ही एक मानसोपचारपद्धती आहे. हिचे उगमस्थान बोधात्मक उपचारपद्धतीत आहे. मानसोपचारतज्ज्ञ स्टीव्हन सी. हेझ (Steven C. hayes) यांनी १९८२ साली ही उपचारपद्धती प्रचारात आणली. ही उपचारपद्धती मानवी भाषा आणि बोधन ह्याचा अंतर्भाव असणाऱ्या ‘नात्यांच्या चौकटीची उपपत्ती’ (Relational Frame Theory) ह्यावर आधारित आहे. ह्यामध्ये मानसिक लवचिकता / वलनशीलता (Psychological Flexibility) वाढवण्यासाठी स्वीकार आणि मनोसावधानता (mindfulness)  ह्या तंत्राचा उपयोग केला जातो. मानसिक लवचिकता असणे म्हणजे वर्तमानक्षणी पूर्ण जागरूकतेने हजर असणे, आपल्या अनुभवांच्या बाबतीत खुले/ सन्मुख असणे आणि आपल्या जीवनमूल्यांप्रमाणे कृती करण्याची क्षमता असणे होय.

ही उपचारपद्धती वेदनादायी विचार, भावना सक्षमपणे हाताळण्याचे मानसिक कौशल्य शिकवते, आपल्याला जीवनात महत्त्वाचे नक्की काय आहे, हे समजून घेण्यास मदत करते. म्हणजेच आपली मूल्ये स्पष्ट करते. त्यामुळे आयुष्य समृद्ध करण्याच्या दृष्टीने ध्येय निश्चितीसाठी आणि त्यानुसार कृती करण्यासाठी प्रेरणा मिळते.

पारंपरिक वर्तनवादी आणि बोधनिक उपचारपद्धती ह्या विक्षुब्ध वर्तन आणि त्यामागील धारणा सुधारण्यावर भर देतात. तर स्वीकार व बांधिलकी उपचारपद्धती मनोसावधानता (mindfulness) बाळगण्यावर तसेच परिस्थितीचा स्वीकार करण्यावर भर देते. अवसादावस्था(Depression), चिंताविकृति (Anxiety), व्यसनाधीनता आणि नात्यांमधील संघर्ष ह्या समस्यांवरील उपचाराकरिता हे तंत्र वापरले जाते.

बौद्ध धर्माच्या शिकवणीनुसार, ‘जीवन दु:खाने भरलेले आहे आणि दु:ख किंवा वेदनेचा अनुभव टाळणे हे विकृतीचे सर्वांत मोठे कारण आहे’. त्याऐवजी जे आवडत नाही ते तटस्थपणे आणि चांगले किंवा वाईट असे निकष न लावता (non-judgemental) स्वीकारणे शिकले पाहिजे, असे ह्या उपचारपद्धतीत लाभार्थीला (client) सांगितले जाते. मनुष्य जितका कमी दोष देणारा असेल, तितकाच कमी विक्षुब्ध असतो.

स्वीकार व बांधिलकी उपचारपद्धतीच्या समुपदेशन सत्रांत लाभार्थीला प्रथम स्वीकार आणि मनोसावधानता ही दोन तंत्रे शिकविली जातात. स्वीकार या तंत्रांतर्गत त्याच्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या गोष्टी शोधून त्यांच्याशी एकनिष्ठ अथवा वचनबद्ध राहण्यास व त्यांप्रती बांधिलकी ठेवण्यास शिकविले जाते. मनोसावधानता या तंत्रांतर्गत लवचिकतेने व मोकळेपणाने आणि कुतूहलाने उपस्थित क्षणाकडे लक्ष केंद्रित करणे याचा समावेश होतो. मनोसावधानता ही प्राचीन आणि अनेक धर्मांमध्ये (हिंदू, ताओ, बौद्ध) मांडलेली संकल्पना आहे.

मनोसावधानतेची वैशिष्ट्ये-

१. मनोसावधानता ही विचारांची प्रकिया नसून जागरूक असण्याची प्रक्रिया आहे. ह्याचा अर्थ असा की, भूतकाळातील विचारचक्रात अडकून न पडता वर्तमानातील क्षणांवर लक्ष केंद्रित करणे.

२. जरी एखादा अनुभव कटू असला तरी त्याच्यापासून पळून न जाता खुलेपणाने आणि कुतूहलाने त्या अनुभवाकडे बघणे.

३. अवधानाची लवचिकता / वलनशीलता – आपल्या अनुभवांना जाणीवपूर्वक व्यापक करण्याची, त्यावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असणे.

मनोसावधानतेमुळे विचारांना सहजता प्राप्त होते, मनुष्य वर्तमानाचा क्षण जगायला शिकतो, स्वत:ची ओळख होण्यास मदत होते. आपल्या आंतरिक भावना, प्रतिक्रिया आणि त्यामागचे विचार कळतात.

मनोसावधानतेच्या तंत्रात शरीरक्रियांवर लक्ष केंद्रित करणे, वर्तमान क्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, श्वासावर लक्ष केंद्रित करणे इत्यादी लहानलहान कृतींच्या आधारे व्यक्तीला तिच्या ‘स्व’बद्दल सजग केले जाते. व्यक्ती आयुष्याला अर्थ देणाऱ्या गोष्टी शोधून त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा, बांधिलकी ठेवण्याचा प्रयत्न करते. लाभार्थीला त्याची ध्येये सविस्तर लिहावयास आणि त्यासंबंधित स्वत:च्या कृती योजनेशी एकनिष्ठ रहावयास सांगितले जाते.

मानसिक लवचिकता साधणे हे ह्या उपचारपद्धतीचे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याने त्यासाठी खालील प्रक्रिया सुचविल्या आहेत.

उपचारपद्धतीतील मूळ सहा प्रक्रिया –

१. वर्तमान / उपस्थित क्षणाशी संपर्क (Contact with Present Moment) –  वर्तमान क्षणाशी संपर्क असणे म्हणजे मानसिकदृष्ट्या त्या क्षणाशी एकरूप असणे, आत्ताच्या क्षणी काय चालले आहे, ह्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आणि आपल्या वर्तमानाच्या भौतिक/ मानसिक दोन्ही जगांबद्दल सजग असणे होय. मनोसावधानतेच्या स्पष्टीकरणात बघितल्याप्रमाणे, भूतकाळाच्या किंवा भविष्याच्या विचारात अडकून पडणे मनुष्याकडून खूप सहज होते व त्यामुळे वर्तमान जगाशी असलेला आंतरिक संपर्क तुटतो किंवा ही क्रिया आपसूक घडत राहते. तसे न करता वास्तवातील क्षण जगणे महत्त्वाचे आहे.

२. स्वीकार (Acceptance) – स्वीकार करणे म्हणजे वेदना देणाऱ्या भावना, संवेदना, इच्छा, घटना, विचार हे आवडत असले किंवा नसले तरी त्यांना आहे तसे स्वीकारणे होय. त्यांच्याशी संघर्ष करण्यापेक्षा, त्यांना प्रतिकार करण्यापेक्षा, त्यांच्यापासून पळून जाण्यापेक्षा किंवा त्यांनी भारावून जाण्यापेक्षा त्यांच्याविषयी पूर्वग्रह न बाळगता त्यांना स्वीकारणे हितकारक आहे.

३. विलगन (Defusion) – विलगन म्हणजे स्वत:च्या विचार, प्रतिमा आणि स्मृतींकडे तटस्थतेने बघणे. त्या विचारांमधे अडकण्यापेक्षा, एखादे वाहन जसे डोळ्यांसमोरून येते आणि जाते, तितकी सहजता विचारांच्या येण्याजाण्यात आणून तटस्थपणे त्याचे खंडन करता येणे होय.

४. स्व-एक संदर्भ किंवा निरीक्षक स्व (Self-as-Context / Observing Self) – मनाबद्दल / ‘स्व’बद्दल  बोलताना एका गोष्टीकडे बरेचदा दुर्लक्ष होते ते म्हणजे ‘स्व’ चे दोन घटक आहेत – ‘‘विचार करणारा स्व’’ (thinking self) आणि ‘‘निरीक्षक स्व’’ (observing self). विचार करणाऱ्या ‘स्व’शी आपण परिचित असतो. तो समजुती, विचार, स्मृती, निर्णय, मते, कल्पना, योजना मनात उत्पन्न करत असतो. ‘‘निरीक्षक स्व’’ची ओळख आपल्याला नीट झालेली नसते. ‘‘निरीक्षक स्व’’ म्हणजे ‘स्व’चा असा पैलू ज्याला प्रत्येक क्षणी आपण (माणूस) काय विचार करत आहोत, आपल्या मनात काय भावना आहेत आणि आपण काय करतो आहे, याचे भान असते किंवा तो ह्याबाबतीत सजग असतो. ‘‘निरीक्षक स्व’’ ला ‘‘विशुद्ध सजगता’’ (Pure awareness) असेही म्हणतात. स्वीकार व बांधिलकी उपचारपद्धतीत त्याला ‘‘स्व – एक संदर्भ/स्व-संदर्भ’’ असेही म्हणतात. उदा.- आयुष्यात अनेक बदल होतात, शरीरात, विचारात, भावनांमध्ये, भूमिकांमध्ये बदल होतात; परंतु ह्या सगळ्यांचे निरीक्षण करणारे ‘तुम्ही/स्व’ कधीही बदलत नाही. ते नेहमी सोबत असते.

५. मूल्ये (Values)- तुमचे आयुष्य तुम्हाला कसे असायला हवे  आहे? तुम्हाला आयुष्यात नेमके काय करायचे आहे आणि काय महत्त्वाचे आहे? हे कळणे म्हणजे आपली जीवनमूल्ये कळणे होय. मूल्ये म्हणजे आपल्या वर्तनाची अपेक्षित वैशिष्ट्ये होय. आपली मूल्ये स्पष्ट होणे, ही आयुष्य अर्थपूर्ण करण्याची पहिली पायरी आहे. मूल्ये ही दिशादर्शक असतात. स्वीकार व बांधिलकी उपचारपद्धतीत मूल्यांना ‘‘स्वत: निवडलेली जीवनदिशा’’ असे म्हणतात.

६. वचनबद्ध कृती (Commited Action)- आपल्या जीवनमूल्यांना अनुरूप आणि परिणामकारक कृती/ वर्तन करणे हे ‘‘वचनबद्ध कृतीत’’ अभिप्रेत आहे. निश्चित झालेल्या मार्गावरून वाटचाल केल्याशिवाय / कृती केल्याशिवाय प्रवास सुरू होत नाही. जीवनमूल्यांवर आधारित कृती ही अनेक चांगल्या-वाईट विचारांना आणि भावनांना जन्म देते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत किंवा बेचैनीतदेखील आपल्या कृतीशी वचनबद्ध राहता आले पाहिजे. त्यासाठी ह्या उपचारपद्धतीत ध्येय निश्चिती, वेळेचे नियोजन इ. जीवनकौशल्ये शिकविली जातात.

वरीलप्रकारे स्वीकार व बांधिलकी या उपचारपद्धतीतील महत्त्वाच्या संकल्पना आहेत.

संदर्भ :

  • अभ्यंकर, एस.; ओक, ए. आणि गोळविलकर, एस., मानसशास्त्र : वर्तनाचे शास्त्र, दिल्ली, २०१४.
  • Brown, K. W.;  Ryan, R.M., ‘The Benefits of Being Present : Mindfulness and it’s Role in Psychological Well-Being’, Journal of Personality and Social Psychology, 84, 822-848, 2003.
  • Harris, R., ACT made simple : An Easy-to-Read Primer on Acceptance and Commitment Therapy, 2009.
  • Jones, R. N., Theory and Practice of Counselling and Therapy, 4th Edt., 2006.
  • Owen R., Acceptance and Commitment Therapy : A Brief Overview, 2016. Retrieved June 10, 2017.
  • Prochaska, J. O. & Norcross, J.C.; System of Psychotherapy : A Transtheoretical Analysis 7 th Edt., 2010.
  • Snyder, C. R., & Lopez, S.J.; Positive Psychology : The scientific and practical explorations of Human Strengths, 2nd Edt., 2009.

समीक्षक : माधव चौंडे