महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील प्रामुख्याने आगरी समाजाची बोलीभाषा. कोकण पट्ट्यातील पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ही बोली बोलली जाते. तसेच उत्तरेकडे नाशिक व थोड्याफार प्रमाणात धुळे जिल्ह्यांतही ही बोली बोलली जाते. आगरी समाजाबरोबरच या भागातील भंडारी, कुणबी, भोई या समाजांचे लोकही ही भाषा बोलतात. या परिसरातील कोळी समाजाच्या कोळी बोलीभाषेशी आगरी बोलीचे बरेच साम्य आढळते. कोकणात मुख्यत: मीठ तसेच भात पिकवण्याच्या जागेला ‘आगर’ असे म्हणतात. आगरात वापरली जाणारी बोली या अर्थाने आगरी बोलीचे नाव प्रचलित झाल्याचे सांगितले जाते. सामान्यत: आगरी बोलीची गणना मराठीच्या बोलीप्रकारांमध्ये केली जाते.

ध्वनिव्यवस्था :

आगरी बोली व प्रमाण मराठीतील ध्वनी बरेचसे सारखे आहेत. परंतु, त्या ध्वनींच्या परस्परसंबंधांनी मिळून तयार होणारी आगरीची स्वनिमव्यवस्था प्रमाण मराठीच्या स्वनिमव्यवस्थेपेक्षा मात्र वेगळी आहे. आगरी बोलीमध्ये [ɭ] ‘ळ्’ हा ध्वनी सहसा आढळत नाही. प्रमाण मराठीतील कित्येक शब्दांमध्ये जेथे [ɭ] ‘ळ्’ येतो, त्या शब्दांच्या आगरी बोलीतील सहोदर शब्दांमध्ये [l] ‘ल्’ हा ध्वनी वापरला जातो. उदा., कावळा या पक्ष्याचे आगरी बोलीतील नाव [kaw.la] ‘कावला’ असे आहे. कधीकधी प्रमाण मराठी शब्दांतील [ɭ] ‘ळ्’ च्या जागी आगरीतील शब्दांमध्ये [r] ‘र्’ हा ध्वनीदेखील येतो. आगरीत कधीकधी एकाच शब्दात अर्थाचा फरक न करता [l] ‘ल्’ ऐवजी [r] ‘र्’ व [r] ‘र्’ऐवजी [l] ‘ल्’ देखील उच्चारला जातो. प्रमाण मराठीप्रमाणेच [lʰ] ‘ल्ह्’ व [rʰ] ‘ऱ्ह्’ ही महाप्राण व्यंजने आगरीतही आहेत. मात्र, [lʰ] ल्ह्, [rʰ] ऱ्ह्, [l] ल्, [r] र्, [s] स्, [w] व् अशा कित्येक ध्वनींचा आढळ आगरी बोलीमध्ये, प्रमाण मराठीपेक्षा वेगळ्या स्वरुपाचा आहे. जसे, प्रमाण मराठीत [ɖ] ‘ड्’ या व्यंजनध्वनीचे दोन स्वरांच्या मध्ये किंवा शब्दाच्या मध्य व अंत्यस्थानी  [ɽ] ‘ड़’ असे स्वनांतर होते. आगरीमध्ये मात्र स्वरांच्या मध्ये तसेच शब्दाच्या मध्य व अंत्यस्थानी [r] ‘र्’ हा ध्वनी येतो व [ɽ] ‘ड़’ क्वचित येतो. उदा., [d̪əg.ri] ‘दगरी’ (प्रमाण मराठीमध्ये [d̪əg.ɽi] ‘दगडी’). तसेच, काही शब्दांमध्ये स्वरांच्या मध्ये [rʰ] ‘ऱ्ह्’ हा ध्वनी येतो. जसे, [ga.rʰəw] ‘गाऱ्हव’ (प्रमाण मराठीत [ga.ɽʰəw] ‘गाढव’). प्रमाण मराठीत जिथे [ʃ] ‘श्’ आणि [t͡ʃʰ] ‘छ्’ हे ध्वनी येतात, त्याच जागी आगरी बोलीत [s] ‘स्’ या ध्वनीचा आढळ दिसतो. उदा., [sos] ‘सोस’ (मराठीत [ʃoʃ] ‘शोष’ म्हणजे तहान), [sə.t̪ri] ‘सत्री’ (प्रमाण मराठीत [ t͡ʃʰə.t̪ri] ‘छत्री’).

