जनाबाई : वारकरी संप्रदायातील महत्त्वाची संत कवयित्री. जन्मकाळ निश्चित नाही. ती संत नामदेवांपेक्षा चार-सहा वर्षांनी मोठी असावी, असे एक मत आहे. संत नामदेवांचा जन्म १२७० चा. संत चरित्रकार महिपती असे मानतात की ती नामदेवांपेक्षा दोन-चार वर्षांनी लहान होती. म्हणजेच इ.स. १२७० च्या आसपास  गंगाखेड (जि. परभणी) येथे दमा व करूंड या दांपत्याच्या पोटी तिचा जन्म झाला. तिची जात निश्चितपणे सांगता येत नाही; परंतु ती शूद्र वर्णातील होती.आई-वडिलांसोबत पंढरपूरात आलेली असताना ती स्वत:च आग्रहाने पंढरपुरात राहिली,आई-वडिलांच्या मृत्यूमुळे पोरकी होऊन पंढरपुरात श्रीविठ्ठल मंदिराच्या परिसरात राहू लागली,आई लहानपणीच वारल्यामुळे बापाने तिला पंढरपुरास दामाशेटीच्या घरी ठेवले आणि तेथेच ती लहानाची मोठी झाली आणि चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवास ती सापडली अशा काही आख्यायिका जनाबाईच्या आयुष्यासंदर्भात आहेत. तिला नामदेवाचे वडील दामाशेटी यांनी आपल्या घरी आश्रय दिला. त्यामुळे पुढे आयुष्यभर पडेल ते घरकाम करत दासी म्हणून ती नामदेवांच्या कुटुंबात वावरली. ती शेवटपर्यंत अविवाहीत होती.

नामदेवांची आर्त विठ्ठलभक्ती, परमेश्र्वराच्या स्वरूपाचे ज्ञान व्हावे यासाठी त्यांनी केलेली धडपड, नामदेवाचे अभंगलेखन, सामूहिक भजन व कीर्तन याचे जनाबाईला जवळून दर्शन घडले. नामदेवांना गुरू मानून तिने वारकरी भक्तिचळवळीत सहभाग घेतला. नामदेव – ज्ञानदेवादी संतांच्या रचना भजनात म्हणता म्हणता तिला काव्यछंद सापडला. ती स्वत:च अभंग रचू लागली. तिचे सत्शील वागणे, अभंग लेखन आणि वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीतील योगदान यामुळे लवकरच तिला संत म्हणून मान्यता मिळाली. नामदेवांच्या कुटुंबातील अन्य तेरा सदस्यांपैकी कोणालाच संत संबोधले गेले नाही, परंतु दासी असणाऱ्या जनाबाईला तो सन्मान मिळाला.

शासकीय नामदेवगाथेत जनाबाईचे ३४० अभंग संकलित करण्यात आले आहेत. तिच्या नावावर हरिश्चंद्राख्यान, प्रल्हादचरित्र, कृष्णजन्म, बाळक्रीडा, थालीपाक, द्रौपदीस्वयंवर  वगैरे स्फुट काव्यग्रंथही आढळतात. त्याशिवाय डॉ. दा. बा. भिंगारकरांनी जनाबाईचे ४३ अप्रकाशित अभंग व १० ओव्या संकलित केल्या आहेत. जनाबाईचे अभंगात आर्त भावभक्ती, श्रीविठ्ठल महिमा, नाममाहात्म्य, पंढरीमाहात्म्य, संतगौरव, उपदेश असे विषय आलेले दिसतात. तिने आपल्या अभंगातून श्रीविठ्ठलाचे मानुषीकरण केले. देवाला कधी माय-बाप तर कधी सखा-सांगाती संबोधून भावचित्रे रेखाटली. त्याद्वारे देव भक्तिवश असल्याच्या मिथककथा निर्माण झाल्या. ज्ञानेश्र्वरादी भावंडांच्या समाधी नंतर नामदेव तीर्थयात्रेसाठी उत्तर व दक्षिण भारतात गेलेले असताना तिने वारकरी संप्रदायाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. ‘डोईचा पदर आला खांद्यावरी | भरल्या बाजारी जाईन मी ||’ म्हणत तिने आत्मविश्र्वासाने पंढरीच्या पेठेत भक्तिमार्ग प्रसाराचे दुकान मांडले. ‘स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास’ म्हणत तिने अध्यात्मातील योग साधना आत्मसात केली, तसेच ज्ञानोत्तर भक्तीचा स्वीकार केला. तिची कविता भावकाव्य, चरित्र, आख्यान, उपदेश, भारूड, ओवी, पाळणा, आरती अशा अनेक काव्यप्रकारात आढळते. बडव्यांनी तिच्यावर श्रीविठ्ठलाचे सोन्याचे पदक चोरण्याचा आळ आणला व तिला सुळी देण्याचा प्रयत्न केला;परंतु तो यशस्वी झाला नाही अशी आख्यायिका आहे.तिने इ.स.१३५० मध्ये संत नामदेवांबरोबर पंढरपूरच्या महाद्वारी समाधी घेतली अशा सांप्रदायिक मान्यता आहे.

संदर्भ :

  • भिंगारकर,डॉ.दा.बा., संत कवयित्री जनाबाई : चरित्र, काव्य आणि कामगिरी,मॅजेस्टिक प्रकाशन,मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा