कृपलानी, सुचेता : (२५ जून १९०८ – १ डिसेंबर १९७४). भारतीय स्वातंत्र्यसैनिक, भारतीय संविधान समितीच्या सदस्या, मुत्सद्दी राजकारणी आणि स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री. त्यांचा जन्म अंबाला (हरयाणा राज्य) येथे बंगाली ब्राह्मो कुटुंबात सुरेंद्रनाथ मजुमदार व प्रेमबाला मजुमदार या दांपत्यापोटी झाला. त्यांचे वडील सरकारी वैद्यकीय अधिकारी होते. नोकरीमुळे त्यांची विविध ठिकाणी बदली होत. त्यामुळे सुचेता यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विविध ठिकाणी झाले. सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली येथून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यांनी एम. ए. (इतिहास) ही पदवी प्रथम क्रमांकाने पूर्ण केली.
पंजाबमधील अमृतसर येथे ब्रिटिश लष्कराने केलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची घटना सुचेता यांच्या मनावर परिणाम करणारी ठरली. त्यामुळे त्या स्वातंत्र्यचळवळीकडे ओढल्या गेल्या. पुढे वडिलांच्या निधनानंतर कौटुंबिक जबाबदारीमुळे त्या बनारस हिंदू विद्यापीठात इतिहास विषयाच्या व्याख्याता म्हणून रुजू झाल्या (जुलै १९३१). उत्तर भारतात झालेल्या भीषण भूकंपावेळी त्या बिहारमध्ये मदतकार्यासाठी गेल्या (१९३४). या दरम्यान त्यांना ग्रामीण भारताची ओळख झाली, तसेच अनेक काँग्रेस नेत्यांशी त्यांचा संपर्क आला. तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य, महात्मा गांधी यांचे अनुयायी आचार्य जे. बी. कृपलानी यांच्याशी त्यांनी विवाह केला (एप्रिल १९३६). पुढे सुचेता यांनी नोकरीचा राजीनामा देऊन भारतीय स्वातंत्र्यचळवळीत स्वत:ला पूर्णवेळ झोकून दिले (१९३९).
सुचेता यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये महिलांना संघटित करून महिला काँग्रेसची शाखा स्थापन केली. समाजसुधारक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर (ठक्कर बाप्पा) यांच्यासोबत कस्तुरबा ट्रस्ट वर्कच्या सरचिटणीस म्हणून त्यांनी देशभरातील ग्रामीण महिलांसाठी काम केले. महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या वैयक्तिक सत्याग्रह चळवळी दरम्यान सुचेता यांना एक वर्षांचा तुरुंगवास झाला. पुढे ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर सुचेता यांनी सहकाऱ्यांसह मुंबईतून ही चळवळ सक्रिय ठेवली. राममनोहर लोहिया, अरुणा असफ अली, उषा मेहता, अच्युत पटवर्धन, बाबा राघवदास, बाळकृष्ण केकर इ. सहकाऱ्यांसह त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे भूमिगत कार्यालय सुरू ठेवून चळवळीसंदर्भात बातम्या व सूचना देशभर पोहोचवल्या. रेडिओच्या माध्यमातून देश व परदेशात भारतातील ब्रिटिशांच्या दडपशाहीची माहिती पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. या दरम्यान कलकत्ता (कोलकाता), आसाम, नोआखाली इ. ठिकाणी उसळलेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दौरे करून परिस्थिती हाताळण्याचे काम केले. भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातही त्यांनी लाहोर, रावळपिंडी व काश्मीर याठिकाणी भेट दिली.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या विशेष सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ऐतिहासिक भाषणापूर्वी सुचेता यांनी ‘जन गण मन’ आणि ‘सारे जहाँ से अच्छा’ ही गीते गायिली. भारतीय संविधान समिती, तसेच संविधान सभेसमोर ध्वज सादरीकरण करणाऱ्या समितीमध्ये त्यांचा सहभाग होता.
भारतीय स्वातंत्र्यानंतर पहिल्या काही वर्षांत निर्वासितांचे प्रश्न व पुनर्वसन यांसाठी स्थापन केलेल्या लोक कल्याण समितीच्या अध्यक्ष म्हणून सुचेता यांनी महत्त्वपूर्ण काम केले (१९५२-७४). किसान मजदूर प्रजा पक्षाच्या तिकिटावर नवी दिल्लीतून पहिली सार्वत्रिक निवडणूक त्या जिंकल्या (१९५२). पुन्हा १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली (१९५६-६०). उत्तर प्रदेश सरकारमध्ये त्यांनी सी. बी. गुप्ता यांच्या मंत्रिमंडळात कामगार, उद्योग आणि सार्वजनिक विकास मंत्री म्हणून काम केले (१९६१-६३). पुढे गुप्ता यांनी राजीनामा दिल्यानंतर सुचेता उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. स्वातंत्र्योत्तर भारतीय राज्याच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या (२ ऑक्टोबर १९६३ – १३ मार्च १९६७). या काळात त्यांनी उद्योग, कृषी, वीज निर्मिती या क्षेत्रांतील विकासकामांना गती दिली. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात वेतनवाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. हा संप सु. ६२ दिवस चालला, तेव्हा त्यांनी प्रशासकीय कौशल्याने संप परिस्थिती हाताळली. १९६७ मध्ये त्यांनी गोंडा मतदारसंघातून चौथ्या लोकसभेची निवडणूक जिंकली. १९७१ मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली.
सुचेता यांचा परदेशातील तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांमधील अनेक शिष्टमंडळांमध्ये सहभाग होता. संयुक्त राष्ट्रसंघातील संसदीय शिष्टमंडळाच्या सदस्य म्हणून पंडित नेहरूंनी त्यांची निवड केली होती (१९४९). तुर्कीला गेलेल्या संसदीय शिष्टमंडळाच्या त्या नेत्या होत्या (१९५४). बँकॉक येथे ‘सार्वजनिक जीवनातील आशियाई महिलांची भूमिका’ या विषयावरील संयुक्त राष्ट्राच्या परिसंवादात त्या सहभागी होत्या (१९५७). तसेच जिनिव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेत त्यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले (१९६२). आचार्य कृपलानी यांच्यासोबत त्यांनी अमेरिकेत व्याख्यानदौरा केला (१९६०). या दौऱ्यात सुचेता काँग्रेस पक्षाच्या, तर आचार्य कृपलानी प्रजा समाजवादी पार्टीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अखेरपर्यंत त्यांनी गांधीवादी विचारसरणी जोपासली. गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या संस्थापक सदस्य व अध्यक्ष म्हणून ग्रामीण पुनर्रचना व शिक्षण यांसाठी त्यांनी काम केले.
सुचेता यांनी ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ या नियतकालिकात आत्मचरित्रात्मक लेखमालिका लिहिली. त्यामध्ये त्यांच्या १९४७ पर्यंतच्या जीवनप्रवासाचे चित्रण आहे. पुढे ते लेख ‘सुचेता ॲन अनफिनिश्ट ऑटोबायॉग्रफी’ या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित झाले (१९७८).
नवी दिल्ली येथे हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Tope, T. K., Bombay and Congress Movement, Maharashtra State Board For Literature and Culture, Bombay, 1986.
- Vaswani, K. N. Ed., Sucheta an unfinished autobiography, Navajivan Publishing House, Ahmedabad, 1978.
- https://www.s-asian.cam.ac.uk/archive/audio/collection/s-kripalani/ University of Cambridge, Centre of south Asian studies, 1974.
समीक्षक : सरोजकुमार मिठारी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.

