मानसशास्त्रीय चाचणीचे मानांकन करण्याकरिता वापरली जाणारी एक पद्धत. मानवी क्षमता आणि गुणवैशिष्ट्ये यांचे मापन करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करतात. या चाचण्यांमध्ये काही विधाने (Items/Propositions/Statements) असतात. प्रत्येक चाचणी विशिष्ट मानसशास्त्रीय गुणाचे मापन करण्यासाठी वापरली जाते. हे मापन करताना, चाचणी ही केवळ त्याच गुणाचे १००% मापन करतेच असे नाही. जो गुण मोजायचा आहे त्याचे मानसशास्त्रीय चाचणी किती प्रमाणामध्ये मापन करते हे यथार्थता दर्शविते. चाचणीची गुण मापन करण्याची क्षमता जितकी अधिक तितकी तिची यथार्थता अधिक असते.
चांगल्या दर्जाच्या मानसशास्त्रीय चाचणीच्या वैशिष्ट्यांमध्ये यथार्थतेची गणना होते. अमेरिकन मानसशास्त्रवेत्ती ॲनास्तासी (Anastasi) यांच्या मते, यथार्थतेचा संबंध दोन गोष्टींशी येतो : चाचणी कशाचे मापन करते; आणि ते किती चांगल्या प्रकारे करते. ज्या वर्तन प्रकाराचे मापन करण्यासाठी चाचणी विकसित करण्यात आली आहे, त्याचे मापन ती चांगल्या प्रकारे करत असेल तर ती चाचणी यथार्थ अथवा वैध (valid) आहे. यथार्थ चाचणीच्या आधारे केलेले अनुमान हे समर्पक, अर्थपूर्ण आणि उपयुक्त असते.
चाचणीचा एकच एक यथार्थता गुणांक नसतो; याचे एक कारण असे की, हा गुणांक ठरविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग केला जातो; आणि त्यानुसार गुणांक बदलतो. शिवाय, एकाच चाचणीचा अनेक वर्तनप्रकारांशी सहसंबध पडताळून पाहावा लागतो आणि निवडलेल्या संबंधित वर्तनप्रकारानुसारही यथार्थता गुणांक बदलतो. जसे की, बुद्धिमत्ता चाचणीची यथार्थता निश्चित करताना चाचणी सोडविणाऱ्या व्यक्तीचे परीक्षेतील गुण, तिची तर्कक्षमता, समस्या-परिहार क्षमता इत्यादींशी चाचणी गुणांकाचा सहसंबंध विचारात घेतला जातो. सहसंबंध तपासण्यासाठी संख्याशास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो; सहसंबंध जितका अधिक तितकी चाचणीची यथार्थता अधिक. कोणतीही चाचणी ‘पूर्णपणे यथार्थ’ किंवा ‘अजिबात यथार्थ नाही’ असे कधीच नसते. यथार्थता गुणांक हा ‘दुर्बल’ पासून, ‘स्वीकारार्ह’ पासून ते ‘प्रबळ’ पर्यंत असू शकतो.
‘दी स्टँडर्ड्स फॉर एज्युकेशनल अँड सायकॉलॉजिकल टेस्टिंग’(१९७४)) मध्ये यथार्थता निश्चित करण्याच्या पद्धतींचे तीन प्रवर्गांमध्ये वर्गीकरण केले आहे: १) आशय यथार्थता (content validity), २) निकषसंबंधी यथार्थता (criterion-related validity) आणि ३) सैद्धांतिक यथार्थता (construct validity).
आशय यथार्थता – मानसशास्त्रीय चाचणी विशिष्ट वर्तनप्रकाराचे किंवा वर्तननमुन्याचे मापन करते. जसे की, संपादन चाचणीचा (achievement test) हेतू असतो की एखाद्या कौशल्यात किंवा अभ्यासक्रमात व्यक्तीने किती प्राविण्य संपादन केले आहे याचे मापन करणे. अशा चाचणीच्या बाबतीत आशय (content) खूप महत्त्वाचा ठरतो. अशी चाचणी तयार करत असताना अभ्यासक्रमाच्या सर्व उद्दिष्टांचे पुरेसे प्रतिनिधित्व चाचणीच्या प्रश्नांमध्ये आले आहे ना हे तपासणे गरजेचे असते. तसेच, गणितातील प्राविण्य तपासण्यासाठी उद्दिष्टांमध्ये समाविष्ट गणिताच्या सर्व प्रकारांचे चाचणीच्या प्रश्नांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व आले असेल, तर ती चाचणी यथार्थ ठरण्याची शक्यता वाढते.
वरकरणी आशय यथार्थता सोपी वाटत असली, तरी ती चाचणीत आणताना काही अडचणी संभवतात. एक अडचण अशी की, ज्या वर्तनप्रकाराचे मापन करावयाचे आहे त्याची व्याप्ती ज्ञात असणे आवश्यक आहे. त्याच्या सर्व पैलूंचे चाचणी-प्रश्नांमध्ये साधारण समप्रमाणात प्रतिनिधित्व होणे आवश्यक आहे. गणितातील प्राविण्य तपासण्यासाठी तयार केलेल्या चाचणीत गणिताच्या सर्व प्रकारांचा (उदा. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार) अंतर्भाव असावयास हवा. काही प्रकारांचे अति-प्रतिनिधित्व आणि काहींचे निम्न अथवा शून्य प्रतिनिधित्व अशा प्रकारच्या असमतोल आशयामुळे चाचणीची यथार्थता धोक्यात येते. दुसरी अडचण अशी की, अति सामान्यीकरण करण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे चाचणीच्या अर्थविवरणाबाबत दिशाभूल होऊ शकते. उदा. ‘शब्दलेखन चाचणी’ (spelling test). बिनचूक शब्दलेखन ओळखण्याच्या क्षमतेचे मापन करते; अशा चाचणीच्या गुणांकाच्या आधारे व्यक्तीच्या अचूक शब्दलेखन करण्याच्या क्षमतेविषयी काढलेला निष्कर्ष अवाजवी ठरेल. तिसरी अडचण अशी की, चाचणीच्या हेतूशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टींना अजाणतेपणाने अवाजवी महत्त्व दिले जाते. अशा अवांतर गोष्टींचा परिणाम चाचणी गुणांकावर होऊ शकतो. उदा. गणिताच्या चाचणीत कोणत्या भाषेत सूचना दिल्या जातात हे महत्वाचे नाही. व्यक्तीला नेमके काय करायचे आहे हे समजणे अधिक महत्वाचे आहे; त्यामुळे व्यक्तीला समजेल अशाच भाषेत सूचना देणे आवश्यक आहे. अन्यथा न समजणाऱ्या भाषेत (उदाहरणार्थ, शब्दप्रयोग त्या वयोगटाला समजणार नाही असा वापरणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अतिशय शहरी भाषेमध्ये सूचना देणे इत्यादी.) दिलेल्या सूचनांमुळे व्यक्तीच्या चाचणी-निर्वर्तनावर विपरीत परिणाम होऊन दिशाभूल करणारी फलिते प्राप्त होतात.
बरेचदा आशय यथार्थता आणि दर्शनी यथार्थता (face validity) यांची सरमिसळ केली जाते. आशय यथार्थतेचा संबंध चाचणी कशाचे, किती चांगल्या प्रकारे मापन करते याच्याशी आहे; तर दर्शनी यथार्थता म्हणजे चाचणी सोडविणाऱ्या व्यक्तीला प्रतीत झालेला चाचणीचा आशय. येथे तांत्रिक दृष्ट्या चाचणी यथार्थ असण्याबरोबरच व्यक्तीला चाचणी ‘यथार्थ वाटणे’ हेही महत्त्वाचे आहे. चाचणी सोडविणाऱ्या व्यक्तीचे सहकार्य मिळविण्यासाठी दर्शनी यथार्थता महत्त्वाची ठरते; चाचणीतील प्रश्न व्यक्तीला जर असंबंधित किंवा बालिश वाटले तर चाचणी सोडविण्यावर त्याचा परिणाम संभवतो. बरेचदा चाचणीतील प्रश्नांची शब्दरचना बदलून दर्शनी यथार्थता सुधारता येते.
निकषसंबंधी यथार्थता – विशिष्ट परिस्थितीत वर्तन कसे घडेल याचे चाचणी प्रभावीपणे पूर्वकथन करीत असेल तर त्या चाचणीला निकषसबंधी यथार्थता आहे असे समजावे. ही यथार्थता निश्चित करण्यासाठी चाचणीगुणांकाचा बाह्य निकषाशी असलेला सहसंबंध तपासला जातो (सहसंबंध संख्याशास्त्रीय तंत्र आहे). हा निकष समवर्ती (concurrent) असेल किंवा चाचणी घेतल्यानंतर काही कालावधीनंतरचा असेल. नेतृत्व चाचणीसाठी नेत्याच्या अनुयायांनी नेत्याचे केलेले पदनिश्चयन (rating) हा समवर्ती निकष असू शकेल; तर यांत्रिकी अभिक्षमता चाचणीसाठी नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्याची प्रत्यक्ष यंत्रावर काम करण्याची क्षमता हा निकष असू शकेल. चाचणी गुणांक आणि निकषावरील वर्तन यांच्यात निकट सहसंबंध आढळल्यास चाचणी यथार्थ आहे असा निष्कर्ष निघतो. निकष निवडताना खबरदारी घेणे आवश्यक असते. वरील उदाहरणात अनुयायांना आधीच त्यांच्या नेत्याचा चाचणीवरील गुणांक समजल्यास त्यांनी केलेल्या पदनिश्चयनावर त्याचा परिणाम संभवतो. यालाच निकष दूषितीकरण (criterion contamination) असे म्हणतात.
