मानसशास्त्रीय मानवशास्त्रात म्हणजे मानवशास्त्रीय संकल्पना व पद्धती यांचा वापर करून केला जाणारा मानसशास्त्रीय विषयाचा अभ्यास होय. यात मानवशास्त्र आणि मानसशास्त्र यांचा सुरेख संगम दिसून येतो. या शाखेंतर्गत मानवप्राण्यांच्या वर्तनाचा तौलनिक अभ्यास करता येतो. मानसशास्त्रीय मानवशास्त्र हे विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात वाढलेली व्यक्ती, विविध समाज, तिच्यावरील संस्कृतीचा प्रभाव आणि त्या समाजात नांदणाऱ्या विभिन्न संस्कृती यांच्या जडणघडणीमागील मानसशास्त्रीय बैठक या सर्वांचा अभ्यास करते.

मानसशास्त्रीय मानवशास्त्र या विषयांतर्गत संस्कृतीचा व्यक्तिमत्वावरील प्रभाव या विषयाच्या अनुषंगाने १९६० च्या दशकात महत्त्वाचे बदल घडले. मानसशास्त्र हे व्यक्तींच्या मानसिकतेचा अभ्यास करते, तर मानवशास्त्र हे माणसाच्या संस्कृतीचा अभ्यास करते. कोणत्याही संस्कृतीमध्ये त्या समाजाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब असते. त्यामुळे मानसिकता आणि संस्कृती वेगळी होऊ शकत नाही. मानसशास्त्रीय मानवशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण असतो.

मानवशास्त्राचा भर हा अनुभवांवर आधारित, क्षेत्रीय पद्धतीने केलेल्या विविध संस्कृतींच्या अचूक निरीक्षणांवर असतो. प्रसिद्ध अमेरिकन मानवशास्त्रज्ञ मेलव्हिल जीन हेरस्कोव्हिट्स यांच्या मते, जगभरात पसरलेल्या मानवी संस्कृतींना मानसशास्त्रीय घडामोडींची किनार लाभलेली असते. मानसशास्त्रीय मानवशास्त्र व्यक्तीच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक-ऐतिहासिक घडामोडींच्या आंतर-संबंधांचा अभ्यास करते. थोडक्यात, मानसशास्त्रीय मानवशास्त्राचे वर्णन हे विविध संस्कृतीतील मानवी वर्तनाकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन आहे.

संदर्भ :

  • Honigmann, John, Handbook of Social and Cultural Anthropology, Chicago, 1973.
  • McGraw Hill, 2001.

समीक्षक : शौनक कुलकर्णी