मारबर्ग विषाणू मनुष्य आणि इतर कपिवर्गी प्राण्यांमध्ये (Primates) रक्तस्रावी आजार (Hemorrhagic fever) उत्पन्न करणारा एक आक्रमक विषाणू आहे. मारबर्ग विषाणूच्या संसर्गाला मारबर्ग विषाणूजन्य आजार किंवा मारबर्ग रक्तस्रावी ताप (Marburg hemorrhagic fever) असेही म्हणतात.

पार्श्वभूमी : मारबर्ग विषाणूचा सर्वांत पहिला उद्रेक १९६७ मध्ये जर्मनीमधील मारबर्ग शहरात नोंदवला गेला. पोलिओच्या लसीवरील संशोधनासाठी युगांडामधून आणलेल्या आफ्रिकन हिरव्या माकडांच्या (Chlorocebus aethiops) संपर्कात आलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञांना एका अज्ञात रोगाची लागण झाली. त्याच वेळी फ्रँकफुर्ट आणि युगोस्लाव्हियामधील बेलग्रेड शहरात देखील त्याच आजाराचे आणखी रुग्ण सापडले. रुग्णांच्या रक्ताचे नमुने इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीखाली तपासल्यानंतर त्यात धाग्यासारखे लांब रोगजंतू दिसून आले. प्रथमदर्शनी हे रोगजंतू म्हणजे लेप्टोस्पायरा हा तंतूसारखा दिसणारा जीवाणू असल्याची शंका वैज्ञानिकांना आली. परंतु मारबर्ग आणि हॅंबर्गमधील वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासातून हा रोगजंतू लेप्टोस्पायरा जीवाणू नसून, आजवर कधीही न पाहिलेला नवीन विषाणू असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. क्रिस्तिआन कुन्झ (Dr. Christian Kunz), डॉ. रॉबर्ट किसलिंग (Dr. Robert E. Kissling) या विषाणूतज्ञांनी स्वतंत्र संशोधनानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले. मारबर्ग शहरात सर्वप्रथम सापडलेल्या या नवीन विषाणूला मारबर्ग विषाणू असे नाव देण्यात आले. त्याला पूर्वी लेक व्हिक्टोरिया मारबर्ग विषाणू म्हणूनही ओळखले जात असे, परंतु आता हे नाव वापरात नाही.

पहिल्या उद्रेकानंतर आफ्रिकेच्या दक्षिण भागात तसेच रशियामध्ये मारबर्ग आजाराचे अनेक छोटेछोटे उद्रेक दिसू लागले. परंतु त्यांमध्ये रुग्णांची संख्या आणि मृत्युदर दोन्ही कमी होते. १९९८ व २००० मध्ये काँगो आणि २००४-०५ मध्ये अंगोलामध्ये मारबर्ग आजाराच्या मोठ्या साथी उद्भवल्या. त्यांमध्ये ८३-९० % इतका अधिक मृत्युदर नोंदवला गेला. अंगोलामधील उद्रेक आजवरचा सर्वांत मोठा उद्रेक मानला जातो. या उद्रेकांनंतर साथीचा रोग म्हणून त्याचे गांभीर्य पुन्हा एकदा जाणवू लागले.

२००४-२०१७ या काळामध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, अंगोला, गिनी, युगांडा, घाना, विषुववृत्तीय गिनी (Equatorial Guinea) या देशांमध्ये मारबर्ग आजाराच्या तुरळक साथी येत राहिल्या आहेत. २०२३ मध्ये टांझानिया आणि विषुववृत्तीय गिनी, २०२४ मध्ये रवांडा आणि २०२५-२६ मध्ये इथिओपियामध्ये पहिल्यांदाच मारबर्ग आजाराच्या साथी आल्यानंतर मारबर्ग विषाणूपासून सार्वजनिक आरोग्याला असलेला धोका पुन्हा अधोरेखित झाला.

आ. १. मारबर्ग विषाणू

विषाणू संरचना : लांबलचक धाग्यासारखी रचना असलेला हा विषाणू फिलोव्हिरिडी (Filoviridae) कुळात मोडतो. किंबहुना फिलोव्हिरिडी कुळातील सापडलेला हा पहिला सदस्य आहे. इबोला व्हायरस (Ebola virus), क्वेव्हा व्हायरस (Cueva virus), स्ट्रीया व्हायरस (Stria virus) आणि थॅम्नो व्हायरस (Thamno virus) हे या कुळातील इतर सदस्य आहेत. यांपैकी मारबर्ग आणि इबोला विषाणू गंभीर आजार उत्पन्न करतात.

इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीखाली मारबर्ग विषाणू लांब तंतूप्रमाणे दिसतात. बहुतांश विषाणू तंतू (Virus filaments) ७९५-८२८ नॅमी. आणि ८० नॅमी. व्यासाचे असतात. परंतु क्वचित ऊतिसंवर्धनातील नमुन्यांमध्ये १४,००० नॅमी. इतक्या अत्याधिक लांबीचे विषाणू कण पाहायला मिळतात. लवचिक विषाणू तंतू इंग्रजी यू (U) अक्षराप्रमाणे, ६ (६) आकड्याप्रमाणे, कड्याप्रमाणे, तारेच्या गुंडाळीसारखे, दंडगोलाकार, अशा विविध आकारात आढळतात. तसेच मेषपाल यष्टी या विशेष आकाराचे (मेंढपाळांकडील वक्राग्र काठीच्या आकाराचे, Shepherd’s crook) विषाणू नेहमी दिसतात.

विषाणू तंतू तीन थरांचा बनलेला असतो. सर्वांत बाहेरचा थर म्हणजे वसा-प्रथिनांचे गुळगुळीत आवरण (Lipoprotein membrane) असते. आश्रयी पेशी फोडून बाहेर पडताना विषाणूभोवती हे आवरण गुंडाळले जाते. त्यावर ठराविक अंतरावर खिळ्यांसारखी दिसणारी ग्लायकोप्रथिने आढळतात. विषाणूला आश्रयी पेशीवर चिकटण्यास व शिरकाव करण्यास ती मदत करतात. त्याखालील आधारद्रव्य थर (Matrix layer) दोन प्रथिनांचा बनलेला असून इतर थरांना एकत्र बांधून ठेवतो. तसेच आधारद्रव्य प्रथिने (Matrix proteins) विषाणूची रचना आणि मुकुलनाच्या (Budding) प्रक्रियेत महत्त्वाची ठरतात. त्याखाली गाभ्यामध्ये विषाणूचा अविभाजित अर्थात एका अखंड धाग्याप्रमाणे असलेला (Non-segmented), एकेरी ऋण पेड आरएनए (Single stranded, Negative sense RNA) जीनोम (Genome) असतो. त्याभोवती चार वेगवेगळ्या प्रथिनांचे बनलेले सर्पिल आकाराचे संरक्षक कवच व प्रतिकरण आणि प्रतिलेखनासाठी आवश्यक प्रथिने असतात. या सर्व घटकांना मिळून न्यूक्लिओकॅप्सिड (Nucleocapsid) किंवा रिबोन्यूक्लिओकॅप्सिड (Ribonucleocapsid complex) संकुल म्हणतात. मारबर्ग विषाणूचा जीनोम १९,१०० न्यूक्लिओटाइडांचा बनलेला असून त्यात सात जनुके असतात.

जगभरातील विविध उद्रेकांमध्ये सापडलेल्या मारबर्ग विषाणूंच्या जनुकांमध्ये थोडेसे जनुकीय वैविध्य आढळते. त्यानुसार विषाणूचे ए आणि बी असे दोन गट पडतात.

रोगप्रसार : मारबर्ग पशुसंक्रमित/ प्राणिजन्य (Zoonotic disease) रोग आहे. ईजिप्शियन फलभक्षी वटवाघळे (Egyptian fruit bat, Rousettusa aegyptiacus) त्याचे नैसर्गिक संचयी यजमान (Reservoir host) आहेत. अंधाऱ्या गुहा व कड्याकपारीमध्ये राहणारी वटवाघळांची ही प्रजाती दक्षिणी आफ्रिकेमध्ये सर्वत्र आढळते. ज्या भागांमध्ये वारंवार मारबर्ग आजाराचे उद्रेक होतात तेथील ईजिप्शियन फलभक्षी वटवाघळांच्या रक्तद्रव्यामध्ये विषाणू संसर्गाचे पुरावे सापडतात. तसेच त्यांच्याकडून लांब बोटांची वटवाघळे / मध्यमांगुली वटवाघळे (Long fingered bats, Miniopterus inflatus) आणि (Eloquent horseshoe bat, Rhinolophus eloquens) या दोन स्थानिक प्रजातींमध्ये आंतरप्रजातीय संक्रमण होत असल्याचे मानले जाते. विषाणूग्रस्त वटवाघळांमध्ये  आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. परंतु त्यांची लाळ, मलमूत्र  आणि सर्व शारीरिक द्रवांमध्ये मोठ्या प्रमाणात विषाणू आढळतात आणि त्याद्वारे इतर वटवाघळांमध्ये विषाणू पसरतो. तसेच मातेकडून पिलांमध्येही संक्रमण होते. अशा प्रकारे वटवाघळांमध्ये नैसर्गिक संसर्गचक्र सुरू राहते. परंतु कपिवर्गीय प्राणी, मानव किंवा अन्य प्रजातींचे प्राणी जेव्हा अपघाताने या चक्रात शिरतात, तेव्हा हा विषाणू इतर प्रजातींमध्ये उडी मारून शिरकाव करतो. संचयी यजमानांकडून इतर प्रजातींमध्ये होणाऱ्या संक्रमणाला प्लुत संक्रमण / प्लुत प्लवन (spill over) असे म्हणतात. आजवरच्या बहुतांश उद्रेकांमागे प्लुत प्लवनाच्या घटना कारणीभूत असल्याचे मानले जाते.

वटवाघळांचे रक्त, मांस आणि अन्य शारीरिक द्रवांशी थेट संपर्क, त्यांनी अर्धवट खाल्लेल्या फळांमधून किंवा लाळेने अथवा मलमूत्राने दूषित पृष्ठभागांशी संपर्क आल्यामुळे इतर प्रजातींच्या प्राण्यांना विषाणूचा संसर्ग होतो. संसर्गग्रस्त प्राण्यांच्या शरीरात विषाणू वाढू लागतो आणि ते संसर्गस्रोत बनतात. त्यांच्या शारीरिक द्रवांशी संपर्क आल्याने, तसेच त्यांचे मांस हाताळल्याने व खाण्यातून विषाणू मानवापर्यंत पोहोचतो.

त्वचेमधील सूक्ष्मभेगा, जखमा, ओरखडे आणि डोळे, नाक व तोंडातील श्लेष्मलपटलांमधून (Mucous membrane)  मारबर्ग विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो.

आ. २. मारबर्ग विषाणूजन्य आजार : काही लक्षणे.

लक्षणे : मारबर्ग विषाणूचा उद्भवन काल म्हणजेच उबवण काल (Incubation period) २-२१ दिवस असतो. बहुतांश रुग्णांमध्ये ५-१० दिवसांत लक्षणे दिसू लागतात. लक्षणे आकस्मिक असून त्यांची तीव्रता वाढत जाते. आजाराचे तीन प्रमुख अवस्था असतात.

(१) सामान्य अवस्था (Generalized phase) : पहिल्या किंवा सामान्य पायरीतील लक्षणे दिसू लागल्यानंतर ही अवस्था १-५ दिवस टिकते. या अवस्थेमधील सुरुवातीची लक्षणे फ्लू प्रमाणेच असतात. प्रचंड थकवा आणि मरगळ, ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाजून येणे, उलट्या,  मळमळ, भूक मंदावणे, अतिसार इत्यादी लक्षणे दिसतात. हळूहळू डोळ्यांची जळजळ, तोंडातील त्वचेवर पुरळ, घशाला सूज येणे, गिळताना व बोलताना वेदना होणे ही लक्षणे दिसू लागतात आणि त्यानंतर शरीरावर सर्वत्र त्वक्चर्पटपीटिकायुक्त पुरळ (Maculopapular rash)  येते.

