कोणत्याही बाजारपेठेतील विक्रेता एखाद्या वस्तू किंवा सेवेची किती प्रमाणात विक्री करू शकतो व इच्छितो, ते प्रमाण म्हणजे त्या वस्तूचा किंवा सेवेचा पुरवठा होय. हा पुरवठा अनेक घटकांवर अवलंबून असतो; परंतु त्या वस्तूची किंवा सेवेची किंमत हा पुरवठा निश्चित करणारा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. एखाद्या वस्तूची किंमत जेव्हा अधिक असते, तेव्हा तिच्या विक्रीतून मिळणारा फायदाही अधिक असतो. त्यामुळे विक्रेताही त्या वस्तूची अधिक प्रमाणात विक्री करू पाहतो. याउलट, जर एखाद्या वस्तूची किंमत कमी असेल, तेव्हा काही विक्रेते त्या वस्तूची विक्री बंद करून बाजारपेठ सोडण्याचाही निर्णय घेऊ शकतात. यामुळे त्या वस्तूचा पुरवठा शून्यावर येऊ शकतो. वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यांतील हा परस्परसंबंध म्हणजे ‘पुरवठ्याचा नियम’ होय. पुरवठ्याच्या नियमानुसार, ʿइतर सर्व घटक स्थिर असताना, जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढते, तेव्हा तिचा पुरवठाही वाढतो आणि जेव्हा त्या वस्तूची किंमत घसरते, तेव्हा तिचा पुरवठाही कमी होतोʾ.
बाजारपेठेतील अनेक घटक स्थिर असताना एखाद्या ‘क्ष’ या वस्तूचा पुरवठा तिच्या किमतीच्या बदलाच्या दिशेनेच बदलतो. म्हणजेच, अधिक किमतीला अधिक वस्तू बाजारपेठेत पुरविण्याची आणि कमी किमतीला कमी पुरवठा करण्याची
प्रवृत्ती साधारणत: विक्रेत्यांमध्ये दिसून येते. हा किंमत-पुरवठा संबंध खालील तक्त्यात स्पष्ट दिसून येतो.
या तक्त्याच्या आधारे काढलेल्या वक्रास पुरवठा वक्र असे म्हणतात. ‘क्ष’ या वस्तूच्या विविध किंमतपातळ्यांशी निगडित पुरवठा हा वक्र आपल्याला दर्शवितो.

पुरवठ्याच्या नियमामध्ये जसे किंमत आणि पुरवठा यांना महत्त्व आहे, तसेच त्यामध्ये असलेल्या इतर घटकांचा विचार करणेही आवश्यक ठरते; कारण हे इतर घटक एकप्रकारे या पुरवठ्याच्या नियमाचे गृहीतक म्हणून भूमिका बजावतात.
गृहीतके : पुरवठ्याच्या नियमानुसार बाजारपेठेतील अनेक घटक स्थिर असताना अधिक किमतीला अधिक वस्तू बाजारपेठेत पुरविण्याची आणि कमी किमतीला पुरवठा कमी करण्याची प्रवृत्ती आपल्याला साधारणत: विक्रेत्यांमध्ये दिसून येते. म्हणजेच हे इतर घटक जेव्हा स्थिर नसतील, तेव्हा त्यांचा वस्तूच्या पुरवठ्यावर थेट परिणाम दिसून येतो. म्हणूनच पुरवठ्याचा नियम जर लागू व्हायचा असेल, तर या सर्व घटकांचे स्थिर असणे आपल्याला गृहीत धरावे लागते. याचाच अर्थ असा की, या इतर घटकांच्या परिणामांमुळे वस्तूचा पुरवठा ‘नियमाप्रमाणे’ काम न करता बदलाच्या वेगळ्या प्रवृत्ती किंवा कल दर्शवू शकतो. पुरवठ्याच्या नियमाची गृहीतके पुढील प्रमाणे आहेत :
- उत्पन्नात बदल नाही : खरेदीदाराच्या किंवा विक्रेत्याच्या उत्पन्नात कोणताही बदल होत नाही.
- उत्पादनाच्या तंत्रात बदल नाही : उत्पादन खर्चात बदल होऊ नये म्हणून उत्पादनाच्या तंत्रात बदल होत नाही. उत्पादन तंत्रातील सुधारणांमुळे उत्पादन खर्चात घट झाली, तर वस्तूच्या किमतीतही घट केली जाऊ शकते. तसेच या घटत्या किमतीला वस्तूचा पुरवठा वाढविणेही विक्रेत्याला शक्य होते.
