आनंद महाजन जळगावकर : (१९१८ – ५ मे १९९६). महाराष्ट्रातील तमाशा फडाचे संचालक आणि लोककला संवर्धक. त्यांचा जन्म बंडू आणि गीताबाई या मातापित्याच्या पोटी जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा या गावी झाला. एक महिन्याचे वय असतांनाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यांचा सांभाळ त्यांच्या मामा-मामीने केला. मामाच्या मुलीशीच त्यांनी लग्न केले. त्यांचे शालेय शिक्षण चौथीपर्यंत झाले होते. उदरनिर्वाहासाठी ते गुलाम उस्ताद मोहद्दीन यांच्याकडे थिएटर व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. गुलाम उस्ताद यांचे जळगाव मध्ये हैदरी थिएटर होते. त्यामध्ये संगीत बाऱ्यांचे कार्यक्रम चालायचे. गुलाम उस्ताद पैगंबरवासी झाल्यानंतर हैदरी थिएटर आनंद महाजन चालवू लागले. तसेच ते तमाशाफडांचे कंत्राटही घेवू लागले. आनंद महाजन हे एखाद्या मोठ्या गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी तंबू टाकायचे आणि तिथेच संगीत बाऱ्यांचे आणि तमाशाफडांचे महिनाभर कार्यक्रम चालू ठेवायचे.

१९६९-७० ह्या दोन वर्षांचे त्यांनी भाऊ-बापू नारायणगावकर या तमाशाफडांचे कंत्राट घेतलेले होते. दोन वर्षांनंतर तो तमाशाफड परत पुण्याला आला. मात्र त्या तमाशाफडातील उमा नारायणगावकर, रामभाऊ गायकवाड, शंकर खुडे, पुंडलिक नारायणगावकर हे कलाकार जळगावमध्येच थांबलेले होते. त्या कलाकारांना घेऊन आनंद महाजन यांनी भाऊ-बापू नारायणगावकर या नावाने तमाशाफड सुरू केला. हा तमाशाफड १९७२ पर्यंत चालू होता. त्यानंतर आनंद महाजन जळगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ असा स्वतःच्याच नावाचा तमाशाफड आनंद महाजन यांनी सुरू केला. या तमाशाफडाने जय मल्हार, पतिव्रतेचा तुरा, चिंचोलीचा देशमुख, लखु भोसले, राणीचा महल, नायकिणीचा रंगमहाल  असे वग सादर करून नावलौकिक मिळवला. उत्कृष्ट तमाशाफड म्हणून आनंद महाजन यांच्या तमाशा मंडळाची ओळख निर्माण झाली.

आनंद महाजन हे तमाशाफड मालक होते, मात्र त्यांनी तमाशात कधीही काम केलेले नाही. तरीसुद्धा तमाशा कलेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील होते. कलाकारांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असायचे. हौसा मंजुळा कोल्हापूरकर यांच्या संगीत पार्टीचे कार्यक्रम त्यांनी दिल्ली मध्ये केले होते. मंदिरांच्या जीर्णोद्धारांसाठी, शाळेच्या नविन इमारतीसाठी, ग्रंथालयासाठी तमाशाचे कार्यक्रम करून आर्थिक मदत केलेली होती. आनंद महाजन हे स्वतः तमाशा कलावंत नसल्यामुळे त्यांना कलावंतांसाठी असलेले पुरस्कार मिळालेले नाहीत. मात्र अनेक संस्थानी-संघटनांनी त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित केले आहे. प्रदीर्घ काळ ते तमाशाशी संबंधित होते. फडमालक म्हणून ते सर्वांनाच सुपरिचित होते.

ते काही काळ महाराष्ट्र तमाशा परिषदेचे उपाध्यक्ष होते. तमाशा प्रमाणेच त्यांनी राजकीय-सामाजिक क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केलेली आहे. ते जळगाव नगर परिषदेचे १९७० ते १९८० या काळात नगरसेवक होते. जळगाव जिल्हा माळी महासंघाचे दहा वर्षे अध्यक्ष होते. सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळाचे आजीव सदस्य होते. तसेच त्या संस्थेचे दहा वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.

वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांचे जळगाव येथे निधन झाले.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन