न्यायदर्शनाने अंतर्भूत केलेल्या सोळा पदार्थांमधील हा तिसरा पदार्थ. एखाद्या विषयासंबंधीचे अनिश्चयात्मक ज्ञान म्हणजे संशय. ज्यामुळे संशय निर्माण होतो, त्यावरून त्याचे पाच प्रकार न्यायसूत्र आणि वात्स्यायनभाष्यात सांगितले आहेत.

  • दोन वस्तूंमधील समान गुणधर्मांमुळे निर्माण होणारा संशय. उदा., स्थिर उभा असणारा पुरुष आणि खांब या दोघांतील समान गुणधर्मांमुळे हा पुरुष आहे की खांब असा संशय उत्पन्न होतो.
  • काही विशेष गुणांमुळे निर्माण होणारा संशय. उदा., शब्द हा नेमका कुठून समुत्पन्न होतो हे समजत नसल्याने तो नित्य आहे अथवा अनित्य असा संशय निर्माण होतो.
  • परस्पर विरोधी सिद्धान्तांमुळे निर्माण होणारा संशय. उदा., आत्मा आहे अथवा नाही असे भिन्न दर्शनांचे भिन्न मत.
  • अनियमित प्रत्यक्षामुळे निर्माण होणारा संशय. उदा., तलाव इत्यादी ठिकाणी दिसणारे पाणी वाळवंटात दिसले, तर हे पाणी आहे की मृगजळ असा संशय निर्माण होतो.
    अनियमित अ-प्रत्यक्षामुळे निर्माण होणारा संशय. उदा., झाडांच्या मुळांमधले पाणी दिसत नाही, परंतु झाड हिरवेगार दिसते. त्यामुळे संशय निर्माण होतो.
  • जे मुळीच अज्ञात आहे किंवा जे निश्चित आहे, त्याविषयी न्याय म्हणजे युक्तिवाद करण्याची आवश्यकता नसते; जर तो विषय संशयास्पद असेल, तरच न्याय (युक्तिवाद) प्रवृत्त होतो. पक्ष आणि प्रतिपक्ष मांडल्यावर या दोन पक्षांपैकी कोणता पक्ष सत्य आहे, असा संशय निर्माण झाल्यानंतर कोणता तरी एक पक्ष सत्य आहे, असा निर्णय करतात.

संदर्भ :

  • Athalye-Bodas, Tarka-Samgraha of Annambhatta, Pune, 2003.
  • Sinha, Nandalal; Vidyābhușaņa, Chandra; Satisa, M. M.; Banarsidass, Motilal, Nyāya Sūtras of Gotama, Delhi, 1981.
  • चाफेकर, नलिनी, तर्कसंग्रह, ठाणे, १९९४.

समीक्षक – ललिता नामजोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा