स्टाल, फ्रँक्लिन विल्यम (८ ऑक्टोबर १९२९).
अमेरिकन रेण्वीय जीवशास्त्रज्ञ आणि आनुवंशिकीविज्ञ. स्टाल आणि मॅथ्यू स्टॅन्ले मेसेल्सनबरोबर ‘मेसेल्सन आणि स्टाल प्रयोगाद्वारे’ डेन्सिटी ग्रेडियंट सेन्ट्रीफ्यूगेशनचे तंत्रज्ञान विकसित करून डीएनएचे (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाचे) विभाजन सेमी कॉन्झर्व्हेटिव्ह पद्धतीने करून दाखविले. (सेमी कॉन्झर्व्हेटिव्ह विभाजन म्हणजे डीएनएच्या एका धाग्याचा मार्गदर्शक म्हणून उपयोग करून नवीन धागा बनविणे.) तसेच त्यांनी उत्परिवर्तन, आणि जेनेटीक रिकॉम्बिनेशन या विषयांवर काम केले.
स्टाल यांचा जन्म बॉस्टन, मॅसॅचूसेट्स येथे झाला. त्यांचे पदवीपर्यंत शिक्षण निडहॅम ह्या बॉस्टनच्या उपनगरातील सार्वजनिक शाळेत झाले. त्यांना हार्व्हर्ड कॉलेजमधून जीवशास्त्रातील ए.बी. ची पदवी मिळाली (१९५१). रॉचेस्टर विद्यापीठाच्या जीवशास्त्र विभागात त्यांनी पदवीपर्यंतचे काम केले. कोल्डस्प्रिंग हार्बर बायॉलॉजी प्रयोगशाळेत ए. एच. डोरमन ह्या शास्त्रज्ञाकडे काम करीत असताना बॅक्टरियाच्या पेशीत वास्तव्य करणारा विषाणू (बॅक्टरिओ फेजची) ओळख झाली (१९५२). त्यामुळे त्यांचे जनुकशास्त्राशी पक्के संबंध जुळले गेले. डॉ. डोरमन ह्या शास्त्रज्ञाकडे T4 नावाच्या बॅक्टरियाच्या पेशीत वास्तव्य करणारा विषाणूवर काम करून स्टाल यांना पीएच.डी पदवी मिळाली (१९५६). पुढे ते ज्युसेप्पे बर्टानी (Giuseppe Bertani) यांच्यासमवेत कॅलटेक (कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) येथे फेज ग्रुपवर संशोधन करू लागले. चार्ली स्टाइनबर्ग (Charley Steinberg) यांच्याबरोबर T4 फेज संदर्भात वाढ, उत्परिवर्तन आणि जेनेटीक रिकॉम्बिनेशन यावर काम केले. तर मॅथ्यू स्टॅन्ले मेसेल्सन(Mattew Meselson) यांच्याबरोबर स्टाल यांनी ए-कोलाय मधील डीएनएच्या रिप्लीकेशनवर काम केले.
एकदा स्टाल झाडाखाली बसले असताना मेसेल्सनने स्वतःची ओळख करून दिली. त्यावेळी मेसेल्सन कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजीमध्ये पदवीचे विद्यार्थी होते. प्रयोग करण्याच्या नवीन पद्धती मेसेल्सन शोधू इच्छित होते. स्टालने, मेसेल्सन यांना त्यांच्या अनुभवाची आणि गणिताची मदत प्रयोगांच्या रचनेसाठी केली. त्या दोघांनी हे सर्व असे योजिले की, स्टाल पण कॅलटेक येथे त्याचे डॉक्टरेटनंतरचे काम करू शकले.
१९५७ साली, डेन्सिटी ग्रेडियंट सेन्ट्रीफ्यूगेशनचे तंत्रज्ञान विकसित करून स्टाल आणि मेसेल्सन यांनी डीएनएचे विभाजन सेमी कॉन्झर्व्हेटिव्ह पद्धतीने होते असे दाखवून दिले. ही गोष्ट वॉटसन आणि क्रीक यांनी त्यांच्या १९५३च्या शोधनिबंधात अपेक्षिली होती. १९५८साली, स्टाल आणि मेसेल्सन यांचा या संदर्भातील शोधनिबंध प्रकाशित झाला होता.
१९५९मध्ये, स्टाल यांनी युजीन येथील ऑरेगन विद्यापीठाच्या नव्या रेण्वीक जीवशास्त्राच्या इन्स्टिट्यूटमध्ये मध्ये काम स्वीकारले. त्या आधी एक वर्ष (१९५८) त्यांनी कोलंबिया येथील मिसूरी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात फॅकल्टी म्हणून काम केले. त्यांच्या पुढील संशोधनात लॅम्बडा फेज आणि T4 नावाचा बॅक्टरियाच्या पेशीत वास्तव्य करणारा विषाणू आणि यीस्ट यांचा समावेश होता आणि जनुकीय पुनर्बांधणी (जेनेटीक रिकॉम्बिनेशन) हे त्यांचे लक्ष्य होते.
ओरेगॉन विद्यापीठात रेण्वीय जीवशास्त्राच्या विभागात स्टाल यांनी स्वतःची प्रयोगशाळा सुरु केली व बॅक्टरियाच्या पेशीत वास्तव्य करणारा विषाणूवरील संशोधन केले. पुढे त्यांनी लॅम्बडा फाजवर लक्ष केंद्रित केले.
१९६४–१९८५ या काळात, स्टाल यांनी स्कॉटलंडच्या एडिनबर्गमधील केम्ब्रिज विद्यापीठ, नेपल्स (इटली) ह्या ठिकाणच्या विद्यापीठात व प्रसिद्ध प्रयोगशाळेतून; भेट देणारे प्राध्यापक व शास्त्रज्ञ म्हणून काम केले. त्यांनी अनुवांशिक शास्त्राचे वेगवेगळे अभ्यासक्रम ऑरेगॉन विद्यापीठात शिकविले तर अमेरिका, इटली आणि भारतात बॅक्टरियाच्या पेशीत वास्तव्य करणारा विषाणू या संदर्भात अभ्यासक्रम शिकविले. त्यांनी इंग्लंड, एडिनबर्ग, जेरूसलेम, केम्ब्रिज, मॅसॅचूसेट्स या ठिकाणी अध्यापन केले
जीन एम. क्रेसमन (१९२१–१९९२), मेरी एम. स्टाल (१९३५–१९९६) आणि हेन्री (जेट) एम. फॉस (१९३७) यांच्याबरोबर स्टाल यांनी दीर्घकाळ संशोधन केले.
त्यांनी १५४ शोधनिबंध लिहिले. तसेच त्यांनी द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स (१९६४) (The Mechanics of Inheritance, 1964) आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन : थिंकींग अबाऊट इट इन फेज अँड फंजाय (Genetic Recombination: Thinking About It in Phage and Fungi 1979) ही पुस्तके लिहिली.
स्टाल यांना बरेच गौरव प्राप्त झाले. त्यात दोन मानद पदव्या व गुगेनहाइम फेलोशिप (Guggenheim Fellowship) यांचा समावेश आहे. नंतर ते नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेय (१९७६) आणि अमेरिकन ॲकॅडमी ऑफ आर्ट अँड सायन्सेय (१९८२) मध्ये सदस्य म्हणून निवडून आले.
सध्या स्टाल ऑरेगॉन विद्यापीठाच्या युजीन येथील संस्थेत रेण्वीय जीवशास्त्राचे सन्माननीय प्राध्यापक आहेत.
संदर्भ :
- Franklin Stahl, From Wikipedia, the free encyclopedia, https://en.wikipedia.org/wiki/Franklin_Stahl
- DNA Learning Center, Cold Spring Harbour Laboratory, Biography 20, Biography 20: Franklin William Stahl (1929-),https://www.dnalc.org/view/16467-biography-20-franklin-william-stahl-1929-.html
- Franklin W. Stahl, Institute of Molecular Biology, University of Oregon, http://molbio.uoregon.edu/stahl/
- Franklin William Stahl,DNA from the Beginning, www.dnaftb.org/20/bio-2.html
- www.schule-bw.de/unterricht/faecher/biologie/…/20/bio/20bio.htm
- Franklin W. Stahl, Biography BookRags.com, www.bookrags.com/biography/franklin-w-stahl-woc
- Franklin W. Stahl, American Geneticist, Britannica.com, https://www.britannica.com/biography/Franklin-W-Stahl
समीक्षक – रंजन गर्गे