व्हुंट, व्हिल्हेल्म : (१६ ऑगस्ट १८३२–३१ ऑगस्ट १९२०). जर्मन मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ. शरीरक्रियावैज्ञानिक. प्रायोगिक मानसशास्त्राचे अध्वर्यू. मॅनहाइमजवळील (Mannheim) नेकाराऊ (Neckarau) येथे जन्म. हायडल्‌बर्ग विद्यापीठात वैद्यकशास्त्राची पदवी मिळविली (१८५६). त्याच विद्यापीठात प्रथम कनिष्ठ पदावर, नंतर प्राध्यापक म्हणून अध्यापन केले (१८५७ –७३). शरीरविज्ञान हा त्यांचा अध्यापनविषय होता. नंतर अल्पकाळ ते झुरिक विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते (१८७४). शेवटी ते लाइपसिक विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते (१८७५ – १९२०).

वैद्यकशास्त्राशी निगडित असलेल्या शरीरक्रियाविज्ञान या विषयाच्या अनुषंगाने ते मानसशास्त्राच्या अध्ययनाकडे वळले. १८७३-७४ साली ‘प्रिन्सिपल्स ऑफ फिजिऑलॉजिकल सायकॉलॉजी’ (इं. शी.) हा त्यांचा सुप्रसिद्ध द्विखंडात्मक ग्रंथ प्रसिद्ध झाला. या ग्रंथात शास्त्रोचित, निरीक्षणनिष्ठ व प्रयोगतत्पर अध्ययनपद्धती ही मानसशास्त्राच्या अध्ययनातही कशी वापरता येते, हे त्यांनी विशद केले. तसेच त्यांनी लाइपसिक येथे मानसशास्त्राची आद्य प्रयोगशाळा स्थापन केली (१८७९). ती इतकी सुविख्यात झाली की, तेथे अध्ययन करण्यासाठी देशोदेशींचे प्रज्ञावंत विद्यार्थी येऊ लागले. व्हुंट यांच्या कर्तृत्वामुळे मानसशास्त्रास एक स्वतंत्र शास्त्र म्हणून दर्जा प्राप्त झाला.

व्हुंट यांच्या मते, बोधावस्था अथवा जाणीव (कॉन्शसनेस) हा मानसशास्त्राचा अभ्यासविषय आहे. बोधावस्थेचे तीन घटक आहेत : (१) रंग, गंध आदी इंद्रियवेदने (२) कामक्रोधादी भावनाविकार (३) अनुभवदत्त, स्मृतिदत्त तसेच कल्पित ‘प्रतिमा’. इंद्रियवेदनांमुळे आपणास बाह्य जगाचे ज्ञान होते. परस्परविरोधी भावनांच्या जोड्या असतात. उदा. सुखकारक व दुःखजनक भावना; प्रक्षुब्ध व शांत; तणावपूर्ण व तणावशून्य इत्यादी. प्रतिमा या पूर्वी अनुभवलेल्या वस्तूंच्या यथातथ्य अथवा पुनर्ग्रथित प्रतिकृती असतात.

बोधावस्थेच्या मानसशास्त्रीय अध्ययनास अंतर्निरीक्षण (इंट्रॉस्पेक्शन) उपयुक्त ठरते. हे अंतरर्निरीक्षण मुक्त मनाने, निर्विकार वृत्तीने, निःपक्षपाती बुद्धीने करावयाचे असते. शास्त्रशुद्ध अंतर्निरीक्षणाच्या तंत्रासाठी प्रशिक्षण आवश्यक असते, असे व्हुंटचे मत होते.

आपणास आपल्या स्वतःच्या बोधावस्थेचे निरीक्षण करता येते. तसेच अन्य व्यक्तींच्या बोधावस्थेचे आपण निरीक्षण करू शकत नाही. मात्र अन्य तज्ज्ञ व्यक्तींचे त्यांच्या बोधावस्थेविषयीचे निवेदन विश्वसनीय असू शकते. अशा अन्यजन–कथित निरीक्षणाशी मानसशास्त्रीय प्रयोगपद्धती निगडित असते. मानसशास्त्रीय प्रयोगात अभ्यासनीय घटना अन्य व्यक्तीच्या निरीक्षणास सुलभ होईल, अशा रीतीने घडवून आणली जाते.

आपले बोधावस्थेचे अनुभव हे अतिशय गुंतागुंतीचे व संकीर्ण स्वरूपाचे असतात. त्यांचे यथातथ्य आकलन करण्यासाठी विश्लेषण पद्धतीचा अवलंब करणे अपरिहार्य असते, अशी व्हुंट यांची शिकवण होती.

व्हुंट यांच्या मते, मानवी मनाचा थांग लागण्यासाठी त्या-त्या मानवी समुदायातील प्रचलित भाषा, लोकवङ्‌मय, पुराणकथा, मिथके, सामाजिक रीति-रिवाज, धार्मिक समजुती, सण-उत्सव तसेच चित्रकला, नाट्य संगीतादी  कलाप्रकार यांचेही अध्यन करणे इष्ट असते. अर्थात, या अध्ययनात आत्मनिरीक्षण वा प्रयोगपद्धतीचा अवलंब करता येत नाही. तथापि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आणि मर्मग्राही निरीक्षण यांच्या बळांवर सामाजिक व सांस्कृतिक वस्तुस्थितीचे रहस्य कळू शकते. एवम्‌ व्हुंट यांनी आपल्या अभिजात उपक्रमांनी आधुनिक मानसशास्त्राची मुहूर्तमेढ रोवली आणि या शास्त्राचे एकीकडे शरीरक्रियाविज्ञानाशी, तर दुसरीकडे समाजशास्त्राशी निरपवाद नाते जोडले.

व्हुंट यांची तत्त्वज्ञानीय भूमिका उत्तम संग्राहक (इक्लेक्टिक) होती. तथापि, त्यांच्या विचारांवर लायप्निट्‌स, शोपेनहौअर, हेगेल यांच्या आदर्शवादाचा विशेष प्रभाव होता. परिणामी, त्यांच्या बुद्धीचा कल जडवादाकडे नसून चैतन्यवादाकडे होता; सुखवादाकडे नसून कर्तव्यबुद्धीकडे होता; सापेक्षतावादाकडे नसून केवलवादाकडे होता; यांत्रिक कार्यकारणभावाकडे नसून सर्जनशीलतेकडे होता.

त्यांच्या मते, तत्त्वज्ञानात विविध विज्ञानशाखांनी संशोधिलेल्या सिद्धान्तांची सुसंगत संरचना करावयाची असते. सारे ज्ञान इंद्रियगम्य अनुभवांद्वारे प्राप्त होते. म्हणजेच, बोधावस्था ही ज्ञानार्जनाशी अविभाज्यरीत्या निगडित असते. परंतु म्हणून आपण व्यक्तिनिष्ठ आदर्शवादाच्या आहारी जाण्याचे कारण नाही. बाह्य जगाचे स्वतंत्र अस्तित्व नाकारण्याचे कारण नाही. बाह्य वस्तूंच्या जाणिवेविना आपणास आपल्या दिक्‌, काल, कार्य, कारण आदी संकल्पना रचता आल्या नसत्या. बाह्यवस्तुदत्त उद्दीपने आणि आपल्या बुद्धिप्रणीत संकल्पना या दोहोंच्या आधारे आपणास निसर्गसृष्टीचे ज्ञान होते.

व्हुंट यांचे आदर्शवादी तत्त्वज्ञान आणि त्यांचे प्रायोगिक मानसशास्त्र या दोहोंत उघडच तात्त्विक विसंवाद होता. आदर्शवादासोबत तद्विसंगत अशा प्रत्यक्षवादाचाही त्यांनी पुरस्कार केलेला आढळून येतो. तसेच मानसशास्त्राच्या अध्ययनात अंतर्निरीक्षणपद्धतीस अवास्तव महत्त्व दिले. नंतरच्या काळात या पद्धतीची वैगुण्ये आणि मर्यादा उघडकीस आल्या.

वर निर्देश केलेल्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ फिजिऑलॉजिकल सायकॉलॉजी’ (इं. शी.) ह्या ग्रंथाखेरीज व्हुंट ह्यांचे अन्य उल्लेखनीय ग्रंथ असे : Volkerpsychologie (१० खंड, १९००–१९२०, इं. शी. फोक सायकॉलॉजी), ‘सिस्टिम ऑफ सायकॉलॉजी’ (१९०७, इं. शी.) इत्यादी.

लाइपसिकजवळील ग्रोसबॉदेन येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Holding ; Trans. Meyer, B. E. History of Modern Philosophy, 2 Vols., New York, 1955.
  • Wundt, Wilhelm; Trans. Crighton, J.E; Titchener, E. B. Lectures on Human and Animal Psychology, New York, 1911.
  • Wundt, Wilhelm; Trans. Titchener, E. B. Physiological Psychology, New York, 1908.

#प्रायोगिक मानसशास्त्र #मानसशास्त्रीय पद्धत

This Post Has One Comment

  1. राजेंद्रकुमार इब्रामपुरे.

    खूप छ्यान लिखाण असून,रीतसर मांडणी त्यामुळे लेख वाचताना गुंतून राहते.
    धन्यवाद !

प्रतिक्रिया व्यक्त करा