योगशास्त्रावरील एक अल्पपरिचित ग्रंथ. राजयोग भाष्य हा ग्रंथ इतर कोणत्याही ग्रंथावरील भाष्य नसून यामध्ये राजयोगातील सिद्धांत आणि साधना यांचे विवेचन आहे. हा ग्रंथ श्री आदि शंकराचार्य यांनी लिहिला असल्याचा दावा केला जातो; परंतु, याबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आढळतात. श्री आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये (उदा., ब्रह्मसूत्रभाष्य, भगवद्गीता भाष्य, उपनिषदांवरील भाष्ये इ.) राजयोग भाष्य या ग्रंथाचा कुठेही उल्लेख आढळत नाही. तसेच या भाष्याची लेखनशैली शंकराचार्यांच्या शैलीपेक्षा भिन्न असल्याचेही मत व्यक्त केले जाते. राजयोग भाष्याचा संबंध अधिकतर आधुनिक हठयोग ग्रंथ व वेदांत तत्त्वज्ञानाशी दिसून येतो. या ग्रंथात हठयोगाशी संबंधित राजयोग, तारक योग व अमनस्क योग यावर भाष्य करण्यात आले आहे. या ग्रंथातील राजयोग म्हणजे पातंजल योग नव्हे. या ग्रंथात अद्वैत सिद्धांताबरोबरच द्वैत सिद्धांतातील तत्त्वेदेखील आढळतात आणि श्री आदि शंकराचार्य हे अद्वैत वेदांताचे पुरस्कर्ते असून त्यांनी अनेक वाद सभांमधून द्वैतवादाचा विरोधच केल्याचे दाखले आढळतात. यावरून हा ग्रंथ श्री आदि शंकराचार्यांनी लिहिलेला नसावा, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे.

राजयोग भाष्य १८९६ मध्ये प्रथम श्री अनंत कृष्ण शास्त्री यांनी मुद्रित स्वरूपात इंग्रजी भाषांतरासह प्रकाशित केला. त्यानंतर चंद्रकांत त्रिंबक केंघे उर्फ केंघे शास्त्री यांनी १९६७ मध्ये विविध हस्तलिखितांच्या आधारे प्रचलित राजयोग भाष्य (जे ‘विजृम्भितयोगसूत्र भाष्य’ या नावाने ओळखले जाते) संपादित करून प्रकाशित केले. यात योगतत्त्वज्ञानातील सहसा न आढळणारी काही गूढ तत्त्वे आहेत. हे भाष्य योग परंपरेतील कुठल्याही एका विशिष्ट ग्रंथावर लिहिलेले भाष्य नाही, परंतु या ग्रंथातील योग सिद्धांतांचा त्रिशिखी ब्राह्मणोपनिषदाशी निकटचा संबंध आहे, ज्यामध्ये आध्यात्मिक योगाभ्यासावर भर दिलेला आहे.

राजयोग भाष्य या ग्रंथाची रचना गुरू-शिष्य संवादरूपाने आहे. ‘राजयोग’ या संज्ञेचे दोन अर्थ दिले आहेत – (१) राजवर्गीयांनी आचरण करण्यास योग्य असा योग आणि (२) योगांमध्ये श्रेष्ठ असा योग. या ग्रंथातील काही मुख्य सिद्धांत पुढीलप्रमाणे आहेत –

  • अष्टांगयोगाच्या साधनेद्वारे मोक्ष प्राप्ती सुलभ होते. श्वसन क्रियेतील पूरक, रेचक व कुंभक या प्रक्रियांद्वारे श्वासावर नियंत्रण मिळविणे, मन बाह्य विषयांपासून परावृत्त करून अंतर्मुख करणे, तसेच चैतन्याचा परमात्म्यात विलय साधणे हे साधकाचे परम लक्ष्य असले पाहिजे. श्रवण, मनन आणि निदिध्यासन या प्रक्रियेद्वारा ‘स्व’ला परम तत्त्वात एकरूप करणे (सोsहम्) व त्यायोगे मन शांत करणे, स्थैर्य स्थापित करणे यासाठी साधकाने प्रयत्न करावा.
  • राजयोगाचे तत्त्वज्ञान विषद करताना पंचमहाभूते, पंचप्राण आणि पंच ज्ञानेंद्रिये या तिन्हींचा परस्परसंबंध सिद्ध केला आहे. आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक या तत्त्वांच्या ज्ञानाद्वारे परमत्त्वाची प्राप्ती होऊ शकते. तसेच अष्टप्रकृती, त्रिशक्ती, त्रिकाल, त्रिमल, जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था, त्रिगुण, तीन प्रकारचे अग्नि, त्रिलोक, तापत्रय इत्यादी गोष्टींचे ज्ञान साधकाला असणे आवश्यक आहे, परंतु हे सर्व मायेद्वारे प्रकट झालेले असून परमतत्त्व याहून संपूर्णपणे भिन्न आहे.
  • स्थूल महाभूतांचे त्यांच्या सूक्ष्म कारणामध्ये विलीनीकरण होण्याची प्रक्रिया येथे मांडण्यात आली आहे. परमतत्त्व हेच सर्वांचे अंतिम कारण आहे व सत् चित् आनंद हेच परमात्म्याचे रूप आहे असे प्रतिपादन या ग्रंथात आढळते. काम, क्रोध इत्यादींचे शमन करून परमपदास पोहोचणे शक्य होते. ज्ञानप्राप्ती हाच मुक्तीचा एकमेव मार्ग आहे, असे सांगून तारकयोग किंवा मुक्तियोग याची चर्चा या ग्रंथात केली आहे.
  • सुषुम्ना किंवा ब्रह्मनाडी मेरूदंडाच्या तळाशी असलेल्या मूलाधार चक्रापासून ते मस्तकाशी स्थित असलेल्या ब्रह्मरंध्रापर्यंत जाते व जेव्हा कुंडलिनी शक्ती सुषुम्ना नाडीतून ब्रह्मरंध्रास भेदून जाते तेव्हा योग्यास मुक्ती मिळते. अंर्तलक्ष्य, बहिर्लक्ष्य, मध्यलक्ष, ब्रह्मनाद, अंतर्ज्योती, परआकाश, महाकाश इत्यादींचे ज्ञान साधकाला होते व अशा तऱ्हेने तारक योग साधकाला अमनस्क स्थितीत नेतो, असे मानले गेले आहे.
  • अमनस्क म्हणजेच राजयोग असेही राजयोगभाष्या नमूद केले आहे. अंतर्दृष्टी हा तारक योग साध्य करण्याचा मार्ग असून तारक योगाचे मूर्तीतारक व अमूर्तीतारक असे दोन विभाग आहेत. प्रशांत मनाने अंतर्दृष्टीतून ब्रह्मज्ञान होते.
  • सांख्य दर्शनातील काही विचारही या ग्रंथात मांडलेले दिसतात. प्रकृती व २४ तत्त्वे, जीव हे २५ वे तत्त्व तसेच परमतत्त्व हे २६ वे तत्त्व आहे असे म्हटले आहे. ज्याला या सर्व तत्त्वांचे ज्ञान प्राप्त होते, तो जीवन्मुक्त अवस्था प्राप्त करतो. असा योगी सर्वसंगपरित्याग केलेला असतो असे म्हटले आहे. या ग्रंथात योगशास्त्रातील काही गुह्य गोष्टी सांगितल्या आहेत, परंतु त्यांचे पुरेसे स्पष्टीकरण आढळत नाही; जसे की शांभवी मुद्रा म्हणजेच खेचरी प्राणायाम.
  • या ग्रंथात जागृत, स्वप्न, सुषुप्ती व तुरीय या चार अवस्थांचे सविस्तर वर्णन केले आहे व तुरीयातीत अद्वैत अवस्थेप्रत जाऊन सर्वोच्च असा अनुभव देणारा म्हणजेच ब्रह्मतत्वात एकरूप होण्याचा मार्ग दाखविला आहे. राजयोगाने या अद्वैत एकरूपत्वाला (यालाच शुद्धादैवतसामरस्य असेही म्हटले आहे) उन्मनी, सहज, अमनस्क अशा संज्ञा दिल्या आहेत. ग्रंथाच्या अखेरीस तंत्र परंपरेतील कुंडलिनी जागृती, कुंडलिनीचा सुषुम्ना नाडीत प्रवेश व तसेच ब्रह्मा, विष्णू व रुद्र यांच्या सह षट्चक्र भेदन याबद्दल माहिती दिली आहे.

थोडक्यात राजयोग भाष्य’ हा केवळ कोणत्याही एका विशिष्ट योग परंपरेचा पुरस्कार करणारा ग्रंथ नसून द्वैत व अद्वैत या दोन्ही तत्त्वज्ञानातील महत्त्वाच्या तत्त्वांचा समन्वय करणारा ग्रंथ आहे. याशिवाय शैव-तांत्रिक परंपरा, कुंडलिनी व चक्रसिद्धांत यांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे हा ग्रंथ तत्त्वज्ञान, योगसाधना व तांत्रिक परंपरा यांच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाचा व स्वतंत्र संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त आहे.

संदर्भ :

  • Gerald James Larson and Ram Shankar Bhattacharya, Encyclopedia of Indian Philosophies (Vol XII), Delhi, 2008.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.