पार्श्वभूमी : चीन, कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या पाच देशांच्या नेत्यांनी १९९६मध्ये ‘शांघाय–५’ या संघटनेची स्थापना केली होती. त्यानंतर १५ जून २००१ रोजी उझबेकिस्तान हा देश सहावा सदस्यदेश म्हणून या संघटनेत सामील झाला. त्यामुळे या संघटनेचे नाव ‘शांघाय सहकार्य संघटना’ (SCO) किंवा ‘शांघाय करार’ असे ठेवण्यात आले. युरोप आणि रशिया या दोन्ही खंडांतील देशांच्या सहभागाने बनलेली अशी ही (युरेशियन) राजकीय, आर्थिक आणि लष्करी संघटना होय. शेजारी देशांबरोबर चांगले संबंध आणि परस्पर सामंजस्याच्या कराराने संघटनेतील देश परस्परांशी बांधलेले आहेत. भारत आणि पाकिस्तान या देशांनी जून २०१७ साली या संघटनेत सामील होण्याविषयीच्या करारावर स्वाक्षरी केली आहेत. शांघाय सहकार्य संघटनेत अन्य काही देशांचा वेगवेगळ्या संदर्भांत समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया या चार देशांचा निरीक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे, तर अमेरिका, अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका आणि टर्की हे सहा देश संवाद-भागीदार आहेत. आशियान, सी.आय.एस. आणि तुर्कमेनिस्तान यांना विशेष निमंत्रित म्हणून प्रवेश देण्यात आला आहे. या संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर संबंध प्रस्थापित केले असून आमसभा, युरोपियन युनियन, दक्षिण आणि पूर्व आशियातील देशांची आशियान ही संघटना, स्वतंत्र देशांची राष्ट्रकूल परिषद आणि इस्लामिक सहकार्य परिषद या संघटनांमध्ये शांघाय सहकार्य संघटनेला निरीक्षक म्हणून प्रवेश देण्यात आला आहे. या संघटनेतील सहा सदस्यदेशांनी यूरोप आणि आशियातील ६० टक्के भूभाग व्यापला असून या देशांची एकत्रित लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या एकचतुर्थांश इतकी होते. निरीक्षक देशांची लोकसंख्या यात धरली, तर ही लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या निम्मी होते.

रचना आणि कार्य : शांघाय सहकार्य संघटना ही अनेक समित्यांची मिळून बनलेली आहे. राष्ट्रप्रमुखांची समिती ही निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे. शासकीय प्रमुखांची समिती ही निर्णय घेणारी दुसऱ्या क्रमांकाची समिती आहे. या समितीची दरवर्षी शिखर परिषद होते. त्या परिषदेत विविध देशांच्या सहकार्याच्या संदर्भात चर्चा होते. तसेच संघटनेचे अंदाजपत्रकही ठरविण्यात येते. परराष्ट्रमंत्र्यांच्या आणि राष्ट्रीय समन्वयकांच्या समितीत त्या-त्या वेळच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांची सविस्तर चर्चा होते. त्याचबरोबर शांघाय सहकार्य संघटनेचे अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबरचे संबंध आणि संवाद यांविषयी नियमितपणे चर्चा होते. संघटनेसमोरच्या विषयांमध्ये आणि संघटनेच्या मागण्यांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीनेही ही समिती लक्ष ठेवते.

या संघटनेचे सचिवालय बिजिंग येथे आहे. हे सचिवालय म्हणजे संघटनेची प्राथमिक कार्यकारी समिती आहे. ही समिती संघटनेच्या निर्णयांची अंमलबजावणी करते. संघटनेचे कायदेविषयक निर्णय, जाहीरनामे, विषयपत्रिका या बाबींची पूर्तता करते. संघटनेचे दस्तावेज जपून ठेवते. संघटनेच्या चौकटीतील विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. संघटनेविषयीच्या माहितीचा प्रचार आणि प्रसार करते. दहशतवादी, फुटीरतावादी आणि अतिरेक्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी शांघाय सहकार्य संघटनेने क्षेत्रीय दहशतवादविरोधी समिती निर्माण केली आहे. या समितीचे मुख्य कार्यालय ताश्कंद येथे आहे. दहशतवादी, फुटीरतावादी आणि अतिरेकी यांच्या कारवायांना आळा घालण्याच्या सदस्यदेशांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय निर्माण करण्याचे काम ही समिती करते. या समितीच्या प्रमुखांची दर तीन वर्षांनी निवड केली जाते. या समितीवर प्रत्येक सदस्यदेश आपला कायम प्रतिनिधी पाठवितो.