- वाहतूक खर्चात बदल नाही : वाहतूक सुविधा आणि वाहतूक खर्च बदलत नाही, असे गृहीत धरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाहतूक खर्च घातला की, उत्पादन खर्चात घट होते; त्यामुळे वस्तूची किंमतही कमी होऊ शकते. या घटत्या किमतीलाही विक्रेता वस्तूचा पुरवठा वाढवू शकतो.
- उत्पादन खर्चात बदल नाही : वस्तूच्या किमतीबरोबर जर उत्पादन खर्चात वाढ झाली, तर वस्तूचा पुरवठा वाढविणे विक्रेत्याला शक्य होत नाही; किंबहुना ते व्यवहार्य ठरत नाही. किमतीबरोबर वस्तूचा पुरवठा वाढायचा असेल, तर उत्पादन खर्चात वाढ होता कामा नये. म्हणजेच जमिनीला मिळणारा खंड, श्रमाला मिळणारे वेतन, भांडवलाला मिळणारे व्याज आणि उद्योजकाला मिळणारा नफा हा स्थिर असायला हवा.
- उत्पादनाचे प्रमाण स्थिर आहे : उत्पादनाचे प्रमाण बदलले की, वस्तूचा पुरवठाही बदलता येऊ शकतो. त्यासाठी किंमत बदलाची गरजा नसते. त्यामुळे उत्पादनाचे प्रमाण स्थिर मानणे आवश्यक ठरते.
- सट्टेबाजी केली जात नाही : भविष्यातील किमतीचा अंदाज लावत विक्रेत्याला बाजारातील वस्तूचा पुरवठा बदलत नफ्याचे प्रमाण वाढविता येते. अशा वेळी विक्रेत्याने केलेला वस्तूचा पुरवठा हा पुरवठ्याच्या नियमाप्रमाणे बदलताना दिसत नाही. उदा., भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत वाढती राहणार असल्याचा विक्रेत्याचा अंदाज असेल, तर आज त्या वस्तूची किंमत वाढत असूनही तो विक्रेता त्या वस्तूचा पुरवठा वाढविणार नाही. उलट, भविष्यात पुरवठा वाढविण्यासाठी त्या वस्तूचा साठा करून ठेवेल. म्हणून विक्रेता भविष्यातील किमतीचा अंदाज लावत नाही, असे गृहीत धरण्यात आले आहे.
- सरकारी धोरणात बदल नाही : पुरवठ्याच्या नियमानुसार कर धोरण किंवा व्यापार धोरण यासारख्या सरकारी धोरणांत बदल होत नाही, असे गृहीत धरले जाते; कारण सरकारी धोरणातील बदलांनुसार उत्पादन खर्च किंवा उत्पादनाचे प्रमाण बदलत राहते आणि वस्तूची किंमत बदलो किंवा न बदलो, वस्तूचा पुरवठा अपेक्षित दिशेने बदलता येत नाही.
साधारणत: या गृहीतकांच्या पार्श्वभूमीवर पुरवठ्याचा नियम लागू होताना आढळून येतो. वैयक्तिक पातळीवर झालेल्या पुरवठ्याची बेरीज म्हणून बाजारातील एकूण पुरवठा दाखविता येतो. त्यामुळे बाजारातील एकूण पुरवठा वक्र हा वैयक्तिक पुरवठा वक्राप्रमाणे दिसतो.

पुरवठा वक्रातील बदल : वस्तूच्या किमतीतील बदल हा एकाच पुरवठा वक्रावरील स्थान बदलून दाखविता येतो. म्हणजेच, वस्तूची किंमत वाढल्याने पुरवठादाराने जर अधिक वस्तूंचा पुरवठा करायचा ठरवलं, तर तो आपोआप पुरवठा वक्रावर वरच्या दिशेला सरकेल. किंमत वगळता इतर घटकांमध्ये बदल झाले (उदा., उत्पादनाचे तंत्रज्ञान, किमतीविषयीच्या अपेक्षा किंवा बाजारातील एकूण पुरवठादारांची संख्या), तर पुरवठा वक्रच खालच्या किंवा वरच्या दिशेला सरकतो.