व्याकरणिक वैशिष्ट्ये :

आगरी बोलीत पुल्लिंग व स्त्रीलिंग असे दोन लिंगभेद आहेत. नामांची लिंगव्यवस्था यादृच्छिक प्रकारची आहे. नामांना कारकदर्शक विभक्तींची चिन्हे लागतात. कर्म, संप्रदान व भोक्ता या कारकांचा निर्देश ‘ला’ या विभक्तीने होतो; तर करणकारक ‘नं’ आणि ‘शी’ या दोन्ही विभक्तींद्वारे दाखवतात. ‘शी’ या विभक्तीने करणकारकाबरोबरच अपादान व अधिकरणही दाखवले जाते. याशिवाय ‘नं’ व ‘त’ या विभक्तीसुद्धा अधिकरण दाखवण्याकरिता वापरतात. मराठीप्रमाणेच आगरीबोलीतही प्रेरकरचना आढळते व प्रेरकविभक्ती नामाला लागून येणाऱ्या ‘नी’ या चिन्हाने दाखवतात.

आगरी बोलीत वर्तमान, भूत व भविष्य असे तीन काळ दाखविले जातात. धातूला क्रियाव्याप्तीचे प्रत्यय लागतात. चालू भूतकाळ दाखवण्यासाठी हो-/व्ह- या साहाय्यक धातूची रूपे (होता/ व्हता) वापरली जातात, पण पूर्ण भूतकाळाच्या रचनेत धातूलाच पूर्ण क्रियाव्याप्तीचा -ल प्रत्यय व त्यानंतर भूतकाळाचा -त प्रत्यय लागलेला दिसतो. उदा.,

एक कावला बरा-च येल आकाशा-त उर-त होता.
एक कावळा बरा-भरदर्शक वेळ आकाश-अधिकरण उड-चालूक्रिया भूतकाळ.पुल्लिंग.एकवचन
‘एक कावळा बराच वेळ आकाशात उडत होता.’
तो जाम दम-ले-ता.
तो खूप दम-पूर्णक्रिया-भूतकाळ.पुल्लिंग.एकवचन
‘तो खूप दमला/दमलेला होता.’

आगरी वाक्यांमध्ये प्रत्ययांची फोड करून, त्याखाली त्यांचे व्याकरणिक अर्थ दिले आहे व प्रमाण मराठीतील अनुवादही दिलेला आहे. त्यायोगे, प्रमाण मराठी व आगरीतील काही साम्य-भेद समजून घेता येतील.

आगरी बोलीचे तिच्या आसपासच्या कोळी बोली, वाडवळी बोली यांच्याशी आदानप्रदान होत आलेले आहे. प्रमाण मराठीचादेखील तिच्यावर वाढता प्रभाव दिसून येतो. अलीकडे आगरी बोली साहित्यात काही प्रमाणात वापरली जात आहे.

संदर्भ :

  • कुलकर्णी-जोशी, सोनल, मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण : प्रतिमांकन व आलेखन, प्रकल्प अहवाल, २०२३. https://sdml.ac.in/corresponding-tab_mr [retrieved: 14-02-2026]
  • देशमुख, शंकर सखाराम, ‘आगर’. भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण: महाराष्ट्र, (संपा. अरुण जाखडे), पद्मगंधा प्रकाशन, २०१३.
  • Grierson, George Abraham, Linguistic Survey of India. Volume VII. Office of the Superintendent of Government Printing, 1905.
  • A story in Agari: A Thirsty Crow. https://mumbailinguisticcircle.com/wp-content/uploads/2026/03/AgariStory.wav [retrieved: 24-03-2026]

 

समीक्षक : सिसिलिया कार्व्हालो


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.