पार्श्वभूमी : संयुक्त राष्ट्रसंघ ही विविध देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने तिची स्थापना करण्यात आली. यापूर्वीची राष्ट्रसंघ ही संघटना प्रभावहीन ठरल्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर २४ ऑक्टोबर १९४५ रोजी ही संघटना स्थापन करण्यात आली. जगाला पुन्हा एकदा महायुद्धाला सामोरे जावे लागू नये, हा या संघटनेच्या स्थापनेमागचा मुख्य हेतू होता. स्थापनेच्या वेळी ५१ देश या संघटनेचे सदस्य होते. आता हिची सदस्यसंख्या १९३ असून दोन देशांना निरीक्षक देश म्हणून प्रवेश देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन येथे आहे. संघटनेची अन्य कार्यालये जिनीव्हा, नैरोबी आणि व्हिएन्ना येथे आहेत. विविध देशांमध्ये शांतता, सलोखा आणि सुरक्षा टिकविणे, मानवी हक्कांचे संरक्षण, सामाजिक व आर्थिक विकास, पर्यावरणाचे संवर्धन आणि दुष्काळ, नैसर्गिक संकट आणि युद्धाच्या काळात मानवतेच्या भूमिकेतून मदत करणे, ही या संघटनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. संघटनेतला सर्वांत प्रभावी अधिकारी असलेला महासचिव (सेक्रेटरी जनरल) हा या संघटनेचे नेतृत्व करतो.

रचना आणि कार्य : एप्रिल ते जून १९४५ दरम्यान सॅन फ्रॅन्सिस्को येथे झालेल्या एका परिषदेत संघटनेच्या प्रस्तावाचा मसुदा तयार करण्यात आला. या परिषदेच्या शेवटी म्हणजे २६ जून १९४५ रोजी मसुद्याला अंतिम मान्यता देऊन त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. अमेरिका, रशिया आणि त्यांच्या गटातील देश यांच्यातल्या शीतयुद्धामुळे सुरुवातीच्या दशकात जागतिक शांतता टिकविणे अतिशय जिकिरीचे बनले होते. या काळात कोरिया आणि कांगो यांमधल्या घडामोडींमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजाविली. १९४७ मध्ये इझ्राएल या नव्या देशाच्या निर्मितीलाही संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली. १९६० च्या दशकात वसाहतवाद मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे या संघटनेच्या सदस्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली. १९७० च्या दशकात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सामाजिक व आर्थिक सुधारणांच्या कामांचा खर्च संघटनेच्या शांततारक्षणाच्या कामावरील खर्चापेक्षा अनेक पटींनी वाढला. शीतयुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने जगभरातील अनेक लष्करी मोहिमांमध्ये आणि शांततारक्षणाच्या कार्यामध्ये भाग घेतला आणि त्यात संघटनेला संमिश्र यश मिळाले.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख घटक आहेत. १) आमसभा (मुख्य प्रतिनिधी सभा), २) सुरक्षा परिषद (शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेणारी समिती), ३) आर्थिक व सामाजिक परिषद (आंतरराष्ट्रीय आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत विविध देशांत सहकार्य वाढवून विकास साधण्यासाठी), ४) सचिवालय, ५) आंतरराष्ट्रीय न्यायालय, ६) संयुक्त राष्ट्रसंघ विश्वस्त परिषद.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध संस्थांमध्ये जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक अन्न कार्यक्रम, युनेस्को आणि युनिसेफ यांचा समावेश होतो.

आमसभा ही संयुक्त राष्ट्रसंघाची मुख्य कार्यकारी समिती आहे. सर्व सदस्यदेशांचे प्रतिनिधी या आमसभेत असतात. या आमसभेचे अधिवेशन दरवर्षी होतेच, पण विशेष महत्त्वाच्या प्रश्नांवर आपत्कालीन अधिवेशनही बोलाविता येते. आमसभेचा अध्यक्ष सदस्यदेशांमधून चक्रनेमिक्रम पद्धतीने (रोटेशन) निवडला जातो. हा अध्यक्षच आमसभेचे नेतृत्व करतो. आमसभेसाठी २१ उपाध्यक्ष निवडले जातात. आमसभेत कोणत्याही प्रश्नाच्या निर्णयासाठी उपस्थित सदस्यांच्या दोनतृतीयांश सदस्यांच्या संमतीची गरज असते. प्रत्येक सदस्यदेशाला एक मत असते. आर्थिक बाबींव्यतिरिक्त अन्य कुठलेही ठराव सदस्यदेशांवर बंधनकारक नसतात. शांतता आणि सुरक्षेबाबतचे विषय वगळता आमसभा कोणत्याही गोष्टीबाबत शिफारस करू शकते. शांतता आणि सुरक्षा हे विषय सुरक्षा परिषदेकडे सोपविण्यात आले आहेत.

विविध देशांत शांतता आणि सुरक्षिततेची स्थिती कायम ठेवण्याची जबाबदारी सुरक्षा परिषदेची आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्य संस्था सदस्यदेशांना केवळ शिफारस करू शकतात, पण संयुक्त राष्ट्रसंघाच्या घटनेच्या कलम २५ नुसार सुरक्षा परिषदेचा निर्णय सदस्यदेशांवर बंधनकारक असतो. या निर्णयास संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा ठराव असे म्हटले जाते. सुरक्षा परिषदेत १५ सदस्यदेश असतात. त्यांपैकी चीन, फ्रान्स, रशिया, अमेरिका आणि ब्रिटन हे पाच देश कायम सदस्य आहेत. अन्य दहा देश हे परिषदेचे अस्थायी सदस्य असतात. कायम सदस्य असलेल्या पाच देशांना नकाराधिकार देण्यात आला आहे. या नकाराधिकाराचा वापर करून या पाचपैकी कोणताही देश संयुक्त राष्ट्रसंघाचा कोणताही ठराव रोखू शकतो. मात्र त्यावरील चर्चा या देशांना रोखता येत नाही. अस्थायी सदस्यदेशांची मुदत दोन वर्षांची असते आणि आमसभा मतदानाने क्षेत्रीय आधारावर या देशांची निवड करते.

सदस्यदेशांना ठरवून दिलेल्या आणि त्यांनी स्वयंस्फूर्तीने दिलेल्या आर्थिक मदतीवर संयुक्त राष्ट्रसंघाचे काम चालते. संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक बाबतीत कोणत्याही एका देशावर अवलंबून राहू नये, असे सुरुवातीलाच ठरविण्यात आले होते. त्यामुळे सदस्यदेशांकडून मिळणाऱ्या मदतीवर एक मर्यादा घालण्यात आली आहे. संघटनेच्या निधीचा खूप मोठा भाग शांतता आणि सुरक्षेच्या कारणांसाठीच खर्च केला जातो.

पुरस्कार आणि मूल्यमापन : संयुक्त राष्ट्रसंघाला २००१ मध्ये शांततेचा नोबेल पारितोषिक देण्यात आले. संघटनेच्या अनेक अधिकाऱ्यांना व संलग्न संस्थांनाही वेळोवेळी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रभावाबद्दलच्या अन्य प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाच्या आहेत.

भाषांतरकार : भगवान दातार

समीक्षक : शशिकांत पित्रे