वस्तूची किंमत नगाला ६५ रु. वरून १०५ रु. इतकी झाल्यानंतर वाढलेला पुरवठा आकृती क्र. २ मध्ये एकाच पुरवठा वक्राच्या बिंदू ‘अ’ वरून बिंदू ‘ब’ असा वाढलेला दर्शविला आहे. याउलट, समजा एखाद्या पुरवठादाराचा उत्पादनाचा खर्च कमी झाला आणि त्याने पुरवठा वाढविला, तर तो बदललेल्या म्हणजेच वरच्या दिशेला सरकलेल्या पुरवठा वक्राने दाखविता येतो.
पुरवठ्याचा हा नियम जसा वस्तूंना लागू होतो, तसाच तो उत्पादन घटकांनाही लागू होतो. जमीन, श्रम, भांडवल आणि उद्योजक यांना मिळणारा मोबदला जसा वाढत जातो, तसा त्यांचा पुरवठाही वाढत जातो.

अपवाद : सर्वसाधारणपणे वस्तूच्या किमतीनुसार तिचा पुरवठा कमी-जास्त होत असला, तरी पुरवठ्याच्या या नियमाला काही अपवादही आहेत. अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत वाढत असूनही विक्रेता त्या वस्तूचा पुरवठा वाढवित नाही किंवा घटत्या किमतीलाही विक्रेता वस्तूचा पुरवठा वाढवू शकतो.
- वस्तूचा पुरवठा : भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत वाढणार आहे असा विक्रेत्याचा अंदाज असेल, तर आज त्या वस्तूची किंमत वाढत असूनही तो विक्रेता त्या वस्तूचा पुरवठा वाढविणार नाही; मात्र भविष्यात पुरवठा वाढविण्यासाठी त्या वस्तूचा साठा करून ठेवेल. याउलट, भविष्यात त्या वस्तूची किंमत कमी होणार आहे असा विक्रेत्याचा तर्क असेल, तर आज त्या वस्तूची किंमत घटती असूनही तो विक्रेता त्या वस्तूचा त्याच्याकडील साठा विकून टाकण्याचा आणि भविष्यात होणारा तोटा टाळण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच, विक्रेत्याच्या भविष्यातील किमतीविषयीच्या अपेक्षांमुळे त्याचे वर्तन पुरवठ्याच्या नियमानुसार झालेले दिसून येत नाही.
- श्रमाचा पुरवठा : पुरवठ्याच्या नियमाला असलेला दुसरा अपवाद म्हणजे श्रमाचा पुरवठा होय. श्रमाला मिळणारा मोबदला (वेतन किंवा मजुरी) वाढत जाईल, तसा श्रमिकाने श्रमाचा

आकृती क्र. ४ पुरवठा वाढवावा (अधिक श्रम किंवा श्रमाचे तास वाढवावेत), असे पुरवठ्याचा नियम सांगतो. हे काही प्रमाणात घडतेही; परंतु श्रम हा मानवी घटक असल्याने आरामाची गरज व इच्छा, वय, कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा अनेक कारणांनी श्रमिकाला ते शक्य होत नाही. त्यामुळे एका ठराविक मर्यादेपलीकडे वेतन किंवा मजुरी कितीही वाढली, तरी श्रमाचा पुरवठा वाढविला जाऊ शकत नाही. या अर्थाने तो पुरवठ्याच्या नियमाला अपवाद ठरतो.
- बचत निधीचा पुरवठा : बचत निधीची किमतीवर मिळणारे व्याज जसे वाढत जाईल, तसा अधिकाधिक बचत निधी उपलब्ध केला जाईल, असे पुरवठ्याच्या नियमानुसार मानले जाऊ शकते; परंतु माणूस स्वत:चे संपूर्ण उत्पन्न उपभोग सोडून केवळ बचतीकडे वळवू शकत नाही. एका ठराविक मर्यादेपलीकडे बचतीवरील व्याजदर कितीही वाढला, तरी अधिक बचत निधीचा पुरवठा वाढविला जाऊ शकत नाही. किंबहुना, बचतीचा पुरवठा वक्र आकृती क्र. ४ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मागे झुकणारा असल्याचे मानले जाते.
संदर्भ : Mankiw, Gregory, Principles of Microeconomics, Cengage Learning, 7th Edition, South – Western Pub, 2014.
समीक्षक : संतोष दास्ताने
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
