डायग्नोस्टिक ॲण्ड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स (डीएसएम) : (Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders) मानसिक विकारांची नैदानिक व सांख्यिकी नियमपुस्तिका. मानसिक आरोग्य व्यावसायिकांमध्ये मानसिक विकार यांचे निदान आणि वर्गीकरण ह्यांसंबंधी एक समान पद्धत उपयोगात असावी हे उद्दिष्ट ठेवून अमेरिकन सायकिॲट्रिक असोसिएशन (एपीए) या संस्थेने ‘डीएसएम’ ह्या पुस्तिकेची निर्मिती केली. १९५२ मध्ये डीएसएमची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. तीत मानसिक विकारांच्या निदानात्मक वर्गवारीचा शब्दकोश व त्या अनुषंगाने वर्णन केले आहे. पहिल्या डीएसएमवर स्विस मानसोपचारतज्ज्ञ ॲडॉल्फ मेयर याच्या मनोजैविक दृष्टिकोनाचा प्रभाव आहे.

डीएसएमची दुसरी आवृत्ती १९६८ साली वापरात आली. ती कोणत्याही सैद्धांतिक दृष्टिकोनाऐवजी, इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डीसिझेस (आयसीडी) च्या आठव्या आवृत्तीवर आधारित आहे. डीएसएमच्या पहिल्या व दुसऱ्या आवृत्तीमध्ये मानसिक विकारांच्या निदानाचे निकष सुस्पष्टपणे दिलेले आढळत नाहीत.

डीएसएमची तिसरी आवृत्ती १९८० मध्ये प्रकाशित झाली. मानसिक विकारांसंबंधीच्या अद्ययावत ज्ञानाचा समावेश करता येईल, असे वर्गीकरण व शब्दकोश तयार करणे आणि आयसीडीच्या ९ व्या आवृत्तीशी सुसंगतता राखणे ही ह्या आवृत्तीमागील उद्दिष्टे होती. डीएसएमच्या ह्या आवृत्तीमध्ये निदानांची नोंद करण्यासाठी बहु-अक्षीय पद्धतीचा (मल्टी ॲक्सिअल सिस्टिम) समावेश केला आहे. अक्ष I मध्ये इतर मानसिक विकारांचा, अक्ष II मध्ये व्यक्तिमत्त्वविकार व विशिष्ट विकासात्मक विकारांचा (स्पेसिफिक डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स), अक्ष III मध्ये वैद्यकीय आजारांमुळे होणारे मानसिक विकार (उदा. अपघातामुळे झालेला स्मृतिलोप) किंवा मानसिक विकारांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे वैद्यकीय आजार, अक्ष IV मध्ये मनोसामाजिक तणावजनक परिस्थिती तर अक्ष V मध्ये रुग्णाच्या एकंदरीत कार्यक्षमतेचे मूल्यमापन यांचा समावेश आहे. १९८७ साली डीएसएमची तिसरी सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली.

१९९४ मध्ये प्रकाशित झालेल्या डीएसएमच्या चौथ्या आवृत्तीत काही मानसिक विकारांचे उपवर्ग वाढविण्यात आले तसेच काही विकारांच्या वर्गवारीमध्ये बदल करण्यात आले (उदा. डीएसएमच्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये ज्या विकारांचा समावेश ‘विशिष्ट विकासात्मक विकार’ यांमध्ये केला होता, त्यांचे वर्गीकरण डीएसएमच्या चौथ्या आवृत्तीमध्ये ‘अध्ययन अक्षमता’ असे करण्यात आले आहे).

डीएसएमच्या चौथ्या आणि पाचव्या आवृत्तींमधील दुवा म्हणून डीएसएमची चौथी मसुदा सुधारित आवृत्ती (डीएसएम ४, टेक्स्ट रिव्हिजन) २००० साली प्रकाशित झाली. चौथ्या आवृत्तीच्या मसुद्यातील चुका सुधारणे, माहिती अद्ययावत आहे की नाही हे तपासणे आणि डीएसएमची शैक्षणिक उपयुक्तता वाढवणे हे त्यामागील हेतू होते. ह्या आवृत्तीमध्येही बहु-अक्षीय पद्धतीचा वापर केला होता.

डीएसएमची सद्य वापरातली आवृत्ती – पाचवी आवृत्ती – २०१३ साली प्रकाशित झाली. तीमध्ये मानसिक विकारांचे वर्गीकरण करताना त्यांच्या लक्षणांपेक्षा, चेतावैज्ञानिक (न्यूरोसायंटिफिक) आधाराला महत्त्व दिले गेले. मानसिक विकारांचा क्रम आणि त्यांचे गट ह्या आवृत्तीच्या आधारे केले आहेत. उदा. बौद्धिक व शारीरिक विकासाचा विकार (इन्टलेक्च्युल ॲण्ड फिजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स), आत्ममग्नता या गटात मोडणारे विकार (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स) आणि अटेन्शन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर ह्यांचे एकत्रित वर्गीकरण चेतासंस्थेच्या विकासात्मक विकार (न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स) ह्या गटात केले आहे. त्याचप्रमाणे डीएसएमच्या पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये निदानाची नोंद करताना वापरात असलेली बहु-अक्षीय पद्धत पाचव्या आवृत्तीमधून वजा करण्यात आली आहे.

संदर्भ :

  • DSM I, 1952.  American Psychiatric Association.
  • DSM III, 1980. American Psychiatric Association.
  • DSM IV, 1994. American Psychiatric Association.
  • DSM IV –TR, 2000. American Psychiatric Association.
  • DSM 5, 2013. American Psychiatric Association.
  • Regier, D. A., Kuhl, E. A., & Kupfer, D. J. (2013). The DSM-5: Classification and Criteria Changes. World Psychiatry, 12 (2), 92–98.

http://doi.org/10.1002/wps.20050. Retrieved from https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3683251/

Changing the DSM multiaxial system; Removal of Axes; pg 1-3, May 2013. http://academicdepartments.musc.edu

समीक्षक – विवेक बेल्हेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा