न्यायदर्शनाने अंतर्भूत केलेल्या सोळा पदार्थांमधील हा सहावा पदार्थ. हे असे आहेच अशा अर्थाने एखाद्या शास्त्राने मान्य केलेले तत्त्व म्हणजे सिद्धान्त. न्यायशास्त्रात सांगितलेले सिद्धान्ताचे चार प्रकार खालीलप्रमाणे :
- सर्वतन्त्रसिद्धान्त – सर्व दर्शनांनी मान्य केलेले तत्त्व. उदा., पंचमहाभूते, पंचेंद्रिये इत्यादी.
- प्रतितन्त्रसिद्धान्त – ठरावीक दर्शनाने मान्य केलेले, परंतु इतर दर्शनांचा विरोध असणारे तत्त्व. उदा., सांख्यांचा सत्कार्यवाद.
- अधिकरणसिद्धान्त – ज्या तत्त्वाच्या सिद्धीमुळे अनुषंगाने येणारी इतर तत्त्वे मान्यता पावतात. उदा., डोळ्यांनी पाहिलेली आणि स्पर्शाने जाणलेली वस्तू एकच आहे असे ज्ञान ज्यामुळे होते असा आत्मा देहेंद्रियांव्यतिरिक्त आहे, हे मान्य करणे म्हणजे इंद्रियांचे नानात्व, प्रत्येक इंद्रियाला होणारे भिन्न प्रकारचे ज्ञान इत्यादी उपतत्त्वे मान्य असणे.
- अभ्युपगमसिद्धान्त – परीक्षण करण्यासाठी मानलेले तत्त्व. उदा., शब्दाचे नित्य अनित्यत्व तपासताना शब्द हे द्रव्य मानणे.
संदर्भ :
- Athalye-Bodas, Tarka-Samgraha of Annambhatta, Pune, 2003.
- Sinha, Nandalal; Vidyābhușaņa, Chandra; Satisa, M. M.; Banarsidass, Motilal, Nyāya Sūtras of Gotama, Delhi, 1981.
- चाफेकर, नलिनी, तर्कसंग्रह, ठाणे, १९९४.
समीक्षक – ललिता नामजोशी