सांख्यांच्या २५ तत्त्वांपैकी एक. अनेक विषयांमध्ये या संज्ञाचा वापर केला जात असून येथे फक्त सांख्य तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने ऊहापोह केला गेला आहे. साम्यावस्थेत असणाऱ्या प्रकृतीत सत्त्व-रज-तम या त्रिगुणांचा क्षोभ झाल्यावर सत्त्वगुण किंचित वरचढ होऊन महत् किंवा बुद्धी हे तत्त्व तयार होते. बुद्धी या तत्त्वाला महत् म्हटले आहे; कारण या तत्त्वाच्या निर्मितीनंतर प्रकृती आकार धारण करू लागते, महान होऊ लागलेली असते. सांख्यांच्या मते, सृष्टीची निर्मिती ही एक हेतुनिष्ठ क्रिया आहे. ती हेतुशून्य संकल्परहित नसून हेतुयुक्त आणि संकल्पमय प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतील अध्यवसायाचे, निश्चयपूर्वक संकल्पाचे काम असते बुद्धीचे. आधी निश्चय आणि मग सुघटित, योजनाबद्ध कार्य या प्रक्रियेत अपेक्षित असते. हा अध्यवसाय अथवा निश्चय करण्याचे कार्य बुद्धीचे. यासाठीच सृष्ट्युत्पत्तीच्या आरंभी बुद्धितत्त्व येते.

सांख्यकारिकेत म्हटल्याप्रमाणे-

अध्यवसायो बुद्धिर्धर्मो ज्ञानं विराग ऐश्वर्यम् |
सात्त्विकमेतद्रूपं तामसमस्माद्विपर्यस्तम् || (२३)

अर्थात अध्यवसाय म्हणजे निश्चय करण्याचे कार्य बुद्धीचे आहे. किंबहुना हा बुद्धीचा गुण आहे. धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य ही सात्त्विक बुद्धीची चार लक्षणे आहेत. याउलट अधर्म, अज्ञान, अवैराग्य आणि अनैश्वर्य ही चार लक्षणे रजोगुण-तमोगुणांनी युक्त अशा बुद्धीची आहेत. वाचस्पतिमिश्र विरचित सांख्यतत्त्वकौमुदीत या प्रकारांचे सविस्तर विवेचन येते.

संदर्भ :

  • Apte, Vaman Shivaram, The student’s Sanskrit-English Dictionary, Delhi, 2011.
  • Jha, Ganganath, Trans., Vachaspatimisra’s Comentary on the Sankhya-karika, Pune, 1965.
  • Wilson, Horace Hagman, Sāṅkhya Kārikā or Sāṅkhya-Yoga, Mumbai, 1887.
  • Larson, Gerald James, Classical Sankhya, An Interpretation of its History and Meaning, Delhi, 2005.
  • कंगले, र. पं. संपा., सर्वदर्शनसंग्रह, मुंबई, १९८५.
  • कुमठेकर, उदय, सांख्यदर्शन, पुणे, २००७.
  • टिळक, बाळ गंगाधर, श्रीमद्‌भगवद्‌गीतारहस्य, पुणे, १९७४.
  • दीक्षित, श्रीनिवास हरि, भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापूर,२०१४.

समीक्षक – ललिता नामजोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा