भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. भाषेमुळेच संस्कृतीची निर्मिती आणि जतन शक्य होते. संस्कृती, चालीरीती, रूढी, परंपरा जतन करण्याचे आणि हा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचे काम भाषा करते. कोणत्याही विचारांची देवाण–घेवाण भाषेशिवाय शक्य नाही व संपर्काशिवाय संस्कृतीचा विकास वा प्रगती होऊ शकत नाही. जगाच्या व्यवहारात भाषा ही एक संज्ञानात्मक आणि सामाजिक उपलब्धी आहे, जी मानवाला विचार करण्यासाठी बौद्धिक साधन प्रदान करते.

पूर्वीच्या लोकांनी आपापल्या अनुभवांतून, विश्वासातून आणि त्यातून निर्माण होत गेलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कल्पनांमधून वेळो वेळी ज्ञान संपादन केले. या अनुभवांना शब्दबद्ध करण्याचे तसेच ते जतन करण्याचे काम भाषेच्या माध्यमातून केले जाते. त्या ज्ञानातूनच भाषा उत्क्रांत होते. अजूनही त्यात दिवसागणिक भर पडत आहे. कोणत्याही भाषेत शब्दांचे अर्थ, म्हणी, वाक्प्रचार हे त्या त्या लोकसमूहातील लोकांनी वेळो वेळी मिळविलेल्या अनुभवांतून, त्या अनुभवांच्या आधारे मिळविलेल्या ज्ञानातून आणि वैशिष्ट्यपूर्ण समजांतून निर्माण व रूढ  होत असतात. त्यांना सांस्कृतिक अर्थ असतो. ही भाषिक संपत्ती समाजाची भाषिक आणि सांस्कृतिक उत्क्रांती दर्शविण्यास समर्थ असते. एकाच समाजातील, विविध गटातील लोक काही वेळी एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ लावताना दिसून येतात. समाजातील वेगवेगळ्या थरांतील लोक वेगवेगळ्या बोलीभाषा वापरतात. याचे विवेचन भाषाशास्त्रात केले जाते. यातून भाषेची वैशिष्ट्यपूर्ण विविधता आणि लवचिकता दिसून येते.

भाषिक मानवशास्त्र हे सांस्कृतिक मानवशास्त्र आणि शब्दार्थशास्त्र (भाषाशास्त्रातील एक विभाग) अशा आंतरशाखीय विद्याप्रणालींचा वापर करताना दिसते. यात विविध लोकसमूहांची प्राचीन, अर्वाचीन, लिखित, अलिखित इत्यादी स्वरूपातील भाषा, त्यांच्यातील सांस्कृतिक देवाण-घेवाण, बदल इत्यादींचा अभ्यास भाषिक मानवशास्त्रात केला जातो. भाषाशास्त्रात भाषांचा उगम, विकास, रचना, शब्दार्थ, ध्वनिविचार, शब्दकोश इत्यादिंचा अभ्यास करण्यात येतो. या शाखेचा मूळ उद्देश भाषा आणि सांस्कृतिक अनुभूती तसेच सांस्कृतिक वर्तन यांच्यामधील परस्पर संबंध शोधण्याचा असतो.

भाषिक मानवशास्त्रज्ञ त्यांच्या क्षेत्रीय अभ्यासादरम्यान दैनंदिन कामकाजात व्यस्त असताना लोक कोणती भाषा वापरतात, भाषेचा कसा उपयोग केला जातो, यांची तपशीलवार नोंद ठेवतात. हे दस्तैवजीकरण प्रत्यक्ष सहभाग पद्धती, दृक-श्राव्य माध्यमांतून नोंदीकरण, भाषिक उतारे आणि सहभागी व्यक्तींच्या मुलाखती यांच्या साह्याने केले जाते. भाषाशास्त्रज्ञ आणि भाषिक मानवशास्त्रज्ञ यांच्यातील मुलभूत फरक म्हणजे, भाषाशास्त्रज्ञ प्रथमत: भाषेची विशेषतः लिखित भाषेची निर्मिती, जडणघडण यांचा अभ्यास करतात; तर भाषिक मानवशास्त्रज्ञ लिखित तसेच अलिखित म्हणजेच परंपरागत, पिढ्यांपिढ्या संक्रमित होत गेलेल्या भाषांचा अभ्यास करतात. लोक समूहातील भाषेचे स्थान, तिचे सांस्कृतिक महत्त्व, त्यात कालानुरूप होत गेलेले बदल इत्यादींचा अभ्यास ते करतात. भाषिक मानवशास्त्रज्ञाचा उद्देश भाषेची रचना समजून घेणे हा नसून भाषेचे सांस्कृतिक जीवनातील महत्त्व अधोरेखित करणे हा असतो.

समीक्षक – शौनक कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा