ओरोरिन टुजेनेन्सिस (Orrorin tugenensis) ही मानवी उत्क्रांतीशी संबधित जीवाश्मस्वरूपात मिळालेली एक प्रायमेट प्रजात. ओरोरिन टुजेनेन्सिस हा शब्द केनियातील स्थानिक भाषेत ‘टुजेन भागातील मूळ माणूसʼ अशा अर्थाने आहे. फ्रेंच पुराजीववैज्ञानिक ब्रिजिट सेनुत व भूवैज्ञानिक मार्टीन पिकफोर्ड यांना आफ्रिकेत केनियामध्ये लेक तुर्कानाच्या पश्चिमेला असलेल्या टुजेन टेकड्यांच्या परिसरात या प्रजातीचा शोध लागला (२०००). या प्रजातीचा काळ ६२ ते ५८ लक्षपूर्व वर्षे असा निश्चित करण्यात आला आहे.

ओरोरिनचे एकूण वीस जीवाश्म मिळाले असून, हे अवशेष किमान पाचजणांचे आहेत. त्यांमध्ये पायाची दोन हाडे आहेत. त्यांची रचना बघता हे प्राणी दोन पायांवर चालत होते, हे दिसते. तसेच हे प्राणी झाडांवरही वावरत असावेत. बोटांची हाडे व दात यांची रचना बरीचशी कपींप्रमाणे आहे. सुळे व इतर दात यांवरून ओरोरिन हे प्रामुख्याने पाने, फुले, मुळे, कंद आणि कीटक असे अन्न खात असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. साहेलान्थ्रोपसप्रमाणे ओरोरिनमध्ये कपी व मानव यांची वैशिष्ट्ये दिसतात. परंतु ती प्रामुख्याने कपींकडे झुकणारी आहेत. फक्त दोन पायांवर चालण्याचे वैशिष्ट्य हे या प्राण्यांचा मानवी उत्क्रांतीशी काहीतरी संबंध आहे हे दर्शविते; तथापि याबद्दल वैज्ञानिकांमध्ये सहमती झालेली नाही. म्हणूनच साहेलान्थ्रोपस टाकाडेन्सिसप्रमाणेच यांचा समावेश होमिनिन गटात केलेला नाही.

संदर्भ :

  •  Larsen, C. S. Our Origins, New York, Norton and Co., 2011.
  •  Richmond, B. G. & Jungers, W. L. ‘Orrorin tugenensis Femoral Morphology and the Evolution of Hominin Bipedalismʼ, Science, vol. 319, pp. 1662-1665, 2008.

समीक्षक – शौनक कुलकर्णी