योगसारसंग्रह हा आचार्य विज्ञानभिक्षूंनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्यांनी लिहिलेल्या योगवार्त्तिक  या व्यासभाष्यावरील विस्तृत टीकेनंतर योगमताचे सार म्हणून योगसारसंग्रह हा ग्रंथ त्यांनी लिहिला असावा. या ग्रंथाचे चार अंश आहेत. प्रथम अंशात संप्रज्ञात व असंप्रज्ञात या दोनही योगांचे चित्तवृत्तिनिरोध हे साधारण लक्षण आहे असे सांगितले आहे. प्रारंभी विज्ञानभिक्षूंनी असंप्रज्ञात योगाची व्याख्या दिली असून पुढे चित्तवृत्तींचे निरूपण केले आहे. योगाचे दु:खनिवृत्ती व मोक्षप्राप्ती हे फळ, संप्रज्ञात योगाचे भेद, ईश्वर आणि ईश्वरप्रणिधान हे विषय प्रथम अंशात आढळतात. सांख्य म्हणजे विवेकसाक्षात्कार, तर योग म्हणजे चित्तवृत्तिनिरोध असा सांख्य व योगातील भेद प्रथम अंशाच्या शेवटी ते नमूद करतात (सांख्यस्तु विवेकसाक्षात्कार:| योगस्तु चित्तवृत्तिनिरोध:|).

द्वितीय अंशात विज्ञानभिक्षु योगाच्या आठही अंगांचा उहापोह करतात. यम केवळ निवृत्तिरूप असून नियम प्रवृत्तिरूप आहेत असे ते स्पष्ट करतात. आसन हठयोगाचा विषय आहे, राजयोगाचा नाही म्हणून त्याचे सविस्तर वर्णन करण्याची आवश्यकता नाही असे मत त्यांनी नमूद केले आहे.

प्राणायाम हा चित्तप्रसादनाचा पाया आहे असे ते मानतात. पतंजलींनी रेचक, कुंभक, पूरक या संज्ञांचा उल्लेख केला नाही. परंतु, विज्ञानभिक्षूंनी प्राणायामाच्या रेचक, कुंभक, पूरक व केवल कुंभक या संज्ञांचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. मात्रा म्हणजे काय, प्राणायाम किती मात्रांच्या अवधीपर्यंत करावा यांचे सविस्तर वर्णन विज्ञानभिक्षु करतात. इंद्रियांना वश करणे, आपल्या इच्छेनुसार त्यांचा व्यवहार करविणे, थोडक्यात त्यांचा निग्रह करणे म्हणजे प्रत्याहार होय असे ते प्रतिपादन करतात. “ज्याप्रमाणे रणभूमीवरून सैन्याला परत आणणारा राजा आपल्या अन्त:पुरात प्रवेश करतो त्याप्रमाणे इंद्रियांना त्यांच्या विषयांमधून परत आणून हळूहळू चित्तात न्यावे” असे नारदवचन ते उद्धृत करतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार यांचा संबंध देह, प्राण व इंद्रियांच्या निग्रहाशी आहे; तर धारणा, ध्यान व समाधीचा संबंध चित्ताच्या निग्रहाशी आहे.

नाभी, पर्वताचे शिखर इत्यादी देशावर (स्थानावर, ठिकाणावर) चित्त स्थिर करणे म्हणजे धारणा होय. परंतु, अन्यथा ख्याति (चित्त आणि पुरुष एकमेकांपेक्षा वेगळे आहेत हे जाणणे) किंवा शुद्ध ब्रह्मावर धारणेसाठी चित्त कसे स्थिर करता येईल हा प्रश्न साधकाला पडू शकतो. कारण ध्यान करण्यासाठी चित्त किंवा शुद्ध ब्रह्माचे स्थान कोणते असेल हा प्रश्न निर्माण होतो. यावर विज्ञानभिक्षु असे म्हणतात की, ज्याप्रमाणे इंधन अग्नीचे आश्रयस्थान आहे असे मानले जाते, त्याप्रमाणे चित्त आणि ब्रह्म यांचे आश्रयस्थान अर्थात विशेष स्थान हृदय इत्यादी मानून त्या ठिकाणी त्यांच्यावर धारणा करावी.