सदस्यदेशांमध्ये संरक्षणक्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनेही ही संघटना काम करते. एप्रिल २००६ साली क्षेत्रीय दहशतवादविरोधी समिती आणि ऑक्टोबर २००७ मध्ये सामूहिक सुरक्षा संघटना स्थापन केल्यानंतर आपण एक लष्करी गट म्हणून काम करणार नसल्याचे या संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र सुरक्षा, गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, सायबर क्षेत्रातील गुन्हेगारी आणि दहशतवाद यांविरुद्धचा लढा संघटित करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, असे संघटनेने म्हटले आहे. सदस्यदेशांनी दहशतवाद आणि अन्य  गुन्ह्यांच्या विरोधात अनेक वेळा जमीन, समुद्र आणि आकाशात संयुक्त कारवाई केली आहे.

परस्परांमध्ये आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यदेशांनी काही क्षेत्रांत मुक्त व्यापार सुरू केला आहे. तेल आणि नैसर्गिक वायू यांवर आधारित संयुक्त ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने ही संघटना प्रयत्न करीत आहे. पेट्रोलियमचे (हायड्रो कार्बन) नवे साठे शोधण्यासाठीही ही संघटना प्रयत्नशील आहे. संघटनेतील सदस्यदेश विकास साधण्यासाठी परस्परांना आर्थिक मदत करीत असतात. सांस्कृतिक मंत्र्यांच्या नियमित बैठका घेऊन विविध प्रदर्शने आणि कला व लोकनृत्याचे महोत्सव आयोजित करून ही संघटना सदस्यदेशांतील सांस्कृतिक सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न करीत असते.

पुरस्कार आणि मूल्यमापन : रशियाचे विघटन झाल्यामुळे आणि वॉर्सा करार रद्द झाल्यामुळे शांघाय सहकार्य संघटनेला आता बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. नाटो या संघटनेला शह देण्यासाठीच शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना झाली, हे पश्चिमी गटातील देशांच्या लक्षात आले आहे. आमच्या क्षेत्रात कुठेही लष्करी तळ असू नयेत, असे या संघटनेच्या सदस्यदेशांनी संयुक्त राष्ट्रसंघाला कळविले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने ही मागणी फेटाळली असली, तरी या संघटनेला निरीक्षक सदस्य म्हणून मान्यता दिली आहे.

युरेशियन देश सर्व जगावर वर्चस्व गाजवू शकतील आणि मध्य आशियावर नियंत्रण प्रस्थापित केल्यास युरेशियन देशांवर आपोआप नियंत्रण प्रस्थापित होईल, असा एक सिद्धांत एका इराणी लेखकाने मांडला आहे. रशिया आणि चीन हे देश या सिद्धांताकडे बारकाईने लक्ष देत आहेत. या दोन देशांनीच २००१ मध्ये शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना केली होती. आपल्या सीमांची सुरक्षा आणि दहशतवादी कारवायांना आळा घालणे हा या स्थापनेमागचा वरवरचा हेतू होता. प्रत्यक्षात अमेरिका आणि नाटो राष्ट्रांच्या कारवायांना आळा घालून आंतरराष्ट्रीय समतोल निर्माण करण्यासाठीच ही संघटना स्थापन केल्याचे मानले जाते.

संदर्भ :

भाषांतरकार : भगवान दातार

समीक्षक : शशिकांत पित्रे