योगतत्त्वोपनिषद्  कृष्णयजुर्वेदाशी संबंधित असून यामध्ये भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला कैवल्यप्राप्ती करून देणारा योगमार्ग विशद करून सांगितला आहे. ह्या उपनिषदात एकूण १४२ श्लोक आलेले आहेत.

संसारी जीव हा मायापाशाने बद्ध, सुख-दु:खाने वेढलेला असतो. ह्या मायाजालाचे पाश छेदणाऱ्या, तसेच जरा (वार्धक्य), मृत्यू, व्याधी इत्यादींचे निवारण करणाऱ्या परमपदाची म्हणजेच कैवल्याची प्राप्ती करून देणारा सुलभ मार्ग म्हणजे योगमार्ग होय. ज्ञानमय, निर्मल, शांत असे परब्रह्मच जीवरूपाने स्फुरित होते आणि काम-क्रोधादि तसेच क्षुधा-तृष्णादि अनेक दोषांनी बद्ध होते. ह्या दोषांपासून मुक्त असा जीव हेच ‘केवल’ रूप होय. योग हा दोषनिवारणाचा तसेच कैवल्यप्राप्तीचा मार्ग आहे; परंतु ज्ञानाशिवाय योग वा योगाशिवाय ज्ञान उपयोगी ठरत नाही. यासाठी सच्चिदानंदरूप परमपदाच्या व जीवाच्या स्वरूपाचे वर्णन आणि योगासंबंधीचे विवेचन येते (४-१५).

मंत्र, लय, हठ व राज हे योगाचे चार भेद; तसेच आरंभ, घट, परिचय व निष्पत्ती ह्या चार अवस्था या ग्रंथात वर्णिल्या आहेत. १२ वर्षे मंत्रसाधना करणाऱ्या साधकास अणि मा, गरिमा इत्यादी सिद्धी क्रमश: प्राप्त होतात. परंतु, ह्या प्रकारचा योग अधम म्हणजे प्रारंभिक साधकांसाठी योग्य मानला आहे (२१-२२). लययोग हाच चित्तलय असून उठणे, बसणे, खाणे, झोपणे इत्यादी सर्व क्रियांचे वेळी निरंतरपणे ज्ञानमय ईश्वराचे ध्यान करणे हेच त्याचे स्वरूप होय असे म्हटलेले आहे. ह्या अर्थाने लययोग कोट्यवधी प्रकारचा होतो. हठयोगाची आसनादि अष्टांगे पातंजल योगाप्रमाणेच सांगितलेली असून ध्यान करताना भ्रूमध्य केंद्राच्या ठिकाणी हरीचे ध्यान करावे असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे समाधी म्हणजेच ‘जीव व परमात्म्याची समतावस्था’ होय असे सांगितले आहे (२४-२५). निरनिराळे बंध, मुद्रा ह्यासारख्या यौगिक क्रियांविषयी विवेचन आलेले आहे. यमांमध्ये अल्प आहार तसेच नियमांमध्ये अहिंसा मुख्य मानलेले आहेत. सिद्धासन, पद्मासन, सिंहासन व भद्रासन ही प्रमुख आसने आहेत असे सांगितले आहे. साधनेच्या प्रारंभी आळस, आत्मप्रौढी इत्यादी समस्या उद्भवतात. साधनेच्या काळात धन, स्त्री, इत्यादी विषयक प्रलोभनांपासून दूर राहावे. प्राणायामासाठी योग्य कुटी कशी तयार करावी ह्याविषयीही वर्णन केलेले आढळते (३२-३४). प्राणायामाच्या पूरक, कुंभक व रेचक क्रिया १६:६४:३२ ह्या मात्रांच्या प्रमाणात कराव्यात व क्रमाने कुंभक ८० मात्रांपर्यंत वाढवत न्यावा. गुडघ्याच्या भोवती हाताचा तळवा फिरवून चुटकी वाजविणे या प्रक्रियेस जेवढा कालावधी लागतो ती एक मात्रा होय (४०). साधारण तीन महिन्यांच्या साधनेने नाडीशुद्धी होते व शरीरावर योग्य परिणाम दिसू लागतात. योग्य सरावानंतर साधक पूरक व रेचक वर्जित असा ‘केवल’ कुंभक करू शकतो. तसेच प्राणायामाच्या योग्य व भरपूर सरावानंतर साधक जमिनीच्या वर स्वत:चे शरीर उचलू शकतो; परंतु तसे सामर्थ्य त्याने दाखवू नये अशी ताकीद इथे स्पष्ट शब्दात दिलेली आहे (५४-५६). योगाच्या ह्या प्रारंभिक अवस्थेत साधकाच्या अंगी निद्रा-जय, रूप, कांती, शक्ती इत्यादी दृश्य परिणाम घडून येतात. परंतु, त्याने व्रतस्थ वृत्तीने योगाचरण करीत प्रणवाची उपासना करीत राहावे (५७-६४).

ह्यापुढील साधनेच्या टप्प्यावर प्राण, अपान, मन, बुद्धी, जीव आणि परमात्मा ह्या सर्वांमध्ये परस्पर अविरोधी अशी एकता स्थापित होते. ही घटावस्था होय. यादरम्यान ज्ञानेद्रियांच्या द्वारे जे जे विषय ग्रहण होईल ते ते सर्व आत्मरूप असल्याची जाणीव होते. अनेक प्रकारच्या सिद्धी ह्या काळात प्राप्त होत असल्या तरी त्या विघ्न समजून दूर ठेवाव्यात व कोणत्याही प्रलोभनाला, विनंतीला बळी पडून त्या प्रदर्शित करू नयेत; तर फक्त सतत साधना करावी (७०-८०).

यानंतर परिचय अवस्था सुरू होते. ती लययोगाशी संबंधित आहे. वायूच्या साहाय्याने कुंडलिनी शक्ती जागृत करून सुषुम्ना नाडीत तिचा प्रवेश घडवून आणावा व त्याठिकाणी साधकाने चित्त एकाग्र करावे. उपनिषदाच्या ह्या पुढील भागात पृथ्वी, अग्नी, जल, वायू व आकाश ह्या पंचतत्त्वांचे शरीरातील स्थान, त्यांचे रूप व रंग, त्यांच्याशी संबंधित वर्णाक्षर, त्यांची अधिदेवता ह्यासंबंधी विस्तृत विवेचन येते. त्या त्या ठिकाणी त्या त्या देवतेचे किती काळपर्यंत ध्यान करावे हे सांगितले आहे. अशा साधनेमुळे त्या त्या तत्त्वावर विजय प्राप्त होतो व तत्संबंधी सिद्धी प्राप्त होतात (८४-१०३). सगुण ध्यानाने अणि मा इत्यादी सिद्धी, तर निर्गुण ध्यानाने समाधी अवस्था प्राप्त होते.

अशाप्रकारे साधना करणारा निष्णात साधक केवळ बारा दिवसात समाधी अवस्थेला प्राप्त होतो व जीवन्मुक्त होतो. समाधी अवस्थेत जीवात्मा व परमात्मा साम्यावस्थेत येतात. त्या अवस्थेत योगी आपल्या इच्छेनुसार देहत्याग वा देहधारणा करू शकतो; सिद्धपुरुष होऊन इच्छेनुसार पृथ्वीतलावर कुठेही विचरण करू शकतो वा देवतारूप होऊन स्वर्गात निवास करू शकतो (१०७-१०९).

ह्यानंतरच्या भागात निरनिराळे बंध, मुद्रा; त्यांची कृती, त्यापासून होणारे लाभ इत्यादी वर्णन येते. हठयोगाच्या प्राप्तीनंतर साधक राजयोग साधू शकतो. त्यात यौगिक क्रियांची गरज नसते. विवेक आणि वैराग्य प्राप्त करून महायोगी भगवान विष्णूंचे स्वरूप तो जाणतो. ह्या संसारचक्राचे सत्य ज्ञान प्राप्त करतो.

उपनिषदाच्या शेवटी तीन ह्या अंकाचे महत्त्व (तीन लोक, तीन वेद, तीन गुण, तीन संध्या, इत्यादी) सांगितले असून नंतर हृदय कमळाच्या ठायी ओंकाराच्या ‘अ’, ‘ऊ’ ‘म्’ या तीन अक्षरांच्या स्वरूपाचे विश्लेषण केले आहे (१३७-१३९).

योगाचा मार्ग अनुसरणाऱ्या साधकाला मोक्षाची प्राप्ती होते. या प्राप्तीसाठी अष्टांगयोगाचे आणि हठयोगातील निरनिराळ्या क्रियांचे प्रामाणिक विवेचन योगतत्त्वोपनिषदात केले आहे.

समीक्षक : प्राची पाठक