(२) प्रारंभिक अवयव अवस्था (Early organ phase) : सामान्य अवस्थेच्या पुढील हा टप्पा होय. ५-१३ दिवसापर्यंत चालणाऱ्या या अवस्थेमध्ये विषाणू शरीरात सर्वत्र पसरून वाढू लागतो. आत्यंतिक थकवा व ग्लानी येणे, डोळ्यांचा दाह, श्वसनास त्रास होणे व उच्च तापापासून लक्षणे सुरू होऊन हळूहळू रक्तस्रावी आजाराची विशिष्ट लक्षणे विकसित होत जातात. त्वचेखालील बारीक रक्तवाहिन्या (केशिका-केश वाहिन्या) फुटल्यामुळे शरीरावर लहान लाल, जांभळे किंवा तपकिरी रंगाचे डाग किंवा ठिपके उठतात. यानंतर ७५% पेक्षा अधिक रुग्णांमध्ये गंभीर अंतर्गत रक्तस्राव सुरू होऊन, त्वचेखाली रक्त साकळण्याबरोबरच नाक, तोंड, डोळ्यांमधील श्लेष्मल त्वचा, हिरड्या, योनी, गुदद्वारातून रक्तस्राव होऊ लागतो. आतड्यांमध्ये रक्तस्राव झाल्याने शौचामध्ये रक्त, काळी आणि डांबरासारखी शौचाला होणे आणि रक्ताच्या उलट्या होतात. इतकेच नव्हे तर सुई टोचलेल्या जागी थांबवता न येणारा रक्तस्राव होऊ लागतो. गर्भवती स्त्रियांमध्ये अचानक गर्भपात झाल्याचे दिसून आले आहे. अनेक रुग्णांमध्ये विभ्रम, गोंधळ, चित्तभ्रम, संताप व आक्रमकता आणि मस्तिष्कदाह ही लक्षणेदेखील दिसतात.

(३) विलंबित अवयव अवस्था (Late organ phase) : १३-२० किंवा अधिक दिवसांमध्ये आजाराचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू होतो. ही विलंबित अवयव अवस्था होय. काही रुग्णांमध्ये आकडी येणे, वृषणांचा दाह, अनियंत्रित रक्तस्राव ही लक्षणे वाढत जाऊन अवयवांचे कार्य मंदावत जाते आणि अनेक अवयव निकामी होतात. अशा आजार गंभीर स्वरूपाच्या आजारामध्ये ८-१६ दिवसांमध्ये रुग्ण दगावतात. बचावलेल्या रुग्णांमध्ये आजारातून बाहेर पडण्याची दीर्घकालीन प्रक्रिया सुरू होते. त्यादरम्यान अत्याधिक थकवा, घाम येणे, त्वचा सोलवटणे, स्नायू व सांधेदुखी, यकृत दाह आणि स्मृतिभ्रंश ही लक्षणे दिसतात. ही प्रक्रिया काही आठवड्यापासून अनेक महिन्यांपर्यंत लांबू शकते.

उद्भवन काळात रुग्ण संसर्गक्षम नसतात. परंतु लक्षणे दिसू लागल्यानंतर ऊती, रक्त, लाळ, मूत्र, विष्ठा, घाम, उलटी, गर्भजल, अंगावरचे दूध, वीर्य व अन्य सर्व शारीरिक द्रवांमध्ये विषाणूचे प्रमाण वाढत जाते. यांपैकी कोणत्याही द्रवाच्या थेट संपर्कात आल्याने किंवा आजारी व्यक्तीने वापरलेल्या अंथरुण, कपडे, संक्रमित सुया, वैद्यकीय उपकरणे इत्यादींमधून विषाणू संसर्ग होतो. तसेच लैंगिक संबंधातून आणि मातेकडून अर्भकाला विषाणू पसरतो. रुग्णांवर उपचार व शुश्रूषा करणाऱ्या व्यक्ती, इतकेच नव्हे तर शवे हाताळणाऱ्या व्यक्तींना देखील संसर्गाचा धोका असतो. कीटकदंश आणि हवेतून मारबर्ग विषाणूचा प्रसार होत नाही.

