ही वैदिक संकल्पना असून तिचा समावेश प्राचीन भारतीय तत्त्वप्रणालींतील प्रमुख संकल्पनांमध्ये होतो. ‘ऋत’ हा शब्द ‘ऋ’ ह्या गतिवाचक धातूपासून बनला आहे. सृष्टिनियमांचे, वैश्विक व्यवस्थेचे संचालन व संतुलन आणि सत्यनिष्ठ नैतिक मार्गाचे नियमन करणारे तत्त्व वेदात ‘ऋत’ ह्या नावाने प्रतिपादित केले आहे. सूर्य-चंद्रादींची गती, दिवस-रात्र ह्यांची नियमितता, अरुणिमा घेऊन परतणारी उषा, नियमित ऋतुचक्र, वनस्पती व अन्य सजीवांच्या शारीर विकसनाची ठरावीक पद्धत, व विश्वातील नियमबद्ध संतुलित सुसूत्रता इत्यादी तत्त्वे ‘ऋत’ ह्या संकल्पनेत अंतर्भूत होतात. थोडक्यात, संपूर्ण सृष्टिक्रमच ह्या ‘ऋत’ निबद्ध नियमांनी बांधला गेला आहे अशी वैदिक ऋषींची धारणा असल्याचे दिसून येते. सामान्यतः वरुण ही देवता ‘ऋत’ ह्या संकल्पनेशी जोडलेली मुख्य अधिष्ठात्री देवता आहे. तरीही वरुण किंवा अन्य कोणतीही देवता ‘ऋत’ तत्त्वाची निर्माती असल्याचे मात्र दिसत नाही. वरुणासाठीचे ‘ऋतस्य गोपा’ असलेले विशेषण वरुणाचे ऋत तत्त्वाशी असलेले जवळचे नाते स्पष्ट करते. वरुणाचे ‘उरुचक्षस्’ (दीर्घदृष्टी असलेला/जगाचा नियंता म्हणून सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणारा) हे विशेषण त्याच्या ऋत-पालकत्वाचेच निदर्शक आहे असे म्हणता येते. वरुणाप्रमाणेच सोम, अग्नी, सूर्य इत्यादी देवतांनादेखील ऋग्वेदात ‘ऋत-पालक’ ह्या अर्थाची विशेषणे योजिलेली दिसतात. विश्वाचे संचालन हे ह्या ‘ऋत-निबद्ध’ नियमांनीच होत असल्याने वैदिक देवता स्वतःदेखील त्यांचे पालन करतात व त्यामुळे मानवांनादेखील ‘ऋत’ नियमांचे पालन करण्यास प्रेरणा मिळते, अशी वैदिक ऋषींची निश्चित धारणा होती.

यथा नो मित्रो अर्यमा वरुणः सन्ति गोपाः| सुगा ऋतस्य पन्था: || (ऋग्वेद, ८.३१.१३)

अर्थ :  मित्र, अर्यमा, वरुण हे आमचे रक्षण करत असल्यानेच ऋत पालनाचा आमचा मार्ग सुकर होतो आहे.

अर्थात्, ‘ऋत’ हे तत्त्व देवतांपासून स्वतंत्र राहूनच वैश्विक नियमांचे संचालन करण्याचे हे कार्य करते, असे वैदिक साहित्यात स्पष्ट दिसून येते. ‘ऋत’ ह्या तत्त्वामुळेच देवतांचे अस्तित्व आहे/‘ऋत’ तत्त्वाद्वारे देवता स्वतःला अभिव्यक्त करतात असे ऋग्वेदात म्हटले आहे.

सत्येनोत्तभिता भूमिः सूर्येणात्तभिता द्यौः|
ऋतेनादित्यास्तिष्ठन्ति दिवि सोमो अधि श्रितः|| (ऋग्वेद, १०.८५.१)

अर्थ : सत्य ह्या तत्त्वाने पृथ्वीला धारण केले असून, सूर्य हा द्यूलोकाचा आधार आहे. ‘ऋत’ तत्त्वामुळे (वैश्विक नियमांमुळे) आदित्यगण (देवता) अस्तित्वात आहेत/अभिव्यक्त होतात, तर सोम हा स्वर्गात अधिष्ठित आहे.

आर्थर मॅक्डोनल ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ऋत’ ही संकल्पना वैदिक समाजाची/ऋषिमंडलाच्या चिंतनविश्वाची सर्वोच्च अशी अभिव्यक्ती आहे. विश्व-संचालनाचे व नियमनाचे हे आदिम-शाश्वत तत्त्व असलेली ‘ऋत’ ही संकल्पना ऋग्वेदकाळात भौतिक सृष्टीतील शाश्वत नियमांपुरती सीमित असली, तरी पुढील काळात विकसित झालेल्या ‘धर्म’ व ‘कर्म’ ह्या संकल्पनांमागील मूळ कल्पना असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. वैश्विक नियम, शाश्वत नियमव्यवस्था हे आदिम, मूळ अर्थ मागे पडून ‘ऋत’ ह्या कल्पनेविषयीच्या धारणादेखील बदलल्या. कर्मकांडाच्या प्रभावासोबत ‘ऋत’ तत्त्वाचे यज्ञपर अर्थ लावण्यात आले, तर पुढे औपनिषदिक परंपरांच्या प्रभावकाळात ‘ऋत’ तत्त्वावर ब्रह्म ह्या संकल्पनेचा अध्यारोप झाला. यास्काचार्यांनी निरुक्तामध्ये ‘ऋत’ शब्दाच्या यज्ञपर अर्थावर अधिक भर दिल्यामुळे ‘ऋत’ शब्दाला वैदिक ऋषींनी दिलेली व्यापक परिमाणे संकुचित होऊन ही महान कल्पना एका विशिष्ट कर्मप्रणालीपुरती सीमित होऊन राहिली. अर्थात, वेगवेगळ्या काळांत अर्थच्छटा बदलत गेल्या असल्या तरीही ‘ऋत’ शब्दाचे नियमनपर अर्थ वेगळ्या पद्धतीने डोकावत राहिले. अर्थात, ‘ऋत’ ह्या शब्दातून प्रतीत होणारे सत्य, विवेकपर अर्थच्छटा आपल्याला ऋग्वेदातच दिसून येतात. विश्वाचे संचालन, वैश्विक नियम व सृष्टिक्रम ह्यांचा मानवी जीवनातील घटनांशी संबंध जोडला गेला. धर्म-नीतिपर वर्तनासाठी वापरली गेलेली ‘ऋत’ ही कल्पना मानवी व्यवहारातील युक्ता-युक्तविवेकाशी जोडली जाऊन तीचे वैश्विक चैतन्याशी व सृष्टिक्रमाशी जोडलेल्या तिच्या नात्यातून धर्म-कर्तव्य, कर्म-कर्मफल इत्यादी कल्पना पुढील काळात विस्तार पावल्या, व धर्मव्यवस्थेला पुढील काळात नवे नीतिमूल्याधिष्ठित आयाम मिळाले असे दिसते.

त्यामुळेच ‘ऋत’ ह्या वेदकालीन कल्पनेचा मोठा प्रभाव पुढील काळात विकसित झालेल्या धर्मव्यवस्थेवर व सांस्कृतिक-सामाजिक धारणांवर आणि व्यवस्थेवर ठळकपणे दिसून येतो.

संदर्भ :

  •  Jamison, Stephanie W.; Brereton, Joel P. (Trans.), The Rigveda : The Earliest Religious Poetry of India, New York, 2014.
  • Macdonell, Arthur Anthony, A History of Sanskrit Literature, New York, 1900.
  • Oberlies, Thomas, Die Religion des Rgveda, New Delhi, 1998.
  • जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई, १९५१.
  • डांगे, सिंधू, भारतीय साहित्याचा इतिहास, नागपूर, १९७५.

समीक्षक – ललिता नामजोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा