भाषा उत्पत्तीचा एक सिद्धान्त. डिंग-डाँग हा सिद्धान्त प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ आणि प्राच्यविद्यापंडित माक्स म्यूलर यांनी ‘लेक्चर्स ऑन द सायन्स ऑफ लँग्वेज’ (१८६१) या ग्रंथात मांडला. या सिद्धान्ताला कृ. पां. कुलकर्णी यांनी ‘ठण् ठण् वाद’ तर श्री. न. गजेंद्रगडकर यांनी ‘धातुसिद्धान्त’ असे संबोधले आहे. या सिद्धान्ताचा मुख्य आधार ‘ध्वनिप्रतीकात्मकता’ (Sound symbolism) आहे. या सिद्धान्तानुसार, विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये एक नैसर्गिक अनुनाद किंवा कंपन असते. जेव्हा एखादी वस्तू बाह्य जगाशी संवाद साधते किंवा मानवी संवेदनांच्या कक्षेत येते, तेव्हा मानवी मन त्या वस्तूच्या गुणधर्माला अनुसरून एक विशिष्ट ध्वनी निर्माण करते. एखाद्या धातूच्या घंटेवर बाह्य शक्तीद्वारे आघात केल्यास ‘डिंग-डाँग’ असा आवाज येतो, त्याचप्रमाणे निसर्गातील अनुभवांचा मानवी मनावर आघात झाल्याने भाषेचा उगम झाला, असे मत या सिद्धान्तात मांडले आहे.
डिंग-डाँग सिद्धान्ताचे समर्थन करणारे संशोधक असे मानतात की, भाषेत ‘ध्वनी’ आणि ‘अर्थ’ यांचा संबंध पूर्णपणे यादृच्छिक नसतो. ब्लासी आणि इतर (२०१६) आधुनिक संशोधकांनी पीएनएएस (PNAS) मध्ये प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधात असे मांडले आहे की, जगातील अनेक भाषांमध्ये काही विशिष्ट संकल्पनांसाठी विशिष्ट ध्वनी वापरण्याची प्रवृत्ती आढळते. हे संशोधन डिंग-डाँग सिद्धान्ताच्या ‘ध्वनी आणि अर्थ यात एक उपजत नाते असू शकते’ या मूळ कल्पनेला वैज्ञानिक पुष्टी देते. आधुनिक भाषाशास्त्राचे जनक फेर्दिनां द सोस्यूर यांच्या मते, भाषेतील चिन्हे ही स्वैर असतात. उदा., ‘पंखा’ या वस्तूला ‘पंखा’ म्हणतात, यात कोणताही नैसर्गिक तर्क नसून तो केवळ एक संकेत आहे. हे मत डिंग-डाँग सिद्धान्ताच्या विरोधी आहे. जर हा सिद्धान्त सार्वत्रिक असता, तर जगातील सर्व भाषांमध्ये एकाच वस्तूसाठी एकच शब्द वापरला गेला असता. तसेच, हा सिद्धान्त अमूर्त संकल्पना (उदा. न्याय, विचार) यांची उत्पत्ती स्पष्ट करण्यात अपयशी ठरतो. हा सिद्धान्त जरी आजच्या प्रगत भाषाशास्त्रात स्वीकारार्ह नसला, तरी तो भाषेतील ध्वनिप्रतीकात्मकता समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे.
भाषेची उत्पत्ती हा भाषाशास्त्र आणि मानववंशस्त्रातील महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. मानवाने संवाद साधण्यासाठी ध्वनीचा वापर कधी आणि कसा सुरू केला, याबाबतचे अनेक सिद्धान्त मांडले गेले आहेत. त्यामध्ये डिंग-डाँग सिद्धान्ताव्यतिरिक्त ‘बाउ-वाउ सिद्धान्त’, ‘पुह-पुह सिद्धान्त’, ‘यो-हे-हो सिद्धान्त’ यांसारख्या इतर सिद्धान्तांचाही समावेश आहे. बाउ-वाउ सिद्धान्तान्वये, मानवाने प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करून शब्द बनवले. पुह-पुह सिद्धान्तानुसार, मानवी भावनांच्या उत्स्फूर्त उद्गारांतून भाषा जन्माला आली. समूहाने काम करताना होणाऱ्या शारीरिक श्रमांमुळे निर्माण झालेल्या तालातून भाषेचा विकास झाला, या मताला यो-हे-हो सिद्धान्त मान्यता देतो. डिंग-डाँग सिद्धान्त यापेक्षा वेगळा ठरतो, कारण तो केवळ नक्कलेवर, मानवी भावनांवर किंवा शारीरिक श्रमांवर आधारित नसून वस्तूच्या अंतर्निहित गुणावर आधारित आहे. आणि तो बाह्य जगातील वस्तू आणि मानवी मन यांच्यातील संबंधावर भर देतो.
संदर्भ :
- कुलकर्णी, कृ. पां., ‘मराठी भाषा : उद्गम व विकास’, द इंटरनॅशनल बुक सर्विस पब्लिशर्स, पुणे, १९३३.
- Muller, F. M., Lectures on The Science of Language, Longmans, Green and Co., London, 1861.
- Saussure, F. D., Course in General Linguistics, Philosophical Library, New York, 1959.
- Yule, G., The Study of Language, Cambridge University Press, 2010.
- https://www.pnas.org/doi/1073/pnas.1605782113 (Accessed, 06.07.2026.).
समीक्षक : रेणुका ओझरकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