बहुतांश रुग्णांमध्ये एकदा आजारातून बरे झाल्यानंतर पुन्हा अभावानेच संसर्ग होतो. परंतु क्वचित मारबर्ग विषाणू वृषणे व डोळ्यांमधील ऊतींमध्ये लपून राहतो. तसेच बऱ्या झालेल्या रुग्णांच्या वीर्यामध्ये सात आठवड्यापर्यंत विषाणू आढळतात. त्यामुळे आजारातून बऱ्या झालेल्या पुरुषांना तीन महिन्यांपर्यंत चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो.

उपचार : मारबर्ग आजाराविरुद्ध विशिष्ट विषाणुरोधी औषधे अजून उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय उपचारांचा मुख्य भर लक्षणांची तीव्रता कमी करण्यावर असतो. शरीरातील द्रवांची कमतरता भरून काढल्याने आणि रक्तदाब व ऑक्सिजन पातळी नियंत्रित करून रुग्णाची परिस्थिती स्थिर ठेवता येते. तसेच अंतर्गत रक्तस्राव नियंत्रणात आणण्यासाठी रक्तसंक्रमण आणि लवणद्रावाद्वारे (सलाइनद्वारे) दिली जाणारी वेदनाशामक आणि ताप उतरवणारी औषधे लक्षणे सौम्य करण्यास मदत करतात.

मारबर्ग रक्तस्रावी आजाराची सुरुवातीची लक्षणे फ्लू, टायफॉइड, मलेरिया यांच्याशी मिळतीजुळती असल्याने केवळ प्राथमिक लक्षणांच्या आधारे त्याचे निदान करणे सोपे नसते. विपरित प्रतिलेखी पॉलिमरेझ शृंखला अभिक्रिया अर्थात आरटी-पीसीआर (Reverse Transcription-Polymerase Chain Reaction, RT-PCR) तंत्रज्ञानाच्या मदतीने रक्त व इतर शारीरिक द्रवांमधून विषाणूचा आरएनए वेगळा करून विषाणूची ओळख पटवता येते. तसेच एलायझा पद्धतीने (एंझाइम-संबद्ध प्रतिपिंडशोषक परीक्षण, ELISA, Enzyme-Linked Immunosorbent Assay) रक्तातील विशिष्ट प्रतिपिंडांचा शोध घेतला जातो. याशिवाय इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली ऊतींचे नमुने तपासल्यास विषाणूचे नेमके निदान करता येते.

मारबर्ग विषाणू विरुद्ध आता विशिष्ट औषधे उपलब्ध नाहीत. परंतु इस्ट्राडायॉलबेन्झोएट (Estradiol benzoate), फॅव्हिपिराव्हिर (Favipiravir), गॅलिडेसीव्हिर (Galidesivir), पॅलिपेरिडोन (Paliperidone), टायलोरोन (Tilorone), क्विनाक्राइन (Quinacrine) यांसारखी काही नवीन औषधे प्रभावी ठरताना दिसत आहेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना : मारबर्ग विषाणू विरुद्ध प्रतिबंधात्मक लसींना अजून मान्यता मिळालेली नाही. परंतु अनेक लसींवर संशोधन सुरू आहे. सॅबिन व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट या संस्थेने (Sabin Vaccine Institute) विकसित केलेल्या सीएडी३-मारबर्ग (cAd3-marburg) या लसीवर सध्या फेज -२ क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. रवांडामध्ये २०२४ मध्ये झालेल्या उद्रेकामध्ये ती प्रायोगिक स्तरावर वापरली गेली होती. बव्हेरिअन नॉर्डिक (Baverian Nordic) आणि यान्सेन फार्मास्युटिकल्स (Jannsen pharmaceuticals) यांनी विकसित केलेली एमव्हीए-बीएन-फायलो (MVA-BN-Filo) तसेच इंटरनॅशनल एड्स व्हॅक्सिन इनिशिएटिव्ह (International AIDS Vaccine Initiative – IAVI) या संस्थेने विकसित केलेली (rVSV∆G-MARV-GP) लस आत्ता प्रयोगशालेय चाचण्यांमध्ये असून त्यांचे निष्कर्ष आश्वासक आहेत. एक कृतक प्रतिपिंडे एमआर १९१/एमआर १९१-एन (MR191 / MR191-N), एमबीपी ०९१(MBP091) आणि मार्व्ह १६ (MARV16) ही एक कृतक प्रतिपिंडे चाचण्यांच्या विविध टप्प्यांवर आहेत.

मारबर्ग हा उद्गमित विषाणू (Emerging viruses) प्राणघातक आहे. मारबर्ग रक्तस्रावी आजाराचा सरासरी मृत्युदर ५०-६० % आहे. परंतु विविध ठिकाणच्या उद्रेकांमध्ये २४-९० %  मृत्युदर नोंदवला गेला आहे.

रोगाचे भयंकर स्वरूप, संक्रमणाचा वेग, उच्च मृत्यूदर आणि कोणतेही निश्चित उपचार उपलब्ध नसल्यामुळे त्याला जैव सुरक्षा पातळी ४ रोगजंतूंचा (Bio safety level 4 pathogen) दर्जा दिला गेला आहे. वारंवार साथी येणाऱ्या भागांमध्ये रोगाचा प्रसार रोखण्यासाठी विषाणूबद्दल जागरूकता वाढवणे आणि सक्रिय लोक सहभाग अत्यंत महत्वाचे ठरतात. रुग्णाचे नातेवाईक, उपचार करणारे आरोग्य सेवा कर्मचारी आणि नमुने हाताळणाऱ्या प्रयोगशाळा कर्मचारी सर्वांनाच वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांचा (PPE, Personal Protective Equipment) वापर आणि जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा सल्ला देण्यात येतो. तसेच प्राथमिक लक्षणे दिसू लागताच लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळवणे, रुग्णाचे तात्काळ विलगीकरण आणि अनावश्यक संपर्क टाळणे, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या सूचना पाळणे यांसारखे साधे सोपे उपाय संक्रमणाचा वेग कमी करण्यास मदत करतात. नवनवीन ठिकाणी होणारे उद्रेक आणि त्यांची वाढत चाललेली वारंवारता यामुळे वारंवार उद्रेक होणाऱ्या भागांमध्ये ये-जा करणारे पर्यटक, प्रवासी आणि संशोधकांना अपघाती संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

तसेच एमआरएनए तंत्रज्ञानामुळे मारबर्ग विषाणूवरील उपचारांना नवी दिशा मिळत आहे. त्यावर आधारित नवनवीन उपचारपद्धती संशोधनाधीन आहेत.

 

संदर्भ :

  1. https://en.wikipedia.org/wiki/Marburg_virus
  2. https://www.antibodysystem.com/archive/72.html
  3. https://www.cdc.gov/marburg/outbreaks/index.htm
  4. https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/marburg-virus-disease
  5. ArashLetafati, Somayeh Sadat HosseiniFakhr, Ali QaraeeNajafabadi, NeginKarami, Hassan Karami, Marburg Virus Disease: A Narrative Review, First published: 06 May 2025.
  6. Kristina Brauburger , Adam J Hume, ElkeMühlberger, Judith Olejnik, Forty-Five Years of Marburg Virus Research, Viruses 2012 Oct 1;4(10):1878–1927. doi: 3390/v4101878.

  समीक्षण : मद्वाण्णा, मोहन

 

 

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.