कोलर, जॉर्जेस जे. एफ. : (१७ एप्रिल १९४६ – १ मार्च १९९५).

जर्मन जीवशास्त्रज्ञ. त्यांना एक-कृतक प्रतिपिंड (Monoclonal Antibodies; mAb) बनविण्याचे तंत्र विकसित केल्यामुळे १९८४ सालातील शरिरक्रियाविज्ञान वा वैद्यक विषयातील नोबेल पारितोषिक सेझार मिलस्टाइन आणि नील के. जेर्न यांसोबत विभागून देण्यात आले.

कोलर यांचा जन्म म्यूनिक, जर्मनी येथे झाला. त्यांनी फ्रायबर्ग विद्यापीठातून पदवी घेतली. तेथून त्यांनी जीवशास्त्र या विषयात पीएच. डी. संपादन केली (१९७४). बाझेल इन्स्टिट्यूट ऑफ इम्यूनॉलॉजी येथे ते कार्यरत होते. नंतर माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर इम्यूनोबायॉलॉजीमध्ये (Max Planck Institute of Immunobiology) येथे ते संचालक झाले (१९८६).

कोलर हे जैवतंत्रज्ञानातील एका महत्त्वाच्या तंत्रज्ञांचे सहसंशोधक होते त्यांनी रोगप्रतिकारप्रणालीला निवडलेल्या प्रतिजना (Antigen) विरुद्ध शुद्ध प्रतिपिंड बनविण्याकरिता भाग पाडेल अशी पद्धत शोधून काढली. या शुद्ध प्रथिनांना एक-कृतक प्रतिपिंड (Monoclonal Antibody) असे म्हणतात. एक-कृतक प्रतिपिंडाचा शोध लागला, तेव्हा कोलर हे तरुण वयातील पीएच.डी नंतरचे काम करणारे संशोधक होते व त्याचे गुरू मिलस्टाइन यांच्याबरोबर इंग्लंडच्या केंब्रिज येथील रेणवीय प्रयोगशाळेत काम करीत होते. ब्रिटिश सरकार त्या प्रयोगशाळेला मदत करीत होते.

कोलर यांनी इम्युनॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये रोगप्रतिकारप्रणालीतील विविधतेचा अभ्यास केला. परक्या प्रथिना विरुद्ध उंदीर हजारो प्रतिपिंड तयार करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. मिलस्टाइन यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर कोलर यांनी केंब्रिज येथे एकाच प्रकारची शुद्ध प्रतिपिंडे तयार करणाऱ्या पेशींच्या निर्मितीची कल्पना मांडली. त्यांच्या विचाराप्रमाणे उंदराला प्रथम शक्तिशाली प्रतिजन द्यायचे व त्याच्या प्लिहेतून लिंफोसाईट्स (lymphocytes) या प्रकारच्या पांढऱ्या पेशी बाहेर काढायच्या. या पांढऱ्या पेशी नंतर मायलोमा (myeloma) प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींशी संकरीत करायच्या, त्यातून अपेक्षित प्रतिजन विरुद्ध प्रतिपिंड तयार करणाऱ्या योग्य लिंफोसाईट्स (lymphocytes) निवडल्या गेल्या तर ती संकरित पेशीं प्रयोग नळीत अनंत काळापर्यंत जिवंत राहील व त्यांच्यापासून तयार होणाऱ्या पेशीपण तशीच शुद्ध प्रतिपिंडे बनवू शकतील. पुढे त्यांच्या प्रयोगातील शुद्ध प्रतिपिंडे देणाऱ्या पहिल्या संकरित पेशी तयार झाल्या. अशा रीतीने इच्छित प्रतिजन विरुद्ध शुद्ध प्रतिपिंडे तयार करण्याची सामान्य पण शक्तिशाली पद्धत कोलर यांनी तयार केली. ही शुद्ध प्रतिपिंडे त्यांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे रोग चिकित्सा आणि रोगांच्या उपचारांकरिता खूपच उपयुक्त व परिणामकारक होती. एक-कृतक प्रतिपिंड तयार करण्याच्या पद्धतीला हायब्रिडोमा तंत्रज्ञान (hybridoma technique) असे पण म्हणतात. पुढे कोलर यांनी हायब्रिडोमा तंत्रज्ञान चांगले विकसित केले, पण त्यांना त्यात व्यावसायिक रस नव्हता.

फ्रायबर्ग येथे कोलर व त्याचे सहकारी यांनी रोगप्रतिकारप्रणालीत बी पेशींचे महत्त्व आणि इंटरलूकिंनना (Interleukin) त्या कसे ओळखतात याचा अभ्यास करायला सुरुवात केली.

जर्मनीमधील फ्रायबर्ग येथे ४८ व्या वर्षी हृदयक्रिया बंद पडल्याने  कोलर यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक – रंजन गर्गे

प्रतिक्रिया व्यक्त करा