महर्षि पतंजलींनी योगशास्त्रात नियमांचा उल्लेख योगाचे एक अंग म्हणून केला आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान यांचा अंतर्भाव नियमांत होतो (पातंजल योगसूत्र  २.३२). त्यातील तप शब्दाचा अर्थ स्पष्ट करीत असताना पातंजल योगसूत्रावरील व्यासभाष्यामध्ये आणि विज्ञानभिक्षूंच्या वार्त्तिकामध्ये मौनचा एकप्रकारचे तप म्हणून निर्देश केला आहे. ह्या  दोघांनीही ‘काष्ठमौन’ आणि ‘आकारमौन’ असे मौनाचे दोन प्रकार सांगितले आहेत. काष्ठमौनाचा अर्थ व्यासांनी मौन पाळणे आणि अन्य प्रकारे म्हणजे हात इत्यादींचा वापर करून अथवा खाणाखुणा करून सुद्धा अर्थ प्रकट न करणे असा सांगितला आहे. काष्ठ म्हणजे लाकूड. लाकडाप्रमाणे निश्चेष्ट राहणे म्हणजेच हालचालीद्वारे इच्छित अर्थ व्यक्त करण्याचा प्रयत्न न करणे हे या प्रकारच्या मौनात अभिप्रेत आहे. आकारमौन वाणीचा उपयोग न करण्यापुरते सीमित आहे. त्यामुळे या प्रकारच्या मौनामध्ये खाणाखुणांनी इंगित व्यक्त करण्याची मुभा आहे (काष्ठमौनमिङ्गितेनापि स्वाभिप्रायाप्रकाशनम्, आकारमौनं त्वचनमात्रम्। योगवार्त्तिक २.३२).

बृहदारण्यक उपनिषदात साधकाची आत्मसाक्षात्काराकडे होणारी वाटचाल सांगताना त्याने मौन पाळावे आणि प्रगतावस्थेत मौनाचाही त्याग करावा असे म्हटले आहे (३.५.१). मौन हा देहाचा धर्म आहे आणि साधनेच्या मार्गाने जो अभिप्रेत आहे तो आत्मा देहातीत आहे, म्हणून हा त्याग आवश्यक आहे.

तेजोबिन्दु उपनिषदामध्ये योगांगांची गणना करताना मौन हे चौथे अंग म्हणून निर्दिष्ट केले आहे. वाणीचे मौन हे केवळ अज्ञानी लोकांचे मौन आहे. ब्रह्म जाणणाऱ्यांसाठी ते नाही असे प्रस्तुत उपनिषद् सांगते. ब्रह्म जाणणाऱ्यांनी ‘सहजमौन’ आचरणात आणावे. हे सहजमौन म्हणजे ज्या आत्मतत्त्वाचे वर्णन करताना ते इंद्रियातीत तसेच शब्दातीत असल्यामुळे वाणी मनासह माघारी येते, ते आत्मतत्त्व अवर्णनीय आहे हे उमजून शांत राहणे. हे फक्त योग्यांनाच शक्य आहे (तेजोबिन्दु उपनिषद्  १.२०-२१).

योगवासिष्ठात (निर्वाण प्रकरण, पूर्वार्ध, सर्ग ६८) मौनाच्या चार प्रकारांचे वर्णन केले असून मुनींनी ते आचरणात आणावे असे सांगितले आहे. वाङ्मौन (वाणीशी संबद्ध मौन), अक्षमौन (इंद्रियांचा बळजबरीने निग्रह करणे), काष्ठमौन (शरीराच्या सर्व व्यापारांचा अर्थात् क्रियांचा निरोध करणे) आणि सौषुप्तमौन (आत्मतत्त्वाचा साक्षात्कार झाल्यामुळे सुषुप्ति अवस्थेत असल्यासारखी शांतता अनुभविणे) असे ते चार प्रकार आहेत. योग्यांचे काष्ठतपस्वी आणि जीवन्मुक्त असे दोन प्रकार आहेत, असे वसिष्ठ श्रीरामाला सांगतात. चांद्रायण इत्यादी व्रतांचे जो आचरण करतो, इंद्रिये व मनावर बळजबरीने ताबा मिळविण्यासाठी जो तप करतो, ज्याला आत्मविषयक अंतर्दृष्टी नसते, तो काष्ठ तपस्वी. तो वर उल्लेख केलेल्या मौनांपैकी पहिल्या तीन प्रकारच्या मौनांचा अवलंब करतो.

सौषुप्तमौन हे वाच्यार्थाने मौन नसून आत्मज्ञान झाल्यावर जीवाच्या स्वरूपात स्थिर होणे यालाच सौषुप्तमौन म्हटले आहे. ज्याला आत्मतत्त्वाचा साक्षात्कार झाला आहे, तो जीवन्मुक्त सौषुप्तमौनाचा अवलंब करतो. ज्याला पुनर्जन्म नाही तोच सौषुप्तमौनाचा अधिकारी असतो. सौषुप्तमौनात अहंकाराने युक्त संस्कार क्षीण होतात व आत्मविषयक ध्यानामुळे सात्त्विक संस्कार वाढीस लागतात. ज्याप्रमाणे स्वप्नातून जागृत झालेल्या पुरुषाला जाग आल्यावर समजते की, तो स्वप्न पाहत होता; त्यामुळे तो स्वप्नातील दृश्याचा विचार सोडून देतो. त्याप्रमाणे ऋतंभरा प्रज्ञेच्या उदयाने योगी जगाच्या सत्तेविषयी विचार न करता आत्मतत्त्वाचाच विचार करतो.

योगवासिष्ठानुसार जीवन्मुक्त योग्याला आत्मज्ञान झाले असल्यामुळे साधना म्हणून प्राणायाम करण्याची आवश्यकता भासत नाही. त्याची इंद्रिये आपापल्या विषयांच्या लाभामुळे आनंदित होत नाहीत व अप्राप्तीमुळे दु:खी होत नाहीत. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे तो पाहत असता, ऐकत असता, बोलत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, श्वासोच्छ्वासकरीत असता, त्याग करीत असता, घेत असता, (तसेच) पापण्या उघडणे व त्या मिटणे या क्रिया सुरू असताही इंद्रियांचा आपापल्या विषयांत व्यापार चालू आहे असे समजून वागतो व आपण काहीच करीत नाही असेच नि:संदेह मानतो (५.८-९).

सुषुप्ती अवस्थेत जीव चेतन, स्वस्थ व शांत राहतो. त्या अवस्थेत असल्याप्रमाणे योग्याचे शरीर, मन, वाणी आणि कर्म सदैव क्षोभरहित होते. ज्ञानाने बाधित झालेले त्याचे चित्त वृत्तिशून्य झालेले असते. ते आत्मरूप होते. तो जाग्रत् अवस्थेत लौकिक व्यवहारात मग्न असतानाही सुषुप्ती अवस्थेतील शांती अनुभवितो. त्याला निरोधासाठी अभ्यासाची आवश्यकता उरत नाही. आत्मतत्त्वाला यथार्थरूपाने पाहून त्याचे चित्त आत्म्याप्रमाणेच नि:संदेह व सर्व सुखदु:खात अचल होऊन राहते. या अवस्थेलाच सौषुप्तमौन असे म्हणतात. देहाच्या दृष्टीने ही सुषुप्तीची अवस्था असली तरी आत्म्याच्या दृष्टीने योगवासिष्ठात तिला तूर्यावस्था म्हटले आहे.

पहिली तीन मौने ही ‘तुच्छ’ (कमी दर्जाची) मौने समजली जातात. कारण त्यात मन मलविरहित झालेले नसते. ते बाह्य विषयांकडे धावते. चित्ताच्या वृत्तींचा निरोध झालेला नसतो  आणि अज्ञानामुळे जग खरे भासते. त्यामुळे ती मौने चित्ताच्या बंधास कारणीभूत होतात. त्यांचे फळ अनिश्चित व क्षणिक असते. या उलट सौषुप्तमौन मात्र सर्व आध्यात्मिक साधनेचे अंतिम लक्ष्य आहे.

आधुनिक काळात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांनी मौनाचे महत्त्व जाणले होते. महात्मा गांधींच्या मते समाधी म्हणजे मौनच होय. मुनी आणि मौन हे दोन्ही शब्द ‘मन्’ (चिंतन करणे) या एकाच क्रियापदापासून निर्माण झाले आहेत ही गोष्ट ते नमूद करतात. मौनामुळे असीम शांती लाभते असे ते म्हणतात. विनोबा भावे यांनी २५ डिसेंबर १९७४ या दिवशी एक वर्षासाठी मौन सुरू केले आणि या काळात लेखनही बंद केले.

आधुनिक काळात मौनाचे निष्ठेने आचरण करणे कठीण असले तरी मितभाषित्व हा मौनाचाच एक प्रकार समजून त्याचे आचरण करणे श्रेयस्कर ठरेल.

पहा : ऋतंभरा प्रज्ञा, तेजोबिंदू उपनिषद्, योगवासिष्ठ, योगसूत्रे, व्यासभाष्य.

समीक्षक : ललिता नामजोशी