अन्वीकर, हरिभाऊ : खान्देशी आणि माणदेशी तमाशा अवगत असणारा मराठवाड्यातील प्रतिभासंपन्न तमाशा कलावंत. जन्म विश्राम दांडगे यांच्या घराण्यात अन्वी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथे. हरिभाऊंची घरची परिस्थिती बेताची होती. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरवल्याने अनाथ झालेल्या हरिभाऊला परिस्थितीचा सामना करावा लागला. हरिभाऊचे मामा साळू मामा हे उघडा तमाशा करत असत. उपजिविकेच साधन कुठेच नाही मिळत म्हणून जगावं कसं? हा प्रश्न हरिभाऊंसमोर होता. हरिभाऊ साळूमामाच्या तमाशात कपडे धुणे, बल्ल्या गाडणे, कणात शिवणे अशी छोटीमोठी कामे करू लागले. साळूमामाच्या गायकीवर खान्देशी गायकीचा प्रभाव होता.उघड्या तमाशातून छोटीमोठी कामे करत हरिभाऊवर संस्कार घडत होते. हरिभाऊचा आवाज अतिशय कणखर, तालासुरात बांधिलकी जपणारा होता. रात्री ऐकलेली कवणं ते जशीच्या तशी दुसऱ्या दिवशी गाऊन दाखवत. जसजसं हरिभाऊ मोठे होऊ लागले, तसतशी साळूमामाच्या तमाशातील मोठमोठी कामे हरिभाऊला मिळू लागली. कपडे धुणे, सुरत्याचं काम करणे, झिली गाणे, सोंगाडपण करणे, सरदारकी करणे अशी कामे ते टप्प्याटप्प्याने करत गेले आणि कलावंत म्हणून त्यांचा विकास झाला. अशातच पश्चिम महाराष्ट्रातल्या माणदेशी तमाशाचा प्रभाव हरिभाऊवर पडला आणि त्यांनी माणदेशी तमाशा आत्मसात केला. मराठवाड्यात तशी बालेघाटी तमाशाची परंपरा. या परंपरेत शिमग्याच्या निमित्ताने चैती (चैत्र) पौर्णिमेला उघडे तमाशे होत असत. पुढे मराठवाड्यामध्ये तंबूचा तमाशा करणारा हरिभाऊ अन्वीकर व्यतिरिक्त एकही तमासगीर उदयास आला नाही. हरिभाऊंमध्ये दोन्ही परंपरेमधील ज्ञान हे ओतप्रोत भरलेलं होतं. हरिभाऊ जसे खान्देशी तमाशा करायचे तेवढयाच ताकदीने ते माणदेशी तमाशा सुद्धा करायचे. धोंडू-कोंडू पाटील आणि हरिभाऊ अन्वीकर यांचा विशेष दबदबा पश्चिम महाराष्ट्रातील तमासगीरांवर होता. म्हणून दत्तोबा तांबे, तुकाराम खेडकर, पांडूरंग मुळे मांजरवाडीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, गणपतराव व्ही. माने चिंचणीकर इ. तमाशातील मोठी माणसं हरिभाऊंचा आदर करत असत. हरिभाऊंची गायकी आणि सादरीकरण पद्धती ही ओजस्वी होती. हरिभाऊला सादरीकरणासाठी साथ दिली ती पारूबाई पंढरपुरकर यांनी. पारूबाई पंढरपुरकर दिसायला काळी सावळी पण आवाजामधली कोकीळाच होती. हरिभाऊच्या आयुष्यातील प्रत्येकवेळी पारूबाईने हरिभाऊची पाठराखण केली. नृत्यगायनामध्ये पारूबाई निपुण असल्याने हरिभाऊचा तमाशा वरचढ असायचा. हरिभाऊच्या साथीने पारूबाई पंढरपुरकर समवेत सखाराम गवळी, संतोश, भालचंद्र या नाचकाम करणाऱ्या मुलांनी सुद्धा हरिभाऊंना साथ दिली. ऐन उमेदीच्या काळात विठ्ठलराव वेलदोडे, श्रीपतराव वेलदोडे असे सोंगाडे, वीणा कोपरगावकर, सखु बार्शीकर, चंद्रा बायजा कोल्हापूरकर या तमाशा कलावती तसेच सखा हरी इत्यादी कलावंतांनी शेवटपर्यत हरिभाऊंना साथ दिली. विठाबाई नारायणगावकर हरिभाऊला दादा म्हणायची. विठाबाईने तमाशा क्षेत्रात जो दबदबा निर्माण केला होता त्याचा सगळेच लोक सन्मान करायचे. असे असून सुद्धा हरिभाऊची प्रतिभा पाहून आणि त्यांचा  मनमिळाऊ स्वभाव पाहून विठाबाईंनी हरिभाऊना पाठचा भाऊच मानले होते. हरिभाऊचा चाहतावर्ग खान्देश, मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठा होता. त्यांच्या तमाशाला प्रचंड गर्दी व्हायची. हरिभाऊ अतिशय परिवर्तनवादी होते. त्यांना धर्मांधता, कर्मकांड, जादूटोणा, जातीयवाद याची प्रचंड चीड होती. तमाशा परंपरेत वावरत असताना हरिभाऊंनी प्रपंचही केला. केसरबाई ही त्यांची धर्मपत्नी. केसरबाई अतिशय शालीन कुठल्याही प्रकारचं शिक्षण नसताना आपल्या पतीसारखाच परिवर्तनवाद तिच्या विचारात ठासून भरलेला असायचा. पुढे हरिभाऊ आणि केसरबाईला नऊ अपत्ये झाली. केसरबाईंच्या संस्कारातून घडलेली मूलं आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत.

१३ ऑगस्ट १९८९ साली औरंगाबाद येथे काविळीच्या आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :

  • आहेर, सोमनाथ,लोककला खाणीतील रत्ने ,प्रतिभा प्रकाशन,औरंगाबाद,२००९.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा