उच्च तापमानात ज्वलनक्रिया होत असताना नायट्रोजनची वायुरूप भस्मे – नायट्रोजन ऑक्साइड (NO), नायट्रोजन डाय-ऑक्साइड (NO2) आणि नायट्रोजन टेट्रा ऑक्साइड (N2O4) ही वायुप्रदूषके तयार होतात. सर्वसाधारण हवामानात दिवसा हे वायू दशकोटी भागात ८ – १० भाग या प्रमाणात असतात. वनस्पतींच्या रंध्रांतून शोषले जाऊन प्रथिनात गठीत होतात. शिवाय दिवसा सूर्यप्रकाशामुळे त्यांचे इतर वायूंत रूपांतर होते आणि त्यांचे हवेतील प्रमाण कमी होते; त्यामुळे ते गंभीर प्रदूषक ठरत नाहीत. परंतु, रात्रीच्या वेळी या दोन्ही प्रक्रिया होत नसल्यामुळे त्यांचे प्रमाण वाढत जाते. त्यांचे दशलक्ष भागात ३ भाग हे प्रमाण वनस्पतींना विषारी ठरते. पाने डागाळणे, गळून पडणे व डायबाक रोगासारखी लक्षणे दिसू लागतात. झाडे मरून जाऊही शकतात. दशलक्ष भागात १० – २५० भाग नायट्रोजन डाय-ऑक्साइडमुळे केवळ १० मिनिटांत पाने डागाळणे व ते झाड पर्णहीन होणे असे परिणाम दिसून आले आहेत. पानाच्या वरच्या पृष्ठभागावर पाणी साठलेले दिसणे, अनियमित आकाराचे डाग किंवा पानांना अनैसर्गिक चकाकी येणे अशी लक्षणे दिसतात. लसूणघास, ओट, टोमॅटो इत्यादी वनस्पतींवरील नायट्रोजन ऑक्साइडांमुळे होणाऱ्या परिणामांवर बरेच संशोधन झाले आहे.
संदर्भ :
- Taylor, O.C. ; Eaton, F.M., Suppression of plant growth by nitrogen dioxide, Plant Physiol. 41: 132 – 135, 1966.
- Tingey, D., Foliar absorption of nitrogen dioxide, In: Thesis in Univ. of Utah, p.46., 1967.
समीक्षक – बाळ फोंडके