(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मनुष्याचा समाजातील वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून अर्थशास्त्र ओळखले जाते. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चाणक्य-कौटिल्याने अर्थशास्त्र हा अजरामर ग्रंथ लिहिला. मानवसंस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतशी मानव समाजातील अर्थव्यवस्था विकसित होत गेली. म्हणजेच अर्थशास्त्र बदलत गेले. पाश्चात्त्य देशांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राचा उदय अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, असे म्हटले जाते. भारतातही अस्सल भारतीय आर्थिक विचार मांडणाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आघाडीवर होते. मानवाच्या अमर्याद गरजा पूर्ण करण्याकरिता हाताशी असलेल्या मर्यादित साधनसामग्रीचा वापर कसा करायचा, याचे आडाखे शिकविणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे याचे स्थूलमानाने स्वरूप आहे. भाववाढ, कर, तेजी-मंदी, चलनाचा विनिमय दर इत्यादी कारणांमुळे तसेच दारिद्र्य-विषमता या समस्यांमुळे सामान्य माणसांचा अर्थशास्त्राशी संबंध येतो. आता तर अर्थशास्त्राची व्याप्ती चहूबाजूंनी विस्तारली आहे. आर्थिक सिद्धांत, आर्थिक धोरण, आर्थिक संकल्पना, आर्थिक संशोधन, बँकांसारख्या आर्थिक संस्था इत्यादींचा अभ्यास येथे अनिवार्य मानला जाऊ लागला आहे. अर्थशास्त्राच्या विकासाला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांसारख्या विद्वान विचारवंतांनी नवे परिणाम दिले. अर्थशास्त्राने केवळ सिद्धांत-आकडेवारी यांमध्येच गुंतून न राहाता शिक्षण, आरोग्य, आयुर्मान, घरबांधणी, पिण्याचे पाणी अशा अनंत समस्यांशी भिडावे असे त्यांनी आग्रहाने सूचविले आहे. १९६८ सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनेक विद्वानांनी असे अपारंपारिक नवोन्मेषी विचार मांडले आहेत.

आज विकासाचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, नागरीकरणाचे अर्थशास्त्र, आरोग्याचे अर्थशास्त्र अशा नवनवीन उपविषयांनी हे गतिमान शास्त्र सर्वव्यापी झाले आहे. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, वित्तव्यवहार, प्रशासन इत्यादी विद्याशाखांना आज अर्थशास्त्र स्पर्श करते. अध्यापन, संशोधन, विश्लेषण, निर्णयशास्त्र, सामाजिक पूर्वकथन अशा कितीतरी आंतरक्रिया यात समाविष्ट होतात. प्रशासक, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, पत्रकार, बँकर्स, विमा व्यावसायिक, शेअर्स गुंतवणूकदार, वित्तविश्लेषक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, धोरणकर्ते, माध्यमांचे अभ्यासक इत्यादींना अर्थशास्त्र हा विषय अभ्यासयुक्त-वाचनीय आहे.

ॲल्विन इ. रॉथ (Alvin E. Roth)

ॲल्विन इ. रॉथ

रॉथ, ॲल्विन इ. (Roth, Alvin E.) : (१८ डिसेंबर १९५१). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. रॉथ यांना बाजारपेठा ...