ध्यान करताना एखाद्या विषयावर चित्त स्थिर होणे आवश्यक असते. साधकाने स्वत:चे चित्त विरक्त अशा नारद इत्यादींच्या चित्तावर एकाग्र केल्यास साधकाचे चित्त स्थिर होते, असे विज्ञानभिक्षु प्रतिपादन करतात.

धारणा, ध्यान व समाधीचे विवेचन करताना विज्ञानभिक्षु ध्यान व समाधीमधील फरक ठळक करून सांगतात. ते म्हणतात की, इंद्रिय व विषयांच्या संयोगाने ध्यानाचा भंग होऊ शकतो पण समाधीचा भंग होऊ शकत नाही. उदाहरणादाखल ते भागवतपुराणातील श्लोक उद्धृत करतात. “ज्याप्रमाणे बाण बनविणारा त्यात चित्त एकाग्र केल्यामुळे जवळून जाणाऱ्या राजालाही बघू शकत नाही, त्याप्रमाणे आत्म्यामध्ये चित्ताचा निरोध (चित्त निरुद्ध) झाल्यावर योगी बाह्य किंवा आभ्यन्तरवस्तू पाहत नाही.”

तृतीय अंशात सिद्धींचे व चतुर्थ अंशात कैवल्याचे विवेचन आले आहे. मोक्ष म्हणजे दु:खनिवृत्ती. विज्ञानभिक्षूंच्या मते मोक्षामध्ये आनंदाचा अनुभव नसतो. मोक्षाच्या संदर्भात आनंद म्हणजे दु:खाचा अभाव होय. ते म्हणतात, ‘संसारात दु:खच आहे, सुख नाही. भोगजनित सुखाची अपेक्षा करणे हेच दु:ख आणि दु:खातीत होणे म्हणजेच सुख’ (दु:खं कामसुखापेक्षा सुखं दु:खसुखात्यय:|). ‘दु:खार्त पुरुषाचे दु:ख नष्ट झाल्यावर त्याला सुख असे नाव प्राप्त होते’ (दु:खार्तस्य प्रतीकारे सुखसंज्ञा विधीयते|).

स्फोट (शब्दाचा अर्थ कसा कळतो याविषयी व्याकरणाचा सिद्धांत), मनोवैभव (अंत:करणाचे परिमाण), काल या संकल्पनांच्या विवेचनाने ग्रंथ समाप्त होतो. या विवेचनात विज्ञानभिक्षु काळ हा नित्य, सर्वव्यापी आणि अखंड आहे, या न्याय व वैशेषिकयांच्या मताचे व काळ स्वतंत्र तत्त्व नसून तो आकाश व अन्य महाभूतांवर अवलंबून आहे, या सांख्यमताचे खंडन करून असे प्रतिपादन करतात की, काल क्षणात्मक आहे. क्षणाच्या अवयवांनी (संघात विशेषांनी) मुहूर्त, दिवस, रात्र, द्विपरार्धपर्यंत काळाचा व्यवहार होतो . ‘आता’, ‘आज’ हे शब्दप्रयोग देखील क्षणांच्या संघाताचा निर्देश करतात. क्षणप्रवाह नित्य आहे.

मोक्षप्राप्तीसाठी योग सर्वोत्कृष्ट साधन आहे असे ते मानतात. ‘अनेक प्रकारचे ज्ञान असले तरी स्वत:च्या प्रयोजनाची ज्या ज्ञानाने पूर्ती होईल त्या ज्ञानाचाच आश्रय घ्यावा. ज्ञानांची अनेकता / वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा योगामध्ये विघ्नच निर्माण करते. हे पण मला जाणावयाचे आहे, ते पण मला जाणावयाचे आहे असे मानणारा साधक तहानलेल्या माणसाप्रमाणे भटकत भटकत हजारो युगातही आपले वास्तविक ध्येय प्राप्त करू शकत नाही’ असा मोलाचा उपदेश विज्ञानभिक्षूंनी साधकाला केला आहे. हा उपदेश जीवनातील ध्येयांकडे वाटचाल करताना विशिष्ट मार्गावर निष्ठा न ठेवता धरसोड करणाऱ्या सर्वच व्यक्तींनी लक्षात ठेवण्याजोगा आहे.

                                                                                                                                                                      समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर