शारीरिक संतुलन म्हणजे शरीरस्थिती स्थिर अवस्थेत राखणे होय. अंतर्कर्ण (Inner ear), डोळे (दृष्टी) आणि स्पर्शज्ञानाद्वारे शरीराला शारीरिक संतुलन राखण्यास मदत होते. शरीर संतुलनामुळे न अडखळता चालणे, खुर्चीमधून ऊठ-बस करणे, पायऱ्या चढ-उतार करणे इ. दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करणे शक्य होते.

शरीरस्थिती स्थिर राखण्यास अवघड होऊन अनेकदा व्यक्तीचा तोल ढासळतो, याला संतुलन अवपात असे म्हणतात. ही वयस्कर व्यक्तींमध्ये आढळणारी सामान्य अडचण आहे. अंतर्गत कर्णामधील प्रक्षोभामुळे (Disturbance) देखील अशी समस्या उद्भवते. भोवळ येणे (Vertigo) हे याचे सामान्य लक्षण आहे.

संतुलन अवपाताची कारणे आणि लक्षणे : (१) अंतर्गत कर्णसंबंधित विकार [Benign Paroxysmal positional Vertigo (BPPV)],  कर्णसंसर्ग (Labyrinthitis), क्षोभ (Inflammation).

(२) डोक्याला लागलेला मार, वयोवृद्धपणा.

(३) मेन्येअर रोग (Meniere’s Disease) : यामध्ये भोवळ, कानात आवाज येणे, तात्पुरते ऐकू न येणे (temporary deafness) अशी लक्षणे दिसून येतात.

(४) चिरकालीन आजार (Chronic conditions) : पार्किनसन/ अल्झायमर विकार इ.

(५) रॅम्झी हंट रोगसमूह (Ramsay Hunt Syndrome) : यामध्ये भोवळ येणे, कानदुखी/ऐकू न येणे अशी लक्षणे दिसून येतात.

(६) अर्धशिशी (Migraine)

(७) गतिविषयक आजार (Motion sickness): यामध्ये भोवळ, डोके हलके जाणवणे, शारीरिक असंतुलन, चक्कर येणे, अस्पष्ट दिसणे, संभ्रमावस्था (Confusion) अशी लक्षणे दिसून येतात.

तसेच मेंदूतील रासायनिक असंतुलन, अनियमित रक्तपुरवठा, उच्च रक्तदाब इत्यादी कारणांमुळे देखील व्यक्तीचे शारीरिक संतुलन ढासळते.

चलनेत्र आलेखन

निदान : संतुलन अवपाताचे निदान करणे अवघड आहे. यासाठी कर्णनस्यकंठतज्ञ (Otolaryngologist) आणि कर्णतज्ञ (Audiologist) यांच्याकडून तपासणी करून घ्यावी लागते. कर्णनस्यकंठतज्ञ हा कान, नाक, घसा आणि गळा  यांबाबतच्या आजारांची तपासणी करणारा तज्ञ (Physician) आणि शल्यविशारद (Surgeon) असतो, तर कर्णतज्ञ हा अंतकर्ण यंत्रणा आणि श्रवणक्षमता तपासणी करणारा असतो.

चलनेत्र आलेखन (Nystagmography) : या तपासणीदरम्यान डोळ्यांची हालचाल आणि त्या हालचालीचे नियंत्रण करणाऱ्या स्नायूंची नोंद घेतली जाते.

अंगस्थिती आलेखन  (Posturography) : यामध्ये विविध परिस्थितींमध्ये म्हणजेच चल पृष्ठभागावर (उदा., चक्राकार फिरणारी खुर्ची इ.) एखादी व्यक्ती आपले शारीरिक संतुलन कसे राखते, याची नोंद घेतली जाते.

अंगस्थिती आलेखन

उपचारपद्धती : औषधोपचार : संतुलन अवपाताकरिता प्रतिजैविके (Antibiotic) किंवा कॉर्टिकोस्टेरॉइड अशा औषधांचा वैद्यकीय सल्ल्यानुसार वापर केला जातो.

भौतिकोपचा : (१) दिवसातून किमान १५-२० मिनिटे गतीने चालावे. स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस वजनाचा वापर करून व्यायाम करावा. यामुळे घट्ट स्नायूंना ताण देऊन सैल होतात. (२) तोल सुधारण्यासाठी जमिनीवर किंवा फोमवर एका पायावर उभे राहणे हे आवश्यक असते. तसेच चलसाहाय्यक (Walker), कुबडी किंवा काठीचा वापर करून चालण्याने आधार क्षेत्र वाढते. त्यामुळे व्यक्तीचा तोल व्यवस्थित राहतो. (३) योग व ताई-ची (Tai-chi) अशा व्यायाम प्रकारांमुळे पोटाच्या स्नायूंची ताकद वाढते, परिणामी तोल जाणे कमी होते. योनिमार्गाच्या स्नायूंची ताकद वाढवणेदेखील शारीरिक संतुलन राखण्यात मदत करते.

उपाययोजना : शारीरिक असंतुलन टाळण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक असते. घरातील सामान सुटसुटीत ठेवून चालण्याकरिता मोकळी जागा अधिक असावी. पायऱ्यांवर धारकदंड  (Railing) असावेत. शौचालय कूपाची (Toilet/Commode) उंची वाढवावी तसेच उभे राहण्यासाठी धारकदंड असावेत. रात्रीच्या वेळी दिव्यांची सुयोग्य व्यवस्था असावी.

पहा : अल्झायमर विकार; पार्किनसन विकार; मेन्येअर रोग; रॅम्झी हंट लक्षणसमूह; शारीरिक ठेवण.

संदर्भ :