काणे, शांताराम गोविंद  (१७ मार्च १९४३).

भारतीय संशोधक. काणे यांनी आय्.आय्.टी. (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया) पवई येथे आयुर्वेदिक भस्मावर संशोधन केले. त्यांनी वनस्पतींपासून तेले बनवताना वनस्पतींच्या अर्काचे प्रमाण कमी करून त्यांची गुणवत्ता वाढवली.

काणे यांचे शिक्षण मुंबईतील विल्सन प्रशाला, एल्फिन्स्टन कॉलेज आणि आय्.आय्.टी. पवई, मुंबई (रासायनिक अभियांत्रिकी बी. टेक्., १९६५) येथे झाले. त्यानंतर त्यांनी १९७१ मध्ये अमेरिकेतील एमआयटी येथून पीएच्.डी. ही पदवी प्राप्त केली. सहा वर्षे अमेरिकेत संशोधन केल्यानंतर त्यांनी वीस वर्षे भारतात तंत्रज्ञान निर्मिती आणि संशोधन प्रमुख या नात्यांनी विविध खासगी उत्पादन संस्थांमध्ये काम केले. ऐच्छिक सेवानिवृत्तीनंतर त्यांनी कुतूहलजन्य प्रयोगशीलता हे ध्येय समोर ठेवून संशोधन केले.

काणे यांनी २००१—१३ या कालावधीत मुंबई आय्.आय्.टी. येथे ॲडजन्क्ट प्राध्यापक असताना, होमिओपॅथीवर संशोधन करून धातुजन्य औषधांमध्ये अल्प मात्रेतही मूळ धातूचा अंश अब्जांश कणांच्या (नॅनो पार्टिकल) रूपात अस्तित्वात असतो हे दाखवून दिले. क्षारजन्य औषधांच्या बाबतीतही अशा प्रकारे मूळ क्षाराचा अंश सिलिकाच्या वेष्टणातील अब्जांश कणांच्या रूपात असतो याचीही प्रचिती दिली. पुढे दिव्य वनस्पतींचे सुलभ सिद्धतेल तयार करून सर्वसाधारण प्रकृतिस्वास्थ्यासाठी त्याचा उपयोग होतो हे सिद्ध केले. याच तेलाच्या गोळ्या बनवून त्याचे पाण्यात द्रावण तयार करून ते रोपवाटिकेवर शिंपडले असता ती रोपे इतरांच्या मानाने अधिक जोमाने वाढल्याचे तसेच त्यांची पाने गडद हिरवी झाल्याचे दाखवून दिले. त्यानंतर या तेलांचे प्रयोग त्यांनी सुपारी, भाजीपाला, फुलझाडे, फळझाडे यांच्यावरही केले. त्यापायी या वनस्पतींची संख्यात्मक तसेच गुणात्मकही वाढ होत असल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. सर्वच सजीवांवर या तेलाचा सकारात्मक प्रभाव पडत असल्याचेही त्यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिले. त्यानंतर त्यांनी इतर अनेक वनस्पती, सागरी प्राणी, धातू  व हीरक भस्मापासूनही अशी तेले तयार करून त्यांच्या प्रभावाविषयी संशोधन केले. त्यांची मिश्रणे अधिक प्रभावी ठरल्याचे त्यांना आढळले.

काणे यांनी आयुर्वेदातील नस्य, सुजोक आणि चक्र या कल्पनांशी संयोग करून त्यांनी या तेलांचा विस्तृत प्रभाव असल्याचेही दाखवून दिले.

काणे यांना आजवर तीन भारतीय एकस्वे मिळाली आहेत. त्यांनी इंग्रजी आणि मराठीतून याविषयी लेखनही केले आहे.

संदर्भ :

  • Herbal Oil Extracts to Affordable Health Care.
  • Kane, Shantaram, Ayurvada – Concepts & Their Evolution, pliny publication incl, 2014.

समीक्षक – भूषण पटवर्धन