सैद्धांतिक यथार्थता – चाचणी ज्या सैद्धांतिक संकल्पनेचे मापन करीत असल्याचा दावा करते ते मापन ती किती चांगल्या प्रकारे करते यावरून तिची सैद्धांतिक यथार्थता ठरते. या प्रकारची यथार्थता प्रस्थापित करण्यासाठी अनेक मार्गांनी माहिती संकलित करावी लागते. त्यासाठी पुढील पद्धती वापरता येतात :
वैकासिक बदल : काही वर्तनप्रकारांमध्ये वाढत्या वयाबरोबर सुधारित बदल होतात असे शास्त्रीय अभ्यासांतून निदर्शनास आले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बुद्धिमत्ता. वाढत्या वयाबरोबर बुद्धिमत्ता चाचणी गुणांक वाढणे अपेक्षित आहे. खरोखरच तसे आढळल्यास संबंधित चाचणी सैद्धांतिक दृष्ट्या यथार्थ आहे असे मानले जाते.
इतर चाचण्यांशी संबंध : नवीन चाचणीचा यापूर्वी प्रमाणित केलेल्या चाचणीशी संख्याशास्त्रीय दृष्ट्या लक्षणीय सहसंबंध आढळल्यास नवीन चाचणीला सैद्धांतिक यथार्थता आहे असे मानले जाते. अर्थात हा सहसंबंध माफक प्रमाणात असणे आवश्यक आहे. तो जर उच्च असेल तर नवी चाचणी जुन्या चाचणीचीच पुनरावृत्ती असण्याची संभाव्यता निर्माण होते.
घटक विश्लेषण : चाचणीत अंतर्भूत असलेले मानसशास्त्रीय गुणविशेष हेरण्याची ही एक पद्धत असून वर्तनाचे वर्णन करणाऱ्या परिवर्त्यांची (variable) वा प्रवर्गांची चाचणीतील मूळ संख्या कमी संख्येवर आणून वर्तनाचे वर्णन सरळ व सोपे करण्याची ही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. तसेच ही एक गणितीय- संख्याशात्रीय पद्धत आहे. घटक विश्लेषणात प्रत्येक परिवर्त्याचे प्रत्येक दुसऱ्या परिवर्त्याशी असलेल्या सहसंबंधाचे मापन केले जाते. ही परिवर्त्ये बहुतेक वेळा मानसशास्त्रीय चाचणीची विधाने असतात. जवळपास समान सहसंबंध असलेल्या परिवर्त्यांचे संच केले जातात. हे संच म्हणजेच चाचणीत अंतर्भूत असलेले घटक होत. प्रत्येक संचामध्ये मापन होणारा एकच मानसिक गुण असणे आवश्यक असते.
संलक्षी (convergent) आणि भेदक (discriminant) यथार्थता (केंद्राभिमुख आणि भेदक यथार्थता): एखाद्या सिद्धांतकल्पनेचे मापन करण्यासाठी विकसित केलेली नवीन चाचणी, त्याच सिद्धांतकल्पनेचे मापन करणाऱ्या दुसऱ्या चाचणीशी किती निकटचा सहसंबंध दर्शविते यावरून नवीन चाचणीची संलक्षी यथार्थता ठरते. उदा. बेक यांची अवसाद चाचणी (depression test) आणि हॅमिल्टन यांची पूर्वप्रमाणित अवसाद चाचणी यांच्यावरील गुणांकांमधील उच्च सहसंबंध बेक अवसाद चाचणीची संलक्षी यथार्थता दर्शवितो. सिद्धांताच्या चौकटीत राहून चाचणीची यथार्थता तपासताना समान सिद्धांतकल्पनेचे मापन करणाऱ्या चाचण्यांमध्ये जसा उच्च सहसंबंध असणे सैद्धांतिक दृष्ट्या अपेक्षित असते तसेच भिन्न सिद्धांतकल्पनेचे मापन करणाऱ्या चाचण्यांमध्ये निम्न किंवा नगण्य सहसंबंध असणे तर्कसुसंगत असते. उदा. बेक यांची अवसाद चाचणी आणि हॅमिल्टन यांची चिंता किंवा दुश्चिता चाचणी (anxiety test) यांच्यातील निम्न सहसंबंध भेदक यथार्थता प्रस्थापित करतो; कारण अवसाद आणि दुश्चिता या संकल्पना सैद्धांतिक दृष्ट्या भिन्न आहेत.
मानसमितीमध्ये (Psychometrics) मानसशास्त्रीय चाचण्यांचा संख्याशास्त्रीय प्रारूपांच्या माध्यमातून अभ्यास केला जातो. मानसशास्त्रीय चाचणीची विश्वसनीयता आणि यथार्थता हे चाचणीचे दोन प्रमुख गुण मानले जातात. त्यातील यथार्थता हा अधिक महत्वपूर्ण आहे कारण त्याद्वारे चाचणीने ज्या गुणाचे मापन होणे अपेक्षित आहे ते होते किंवा नाही हे समजते.
समीक्षक – विवेक बेल्हेकर