ मधील रसायनशास्त्र विषयातील नोबेल पारितोषिक जीवभौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड हेंडरसन आणि योआकिम फ्रँक यांसोबत विभागून देण्यात आले.
ड्युबोशे यांचा जन्म स्वित्झर्लंड येथील एग्ल येथे झाला. नैऋत्य स्वित्झर्लंड भागात त्यांचे बरेच दिवस वास्तव्य होते. तरुणपणी त्यांना वाचन अक्षमता असल्याचे निदान झाले होते. पुढे त्यांनी लोझॅन येथील पॉलिटेक्निक स्कूल ऑफ द युनिव्हर्सिटी (आताचे फेडरल पॉलिटेक्निक स्कूल ऑफ लोझॅन) येथून शारीरिक अभियांत्रिकी या विषयात पदवी संपादन केली (१९६७). युनिव्हर्सिटी ऑफ जिनिव्हा येथून त्यांनी एडवर्ड केलेनबर्गर यांच्या मार्गदर्शनाखाली जैव-भौतिकी विषयात पीएच.डी. पदवी मिळविली. त्यांच्या संशोधनाचा विषय यूज ऑफ डार्कफिल्ड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी इन बायोलॉजी असा होता. बायोसेंटर ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ बाझेल येथे काही काळ घालवल्यानंतर १९७८ मध्ये ते हायडल्बर्ग येथील यूरोपीयन मॉलेक्युलर बायॉलॉजी लॅबोरेटरी विभागात सामील झालेत. तेथे त्यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी ॲप्लिकेशन लॅबोरेटरीमध्ये प्रमुख पदावर काम केले आणि अतिशीत इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी विकसित केली. तेथे ते १९८७ पर्यंत कार्यतर होते, त्यानंतर मात्र ते लोझॅन विद्यापीठात जैव-भौतिकी विषयाच्या प्राध्यापक पदावर रुजू झालेत आणि तेथूनच २००७ मध्ये सेवानिवृत्त झालेत. निवृत्तीनंतर त्यांनी त्याच विद्यापीठात मानद प्राध्यापकाचे पद स्वीकारले.
ड्युबोशे यांनी अतिशीत इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी, अतिशीत इलेक्ट्रॉन छेदचित्रण आणि नेत्रकाचाभ अतिशीत इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीमधील तंत्रज्ञान विकसित केले. या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रथिन संकुल किंवा विषाणू कण यांसारख्या जैविक संरचनांची प्रतिमा घेण्यासाठी केला जातो. १९७० च्या दशकात त्यांनी कृष्ण क्षेत्र इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी (डार्क-फील्ड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी) मध्ये प्रभुत्व मिळविले आणि त्याचा वापर करून टोबॅको मोझॅक विषाणूव डीएनए यांच्या प्रतिमा यशस्वीपणे मिळविल्या. परंतु त्यांनाही जैविक नमुन्यातील पाण्यामुळे प्रतिमामध्ये विकृती आढळल्या. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीमध्ये नमुना निर्वात स्थितीत असावा लागतो, परंतु या अटीमुळे नमुन्यातील आर्द्रता नाहीशी होऊन संरचना अस्थिर होऊन तुटत असे. त्यामुळे त्यांनी जैविक नमुन्यांची प्रतिमा अतिशीत अवस्थेत घेण्याचा क्रांतीकारक निर्णय घेतला.
ड्युबोशे यांना लनार्ट फिलिप्सन पुरस्कार प्रदान करण्यात आला (२०१५). ते स्वित्झर्लंडच्या समाजवादी पक्षाचे सदस्य आहेत. तसेच मोर्गेस म्युनिसिपालिटीच्या मंत्रिमंडळाचे ते सदस्य आहेत.
कळीचे शब्द : #क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Jacques_Dubochet
- https://www.nobelprize.org/prizes/chemistry/2017/dubochet/facts/
समीक्षक : मुकुंद बोधनकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
